Ashay Javadekar

View Original

4) Kundalini

Originally published in Jan 2018

मागच्या लेखामध्ये आपण फिल्म्स मधल्या emotional gradient विषयी बोललो. फिल्म्समधली जी पात्रे असतात ती एका भावनिक पातळीवरून दुसऱ्या पातळीपर्यंत जातात, आणि तो प्रवास करताना ते ज्या ज्या emotions मधून जातात, त्याच्यातून त्यांची emotional journey आपल्याला दिसते. आपण अशीही चर्चा केली जर सुरुवातीची पातळी आणि शेवटची पातळी जर समानच राहिली तर हा प्रवास होणार नाही, आणि मग सिनेमा मध्ये काहीच घडलं नाही असं आपण म्हणू शकतो. एवढं असूनसुद्धा अजूनही एक प्रश्न अनुत्तरित राहतो. सुरुवातीची असो किंवा शेवटची असो, ही भावनिक पातळी मोजायची कशी? त्याचं काही परिमाण आहे का? 

मी काही वर्षांपूर्वी "Inner Drives" नावाचं पामेला जे स्मिथ या लेखिकेनं लिहिलेलं पुस्तक वाचलं. त्या पुस्तकामध्ये या भावनिक पातळीचं परिमाण मोजायची एक युक्ती दिलेली होती. आणि suprisingly ती युक्ती आपल्या उपनिषदांमध्ये लिहिलेल्या कुंडलिनी शक्ती या संकप्लनेभोवती आधारलेली होती. आता याच्यापुढे मी जे काही सांगणार आहे ते मला त्या पुस्तकात वाचून जे कळलं ते सांगणार आहे, मी कदाचित योग्य संज्ञा वापरत नसेनही, त्यामुळे जाणकार लोकांनी मला क्षमा करावी. 

आधी ही कुंडलिनी शक्ती काय कल्पना आहे  ते समजून घेऊ. ही कुंडलिनी शक्ती सर्व मनुष्य प्राण्यांमध्ये असते, आणि ती मज्जातंतूवरती (along the spinal chord) प्रवास करते. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदी ती सर्वात खालच्या टोकाला असते, आणि मग ती हळू हळू वरती चढत मस्तकापर्यंत पोचते. हा जो प्रवास आहे कुंडलिनी शक्तीचा मज्जातंतूवरती, त्या प्रवासात काही ठराविक टप्प्यांमधून ती जाते. हे जे टप्पे आहेत, त्यांना आपण milestones म्हणू शकतो, त्या प्रत्येक टप्प्याचे काही गुणधर्म आहेत. ही कुंडलिनी शक्ती ज्या टप्प्यावर असते, त्या टप्प्याच्या गुणधर्मानुसार त्या व्यक्तीची motivations, किंवा emotional level बदलते. "कुंडलिनी शक्ती जागृत करणे" म्हणजेच या शक्तीला खालच्या टोकापासून वरच्या टोकापर्यंत प्रवास करायला उद्युक्त करणे. आणि ही शक्ती जागृत करायचे मग बरेच प्रकार आपल्या शास्त्रात आहेत, जसे तपश्चर्या, ध्यानधारणा, meditation वगैरे वगैरे. 

तर हे जे कुंडलिनी शक्तीचे टप्पे आहेत, त्या टप्प्यांविषयीच फक्त आपण बोलू कारण आपल्या भावनिक पातळ्यांचं परिमाण तिथे सापडणार आहे. हे ८ टप्पे आहेत. मी सर्वात खालच्या टोकाला "पॉईंट १" असं म्हणतो, आणि सर्वात वरच्या टोकाला "पॉईंट ८". कल्पना अशी की ही फिल्म मधल्या कुठल्याही पात्राची कुंडलिनी ज्या पॉईंटला आहे, त्या पॉईंटनुसार त्या पात्राची भावनिक पातळी ठरणार आहे. आता आपण सगळ्यात खालच्या पॉईंट पासून सुरुवात करू, आणि प्रत्येक पॉईंट चे गुणधर्म आणि त्यानुसार असलेली भावनिक पातळी याचा विचार करू. 

प्रत्येक पॉईंट ला मी कुंडलिनीचं कुठलंतरी center आहे असं म्हणणार आहे.

पॉईंट १ : Root Center

या center ला ज्या पात्राची कुंडलिनी आहे, त्याची emotional level ही त्या पात्राच्या भौतिक अस्तित्वाभोवती आधारलेली आहे. All actions are motivated by sheer survival. मी जिवंत राहू शकेन की नाही याची चिंता या पात्राला असते. हॅरी पॉटर हे पात्र या सेंटरला आहे. हॅरी पॉटर चे सगळे सिनेमे हे हॅरी पॉटर ला जिवंत ठेवणे या संकल्पनेभोवती आधारलेले आहेत. Jason Bourne हे पात्र सुद्धा या सेंटर ला आहे. जवळ जवळ सगळ्या "action based" हॉलिवूड मधल्या फिल्म्स या सेंटर ला असतात. मी जगू कसं? मला कुणी मारायला तर येणार नाही? जिवंत कसं राहायचं?

पॉईंट २ : Sacral Center

या center ला ज्या पात्राची कुंडलिनी आहे, त्याची emotional level ही त्या पात्राच्या भौतिक सुखांभोवती आधारलेली आहे. ज्याअर्थी कुंडलिनी पॉईंट १ पासून पॉईंट २ ला आली, त्याअर्थी आता जिवंत राहणे ही काही अडचण त्या पात्राच्या आयुष्यात राहिलेली नाही. आता त्याच्यावरच्या गोष्टी. संभोग, भीती, पैसा! अक्षय कुमारचं अजनबी मधलं character या सेंटर ला आहे. अब्बास मुस्तान च्या सगळ्या फिल्म्स मधले जवळजवळ सगळे व्हिलन्स या सेण्टरला असतात. पैसा पाहिजे! हॉलिवूड मधलं उदाहरण घ्यायचं झालं तर स्टिव्हन स्पीलबर्गचा Schindlers List नावाचा जो सिनेमा होता, त्यामध्ये ऑस्कर शिंडलरचं पात्र सिनेमा सुरु होतो तेव्हा या सेंटरला असतं. World War चा उपयोग ऑस्कर शिंडलर केवळ पैसा कमावण्यासाठी करत असतो.

पॉईंट ३ : Lower Solar Plexus Center

आता पॉईंट २ पासून पॉईंट ३ ला वरती चढू. या center ला ज्या पात्राची कुंडलिनी आहे, त्याची emotional level ही त्या पात्राच्या महत्त्वाकांक्षेभोवती आधारलेली आहे. स्वतःला सिद्ध कसं करून दाखवू याची चिंता त्या पात्राला आहे. भारतीय चित्रपटातले जवळजवळ सगळे नायक या सेंटरला असतात. कित्येक नावं घेता येतील. कभी हा कभी ना मधला शाहरुख खान, कहो ना प्यार है मधला ह्रितिक रोशन. स्वतःसाठी कसं स्थान निर्माण करू याची चिंता. 

पॉईंट ४ : Higher Solar Plexus Center

आता पॉईंट ३ पासून पॉईंट ४ ला वरती चढू. या center ला ज्या पात्राची कुंडलिनी आहे, त्याची emotional level आता फक्त स्वतःचा विचार न करता समाजाचा विचार, ग्रुपचा विचार, समाजात मला आदर कसा मिळेल, कुटुंबामध्ये मला सामावून घेतील का, या प्रश्नांभोवती आधारलेली आहे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे उत्तरायण मधलं शिवाजी साटम यांचं पात्र. उत्तरायण मधला तो सीन आठवतोय का ज्याच्यामध्ये शिवाजी साटम हे त्यांच्या मुलाबरोबर जेवत असतात, आणि त्यांच्या मुलाला त्याच्या होणाऱ्या बायकोकडून फोन येतो. ती सिनेमाला जाऊया का असं विचारते. तो हो म्हणतो आणि बाबांना सांगतो. शिवाजी साटमना वाटतं त्यांना पण ते सिनेमाला घेऊन जाणार आहेत म्हणून ते तयार वगैरे व्हायला लागतात, आणि त्यांना कळतं की खरं तर मुलगा आणि त्याची होणारी बायको यांना सिनेमाला जायचं आहे. बाघबान मधली दोन मुख्य पात्रं, तू तिथं मी मधली पात्रं यांची पण कुंडलिनी याच सेंटरला आहे.

पॉईंट ५ : Heart Center

आता पॉईंट ४ पासून पॉईंट ५ ला वरती चढू. या center ला ज्या पात्राची कुंडलिनी आहे, त्याची emotional level ही त्या माणुसकी किंवा प्रेम यांच्याभोवती आधारलेली आहे. भारतीय चित्रपटातले जवळजवळ सगळे नायक या सेंटरला सिनेमाच्या शेवटी पोचतात. त्यांचं प्रेम यशस्वी ठरतं. Godfather सिनेमातला Michael Corleone सिनेमा चालू होताना या सेंटर ला आहे. त्याची गर्लफ्रेंड के त्याच्याबरोबर आहे, त्याला तिच्याशी लग्न करायचं आहे, तो तिच्या प्रेमात आहे. Heart Center!

पॉईंट ६ : Throat Center

आता पॉईंट ५ पासून पॉईंट ६ ला वरती चढू. या center ला ज्या पात्राची कुंडलिनी आहे, त्याची emotional level ही त्या सृजनशीलता, अभिव्यक्ती, creativity याच्या भोवती आधारलेली आहे. A Beatiful Mind नावाचा जो सिनेमा होता, त्याच्यामधलं John Nash चं पात्र या सेंटरला असतं. He wants to create something new in Mathematics. That's why he invents Game Theory. दहावी फ मधलं अतुल कुलकर्णी यांचं पात्र या सेंटर ला आहे. त्यांना त्याच्या शिक्षकाचा जो अनुभव आलेला असतो तो गाठीशी बांधून त्यांना त्या वर्गातल्या दंगेखोर मुलांना सुधारावं असं वाटत, त्या दृष्टिकोनातून ते व्यक्त व्हायचा प्रयत्न करतात. भास्कर देशपांडे म्हणून जे वास्तुपुरुष सिनेमामध्ये पात्र आहे, ते या सेंटरला आहे. मॅगसेसे पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांना त्यांच्या गावासाठी काहीतरी करावंसं वाटतं. संत ज्ञानेश्वर या सेंटरला आहेत. गीतेचा भावार्थ कळलेला आहे, आणि तो आता लोकांपर्यंत पोचवायचा आहे. काय निर्माण केलं त्यांनी? भावार्थ दीपिका. 

पॉईंट ७ : Ajna Center

आता पॉईंट ६ पासून पॉईंट ७ ला वरती चढू. या center ला ज्या पात्राची कुंडलिनी आहे, त्याची emotional level ही त्या आधीच्या सर्व सेंटरच्या एकात्मतेभोवती आधारलेली आहे. त्यामुळे आधीच्या सर्व सेंटरचे गुणधर्म त्या पात्रामध्ये आलेले आहेत. साधारणतः फिल्म्स मध्ये असं एक मार्गदर्शक, किंवा साधूसदृश पात्र असतं ते या सेंटरला असतं. उदाहरणार्थ Lord of the Rings मधला Gandalf. Star Wars मधला Obi Wan Kanobi.

पॉईंट ८ : Crown Center

आता पॉईंट 7 पासून पॉईंट 8 ला वरती चढू. या center ला ज्या पात्राची कुंडलिनी आहे, त्याची emotional level ही बोधावस्थेभोवती आधारलेली आहे. अनंताच्या पलीकडे काहीतरी. फार कमी फिल्म्स मधली पात्रं या सेंटर पर्यंत पोचतात, त्यामुळे सिनेमाविषयी बोलत असताना यांच्याविषयी बोलणं फार काही युक्त ठरणार नाही.

मला जेव्हा हे परिमाण समजलं तेव्हा माझे डोळे लख्ख उघडले, आणि अचानक सगळ्या सिनेमातली पात्रं एका वेगळ्याच रीतीनं बोलायला लागली. मी कधी असा विचारच केला नव्हता. फिल्म्स मध्ये emotional gradient असतो हे खरं, परंतु त्या gradient साठी अशा पातळ्या ठरवता येतील हा एक साक्षात्कार होता माझ्यासाठी. आता यांच्यापुढच्या लेखामध्ये याच पातळ्यांचा वापर करून actual gradients कसे काही वेगवेगळ्या फिल्म्स मधल्या पात्रांमध्ये याचा विचार करू.