10) Cinematography

Originally published in Jul 2018

चित्रपट हे मूलतः दृकश्राव्य माध्यम आहे. चित्रपटांमध्ये डोळ्यांना काहीतरी दिसतं आणि कानांना काहीतरी ऐकू येतं. या दोन बेसिक गोष्टी कुठल्याही चित्रपटात आढळतात.  फार पूर्वीपासून, म्हणजे चित्रपटांचा उगम झाला तेव्हापासून, पूर्णपणे मूक असं चित्रपटांचं सादरीकरण मला वाटतं क्वचितच झालं असेल. म्हणजे पूर्वीच्या चित्रपटांमध्ये आवाज नसायचा हे बरोबर, पण तो चित्रपट चालू असताना शेजारी पियानो वरती कुणीतरी काहीतरी संगीत वाजवत असायचं. हरिश्चंद्राची फॅक्टरी सिनेमा मध्ये हे दाखवलं आहे. त्यामुळे कुठून ना कुठून तरी आवाज कानावर पडायचा. सिनेमामध्ये डोळ्यांना जे दिसतं, ते मुद्रित करायची कला म्हणजे छायाचित्रण. याविषयी या लेखामध्ये बोलूया. 

सिनेमामध्ये पडद्यावर दिसणारी फ्रेम ही एक खिडकी आहे असा विचार करू. ही खिडकी वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी उघडते आणि प्रत्येक दृश्यातून काहीतरी माहिती द्यायचा प्रयत्न करते. या खिडकीचा आकार साधारणपणे चौकोनी असतो. हा चौकोन किती रुंद हवा, किती उंच हवा, यावरती कित्येक तांत्रिक मतभेद, चढाओढी खेळल्या गेलेल्या आहेत आणि अजूनही खेळल्या जातात. 

छायाचित्रण म्हणजे नेमकं काय? बरेचदा असा गैरसमज असतो की छायाचित्रण म्हणजे ही खिडकी उघडता येणं. माझ्या मते महत्वाचा असला तरी मुख्य मुद्दा नाही. खिडकी “कशी” उघडायची पेक्षा, ती “कधी” उघडायची, हे माहिती असणं याला छायाचित्रण म्हणतात. कॅमेरा चालू करून शॉट घेता येतो म्हणजे cinematography येते असं म्हणणं म्हणजे पेन वापरता येतं म्हणून लेख लिहिता येतो म्हणण्यासारखं आहे. सिनेमा करत असताना छायाचित्रणाचं एक प्रमुख ध्येय हे असतं की नंतर जो ती फिल्म edit करणार आहे (चित्रपटाचा संकलक), त्याला जास्तीत जास्त, योग्य तितका दृश्यांचा खाद्यपुरवठा करणं. हे विधान सुद्धा फार काळजीपूर्वक करायला पाहिजे. जास्तीत जास्त दृश्यांचा खाद्यपुरवठा म्हणजे, उगाचच शूटिंग घेत राहायचं आणि एडिटर बघून घेईल असं नव्हे. कथेमधली एखादी कल्पना सांगायला कशा प्रकारचं दृश्य उपयोगी पडेल, आणि ते दृश्य वेगवेगळ्या तऱ्हेने चित्रित काही वेगवेगळे भावनिक प्रतिसाद निर्माण करू शकू का, याचा विचार करणं म्हणजे छायाचित्रण. “भावना” किंवा emotions वरती चित्रपट आधारलेला असतो हे कधीही विसरून चालणार नाही. 

चित्रपट निर्मितीमध्ये ही खिडकी कधी उघडायची हे ठरवण्यामध्ये तीन मुख्य व्यक्तींचा सहभाग असतो. दिग्दर्शक, छायाचित्रकार आणि संकलक. तिघांची एकाच प्रसंगाची वेगवेगळी vision असू शकते, आणि खरं तर अगदी ideal situation मध्ये सर्वांनी एकत्र मिळून ती खिडकी कधी उघडायची याचा विचार आधीच करून ठेवला तर सिनेमा बनवायची प्रोसेस खूपच efficient होऊ शकेल. पण तसं सहसा होत नाही. दिग्दर्शकाची चित्रीकरण चालू व्हायच्या आधीची सिनेमाविषयी, ही खिडकी कधी उघडायची याची काहीतरी vision असते. वर्षानुवर्षे त्याला त्या खिडकीबाहेरचे प्रसंग दिसत असतात. मला माझ्या कित्येक पुढच्या फिल्म्स चे shots दररोज दिसतात. सदैव दिसताना त्यामध्ये काहिनाकाहीतरी भर पडते. परंतु जेव्हा ऐन वेळेला सेट वरती आपण असतो त्यावेळेला तुम्ही कितीही आधीपासून ठरवून ठेवलंत तरी छायाचित्रकाराला आणि दिग्दर्शकाला काहीतरी नवीन कल्पना सुचू शकतात, आणि त्यामुळे सिनेमामध्ये चांगली भर पडू शकते. असा फुटेज चा संग्रह झाला की एकच प्रसंग अनेक वेगवेगळ्या दृश्यांच्या combination ने editing मध्ये विविध प्रकारे दाखवता येऊ शकतो. एकच प्रसंग अनेक प्रकारे एडिट होऊ शकतो. यावरती हिचकॉक हा एका फारच अप्रतिम विडिओ आहे. तो आपण संकलनाविषयी बोलू तेव्हा पाहूया. छायाचित्रकार हा दिग्दर्शक आणि संकलक यांच्यामधला दुवा असतो, आणि त्यामुळे त्याच्यावरती बरीच जबाबदारी असते. दिग्दर्शकाला हवं तितकं, किंबहुना त्याच्यापेक्षा अधिकच स्वतः विचार करून फुटेज मिळवून देणं आणि हे करत असताना संकलकाला उगाचच जास्त फुटेज देऊन त्याचं एडिटिंगचं काम न वाढवणे, अशा कात्रीत छायाचित्रकार सापडलेला असतो. 

खिडकी कधी उघडायची हे ठरवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ठरवणं गरजेचं असतं ती म्हणजे तुम्हाला नक्की काय सांगायचंय. जसं आपण मागच्या लेखामध्ये बघितलं की एकच प्रसंग घेताना त्याचे जे शॉट्स असतात ते किती वेगवेगळ्या प्रकारे design करता येतात ते. तेच गणित इथेही लागू पडतं. शॉट्स तयार करून स्टोरीबोर्ड करणं हे दिग्दर्शकाला जितकं त्याच्या अभ्यासासाठी उपयोगी पडतं तितकंच ते छायाचित्रकारालाही उपयोगी पडतं. दिग्दर्शक हा एखाद्या शॉट मधून व्यक्त होणारी भावना फक्त ठरवू शकतो पण छायाचित्रकार त्या निर्माण होणाऱ्या भावनेचा जनक असतो. साधं उदाहरण घेऊ. एखाद्या व्यक्तीचा closeup घ्यायचा आहे. का? एखाद्या व्यक्तीच्या मनात डोकावून बघायचं असेल तर usually घेतात closeup. Breaking Bad मध्ये Walter White च्या चेहऱ्यावर सारखा एका बाजूला प्रकाश, आणि एका बाजूला अंधार असे closeups आहेत. का असावेत? मी करतोय ते बरोबर की चूक अशी मनस्थिती दाखवायचा प्रयत्न असेल का?  हा प्रकाशयोजनेचा निर्णय कुणी घेतला असेल? छायाचित्रकाराने घेतला असायची दाट शक्यता आहे. 

Godfather चित्रपटामध्ये तीन ठळक रंग आहेत. हे कुठल्याही सीन मध्ये दिसतात. काळा, पांढरा आणि लाल. परत एकदा Godfather बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लाल रंगाला Godfather मध्ये अवाजवी वाटावं इतकं महत्व दिलं आहे. का? अर्थातच तो हिंसेचा रंग आहे. रक्ताचा रंग आहे. सिनेमाचं चित्रीकरण चालू करायच्या आधी या रंगांची निवड छायाचित्रकार करत असणार यात शंकाच नाही. 

image2.png

Schinder’s List हा आख्खा सिनेमा कृष्ण धवल चित्रित केला आहे. का असावं असं? याच उत्तर मला The Pianist सिनेमा बघितला तेव्हा मिळालं. Schinder’s List आणि The Pianist हे दोन्ही सिनेमे ज्यूंच्या हत्याकांडावरती आधारलेले आहेत. पण The Pianist मध्ये जी हिंसा दाखवली आहे ती काही काळानंतर असह्य होते. आणि ती अस्वस्थता सिनेमाच्या कथेकडे दुर्लक्ष करायला भाग पाडते. सदैव लाल रक्ताची थारोळी बघून गलबलायला होतं. पण Schinder’s List मध्ये तसं होतं नाही, कारण रक्त आणि त्याचा लाल रंग न दिसता ते सांडण्यामागची नाझी लोकांची क्रूर भावना दिसते. तिथे तो सिनेमा आपल्याला जिंकतो. Bruce Block नावाच्या लेखकाचं एक “The Visual Story” नावाचं पुस्तक आहे. जमलं तर जरूर वाचा. खिडकी “कधी” उघडायची याचं अत्यंत सखोल वर्णन त्यात आहे. 

image1.jpg

छायाचित्रकारावरती खिडकी “कधी” उघडायची याची जबाबदारी असतेच, पण तो निर्णय जेव्हा घेतला जातो, त्यावेळेला ती “कशी” उघडायची याचाही विचार त्यालाच करायला लागतो. सध्याच्या तंत्रज्ञानामध्ये या मुद्द्याला अनन्यसाधारण महत्व आलेलं आहे, कारण हल्ली कॅमेऱ्याचे आणि ज्या फॉरमॅट मध्ये विडिओ मुद्रित केला जातो त्याचे बरेच प्रकार उपलब्ध आहेत. पूर्वी कसं होतं की videography करायची असेल तर फिल्म कॅमेरा एवढं एकच तंत्रज्ञान होतं. त्या फिल्मचं गेज वेगवेगळं असायचं (म्हणजे 8 mm, 16 mm, 35 mm, 65 mm) वगैरे वगैरे, पण फिल्म वर विडिओ काढायचा आणि फिल्म वरतीच एडिट करायचा हे तंत्रज्ञान समान होतं. “Resolution” हा एक मोठा निर्णय पूर्वी घ्यायला लागत नसे कारण “pixel” हा प्रकारच अस्तित्वात नव्हता (या सगळ्याविषयी आणि पुढच्या काही लेखांमध्ये बोलूच). पण आता तसं राहिलेलं नाही. Resolution, sensor size, रेकॉर्ड करायचं तंत्रज्ञान, डिजिटल फाईल जी तयार होते त्याचा फॉरमॅट, त्या फाईल चा मेमरी साईझ, असे कित्येक निर्णय छायाचित्रकाराला घ्यावे लागतात, आणि तो जे काही निर्णय घेतो त्याचा परिणाम नंतर जे तंत्रज्ञ ते फुटेज वापरणार त्यांच्यावरती होतो. त्यामुळे हल्ली फुटेज घ्यायचं एवढ्या एकाच कृतीसाठी तांत्रिक निर्णय घेऊन चालत नाही. ते फुटेज कोण वापरणार आणि कुठलं तंत्रज्ञान वापरून वापरणार याचाही विचार आधी करावा लागतो. चलतचित्राचा कॅमेरा याचं तंत्रज्ञान इतकं झपाट्यानं बदलतंय आणि बदलत आलंय की त्याच्याविषयी एक वेगळा लेख लिहिणं आवश्यक आहे. तर त्याविषयी आपण पुढच्या लेखामध्ये बोलू. 

Previous
Previous

9) Screenplay

Next
Next

11) Camera