Ashay Javadekar

View Original

5) Up, Down and Flat

Originally published in Feb 2018

मागच्या लेखामध्ये मी पात्रांची भावनिक पातळी उपनिषदातल्या कुंडलिनी या संकल्पनेचा विचार करून मोजायचा प्रयत्न केला. आपल्याला एक गोष्ट जाणवली की एकूण ८ पातळ्या आहेत त्याच्यावरती पात्रांची भावनिक पातळी नांदू शकते. त्याच्या आधीच्या लेखामध्ये आपण emotional gradient अशी एक कल्पना मांडली होती, ज्याच्यामध्ये मी असं म्हणालो होतो की पात्रांचा फिल्ममधला भावनिक प्रवास (emotional journey) हा एका भावनेपासून दुसऱ्या भावनेपर्यंत होतो, आणि असा प्रवास जर झाला नाही तर फिल्ममधे काहीच घडलं नाही असं आपल्याला वाटत. या लेखामध्ये या दोन्ही कल्पना एकत्र करून “कुंडलिनी gradient” अशी एक कल्पना रुजू करूया. 

काही सिद्धांत खालीलप्रमाणे मांडू. 

१. फिल्म्स मध्ये पात्रांची कुंडलिनी फिल्म चालू होताना एका पातळीला असते (१ ते ८ मध्ये कुठेही), आणि फिल्म संपताना ती दुसऱ्या एखाद्या पातळीला पोचते (परत १ ते ८ मध्ये कुठेही). 

२. जर एखाद्या पात्राचा खालच्या पातळीपासून वरच्या पातळीला कुंडलिनीचा प्रवास झाला, तर ते पात्र “प्रेरणादायी”, किंवा inspiring ठरतं, आणि त्या फिल्मचा शेवट हा सुखात (happy ending) होतं. 

३. जर एखाद्या पात्राचा वरच्या पातळीपासून खालच्या पातळीला कुंडलिनीचा प्रवास झाला, तर ते पात्र “करुण”, किंवा tragic ठरतं, आणि त्या फिल्मचा शेवट हा दुःखात (tragic) होतो.

आता काही उदाहरणे विचारात घेऊ आणि हे सिद्धांत पडताळून पाहू. 

प्रेरणादायी पात्रे (Inspiring Characters)

“जो जिता वोही सिकंदर” मधला आमिर खानने वठवलेला “संजू”. याची कुंडलिनी दुसऱ्या पातळीपासून चौथ्या पातळीपर्यंत प्रवास करते. फिल्म चालू असताना तो दुसऱ्या पातळीला, म्हणजेच “Sacral Center” ला असतो. त्याला भौतिक सुखे, मस्ती, girlfriends हे जास्त महत्वाचं वाटत असतं. फिल्मच्या शेवटी मात्र तो भावासाठी, वडिलांसाठी, कुटुंबासाठी त्या स्पर्धेत भाग घेतो. म्हणजेच तो चौथ्या पातळीला “Higher Solar Plexus” ला पोचतो. 

“लगान” मधला भुवन. फिल्म चालू होताना कुंडलिनी सर्वात खालच्या पातळीला. पाऊस पडला नाही तर जगायचं कसं ही चिंता. Root Center. तिथून तो चढत चढत चौथ्या पातळीला, Higher Solar Plexus ला पोचतो, जिथे तो गावासाठी, समाजासाठी ती क्रिकेटची पैज स्वीकारतो आणि जिंकतो. 

“Mr India” मधला अनिल कपूर. फिल्म चालू होताना कुंडलिनी सर्वात खालच्या पातळीवर. Root Center. जगू कसं आणि मुलांना जगवू कसं? फिल्म संपताना मात्र पाचव्या पातळीला. Heart Center. माणुसकी. आठवतं का तो मोगॅम्बोने तयार केलेली missiles निकामी करतो, जी वापरून मोगॅम्बो वेगवेगळी शहरं उध्वस्त करणार असतो. 

“३ Idiots” मधली तीनही पात्रे. आमिर खान, शर्मन जोशी आणि आर माधवन. फिल्म चालू होताना त्यांची कुंडलिनी दुसऱ्या पातळीला असते, “Sacral Center”. प्रोफेसर्सची भीती, अभ्यासाची भीती, किती मार्क मिळणार याची भीती, मस्ती, दंगा वगैरे वगैरे. फिल्म संपताना मात्र सहाव्या पातळीपर्यंत पोचतात. Throat Center. म्हणजे सृजनशीलता. आर माधवन एक फोटोग्राफर बनतो. आमिर खान तर त्याची स्वतःची शाळा उघडतो. 

“स्वदेस” मधला मोहन भार्गव. फिल्म चालू होताना कुंडलिनी चौथ्या पातळीवरती. समाजातला आदर मिळवायची धडपड. स्वतःच्या नात्यातली व्यक्ती शोधायची धडपड. Higher Solar Plexus. सिनेमा संपताना मात्र कुंडलिनी सहाव्या पातळीवरती. Throat Center. तो एक electricity plant बांधतो. काहीतरी create करतो. 

“रंग दे बसंती” मधली सगळी पात्रे. फिल्म चालू होते तेव्हा सर्वांची कुंडलिनी दुसऱ्या पातळीवरती, Sacral Center. मस्ती, मजा, कशाची फिकीर नाही. फिल्म संपते तेव्हा मात्र पाचव्या पातळीला पोचतात. Heart Center. राजकारण्यांचा होणारा भ्रष्टाचार उघडकीला आणतात त्यांच्या मित्रावरच्या प्रेमापोटी. 

करुण पात्रे (Tragic Characters)

“झेंडा” सिनेमामधलं चिन्मय मांडलेकरचं पात्र. फिल्म चालू होते तेव्हा त्याची कुंडलिनी चौथ्या पातळीवरती असते, Higher Solar Plexus. त्याला समाजामध्ये स्थान मिळवायचं असतं. नेता बनायचं असतं. सिनेमा संपायच्या वेळेला मात्र त्याची कुंडलिनी तिसऱ्या पातळीवर घसरते. तो त्या event management कंपनी मध्ये रुजू होतो, आणि स्वतःचं वैयक्तिक यश त्याला जास्त महत्वाचं वाटतं. 

“Amadeus” सिनेमामधलं Salieri चं पात्र. Amadeus सिनेमा मध्ये मोझार्ट आणि सॅलियरी या दोन संगीतकारांमधलं शत्रुत्व दाखवलं आहे. सिनेमा चालू होतो तेव्हा सॅलियरीची कुंडलिनी तिसऱ्या पातळीवरती असते. अहंकार, मोठा संगीतकार व्हायची महत्वाकांक्षा त्याला असते. सिनेमा संपतो तेव्हा मात्र मोझार्टवरच्या द्वेषापायी तो वेडा होतो आणि आत्महत्येचा प्रयत्न करतो. 

सर्वसाधारणपणे शेवट सुखात होणारे सिनेमे हे संख्येने जास्त असतात आणि त्यामुळे inspiring characters ही जास्त दिसतात. किंवा जर हिरोचं पात्र inspiring असेल तर साधारणपणे व्हिलनचं पात्र हे tragic असतं. 

आत्तापर्यंत आपण ज्या ज्या gradient चा विचार केला, ते सगळे एकघाती किंवा linear होते. परंतु तसेच ते असायला पाहिजेत असं मुळीच नाही. किंबहुना पात्रांना अजून आकर्षक बनवण्यासाठी gradient अरेखिय (non-linear) असू शकतात. अशा gradients ना character arc असं आपण म्हणू शकतो. 

काही करूण पात्रांचे character arcs बघू. “Breaking Bad” मधला वॉल्टर व्हाईट. हे पात्र चालू होतं सहाव्या पातळीला. Throat Center ला. त्याला chemistry विषयाचं आकर्षण असतं, तो शिक्षक असतो, काहीतरी सारखं communicate करावं असं त्याला वाटत असतं. यातूनच त्याचं ड्रग बनवायचं वेड वाढीस लागतं. पण मग त्यामध्ये तो root center ला घसरतो. गस त्याच्या मागे लागतो आणि त्याला जीवे मारायचा प्रयत्न करतो. पण मग वॉल्टर डाव उलटवतो आणि तिथून वरती चढत तिसऱ्या पातळीपर्यंत पोचतो. त्याचा शेवट स्वार्थ, अहंकार इथे होतो. याचा अर्थ खरं तर वॉल्टर चा प्रवास सहाव्या पातळीवरून तिसऱ्या पातळीपर्यंत होतो, पण मध्ये तो root center ला खालपर्यंत जाऊन येतो. असं nonlinear पात्र असल्याने वॉल्टरचं पात्र जास्त आकर्षक होतं. 

एका अत्यंत प्रसिद्ध tragedy विषयी बोलू. The Godfather! यामध्ये मायकल कोर्लेओनेचं पात्र करूण आहे. ते चालू होतं पाचव्या पातळीला, Heart Center ला. फिल्मच्या सुरुवातीला तो त्याच्या girlfriend च्या, के च्या प्रेमात असतो. त्याला त्याचा वेगळा संसार थाटायचा असतो. पण वडिलांच्या व्यवसायात तो त्याच्याच नकळत ओढला जातो आणि त्याच्या जीवावर बेततं (Root Center ला खाली खेचला जातो). तिथून मग तो चढत चढत वरती येतो पण Heart Center पर्यंत पोचूच शकत नाही. महत्वाकांक्षा, स्वार्थ इथपर्यंतच पोचतो आणि तिथेच अडकतो. म्हणजे पाचव्या पातळीवरून तिसऱ्या पातळीपर्यंत त्याची घसरण होते. म्हणूनच The Godfather ही Tragedy आहे.

जसे हे Character Arcs करुण पात्रांमध्ये आहेत, तसे प्रेरणादायी पात्रांमध्ये पण ते असतात का? जरूर असतात. Lord of the Rings मधल्या फ्रोडोचं उदाहरण घ्या. फिल्म चालू होताना फ्रोडो Heart Center ला आहे. शायरमधला एक साधा माणूस, सगळ्यांवर प्रेम करणारा, सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारा म्हणजे फ्रोडो. पण त्याच्याकडे गँडाल्फने ती रिंग दिल्यामुळे सौरॉन त्याला मारायला उठतो आणि त्यामुळे त्याला सतत त्याच्यापासून पळायला लागतं. म्हणजेच तो पाचव्या पातळीपासून पहिल्या पातळीवर घसरतो. पण तिथून मात्र तो वरती चढत चढत, सौरॉन ची भीती दूर करत, स्वतःचा स्वार्थ बाजूला सारून, माणुसकीखातर ती रिंग नष्ट करतो. आणि मग हा अनुभव इतका विलक्षण असतो की तो त्याचे अनुभव लिहायला लागतो, म्हणजेच सृजनशीलतेपर्यंत पोचतो. म्हणून त्याचा प्रवास पाचवी पातळी, ते पहिली पातळी ते सहावी पातळी असा घडतो. शेवटची पातळी ही चालू झालेल्या पातळीपेक्षा वरची असल्याने फ्रोडो प्रेरणादायी ठरतो. 

अजून एक असं उदाहरण म्हणजे अॅलन ग्रांट चं जुरासिक पार्क मधलं पात्र. हे पात्र चालू होतं तिसऱ्या पातळीला. तो एक महत्वाकांक्षी paleontologist असतो, त्याला त्याचं संशोधन करायचं असतं. आणि त्या स्वार्थापायी तो हॅमंड ची देणगी स्वीकारून जुरासिक पार्क ला जातो. तिथे मात्र तो Root Center ला खेचला जातो कारण त्याचा जीवच धोक्यात येतो. तिथून मग तो वरती येत येत पाचव्या पातळीला पोचतो कारण त्याची लहान मुलांविषयी असलेली घृणा ही नष्ट होते आणि तो त्यांना वाचवतो, त्यांच्यावर प्रेम करायला लागतो. शेवटच्या हेलिकॉप्टरच्या सीनमध्ये तर त्याच्याच मांडीवर ती दोन्ही मुलं झोपलेली असतात. तो Character Arc कसा? तिसरी पातळी, ते पहिली पातळी, ते पाचवी पातळी असा arc. आणि शेवटची पातळी सुरुवातीच्या पातळीपेक्षा वरची असल्याने प्रेरणादायी पात्र. 

आपण Up आणि Down असे कुंडलिनीचे दोन प्रवास बघितले. तसा Flat प्रवास होतो का कधी? क्वचित तसाही होतो. House of Cards मध्ये फ्रॅंक अंडरवूड हे पात्र flat कुंडलिनीचं उदाहरण. फक्त स्वार्थ, स्वार्थ आणि स्वार्थ. दुसरं काहीही नाही. परंतु अशी पात्रं कंटाळवाणी व्हायची भीती असते, त्यामुळे त्याच्या आजूबाजूच्या पात्रांना मग upwards किंवा downwards journey द्यावी लागते. त्यामुळे तुम्ही बघितलेत तर क्लेअर अंडरवूड स्वार्थापासून प्रेमपर्यंत कधी कधी जाते. डग स्टॅम्पर पण वरती खालती होतो.

या लेखामध्ये आपण कुंडलिनीचे विविध प्रवास बघितले आणि त्यानुसार पात्रं कशी बदलू शकतात ते पाहिलं. आता यापुढच्या लेखामध्ये पात्रांना हा प्रवास करायला भाग कोण पाडतं याचा विचार करू. असं नक्की काय घडतं की पात्रांना त्यांची कुंडलिनीची पातळी बदलाविशी वाटते? याचं उत्तर आणि “जिज्ञासा” आणि “संघर्ष”. बोलूच.