9) Screenplay
Originally published in Jun 2018
आत्तापर्यंत आपण जे काही बोलत आलो ते सर्व pre-production या भागात मोडतं. यामध्ये जास्त theory होती. आजचा लेख हा या भागातला शेवटचा लेख. यानंतर ही लेखमाला कदाचित बरीच तांत्रिक होत जाईल production भागामध्ये. आणि मग परत विचारसरणी, किंवा theory कडे वळेल post-production मध्ये.
आत्तापर्यंत आपण ज्या ज्या गोष्टींचा विचार केला, त्या सर्व गोष्टी एखादी कथा सांगायला आवश्यक आहेत असं आपण म्हटलं. या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडून कथा बनते. परंतु सिनेमासाठी फक्त कथा उपयोगाची नसते. सिनेमाला पटकथा लागते. (इंग्लिश मध्ये screenplay). कथा आणि पटकथा यामध्ये फरक काय?
पटकथा म्हणजे जे डोळ्यांना दिसतं, आणि जे कानांना ऐकू येतं याची यादी. कथेमध्ये पात्रांविषयी वेगळी माहिती आपण सांगू शकतो. त्यांची पार्श्वभूमी सांगू शकतो, त्यांच्या मनातले विचार लिहून सांगू शकतो. ते पटकथेत सांगू शकतो का? नाही! पटकथेमध्ये प्रेक्षकांच्या डोळ्यांना काय दिसणार आहे, हेच फक्त सांगावं लागतं. हा फार मोठा फरक आहे, कथा / कादंबरी आणि पटकथेमधला. जे जे काही एखाद्या पात्राविषयी माहिती करून देणं गरजेचं आहे प्रेक्षकांना ते प्रेक्षकांना कुठल्यातरी डोळ्यासमोर घडणाऱ्या कृतीतून, दृश्यातून दिसतं, ध्वनीतून ऐकू येतं. दृक्श्राव्य सोडून अजून कुठल्याही गोष्टीला पटकथेमध्ये जागा नाही. पात्र काय विचार करतंय, पात्राची पार्श्वभूमी काय याचं वर्णन पटकथेमध्ये येत नाही.
पटकथेचे घटक कोणते? सर्वांना माहिती असलेला घटक म्हणजे प्रसंग, किंवा ज्याला इंग्लिश मध्ये Scene असं म्हणतात. अनेक प्रसंग मिळून घटनाक्रम (Sequence) बनतो, अनेक घटनाक्रम मिळून एक अंक (Act) बनतो, आणि असे ३ अंक मिळून पटकथा बनते. (हे तीन अंक म्हणजे सुरुवात, मध्य आणि शेवट. प्रत्येक अंकामध्ये काय काय असतं हे आपण आत्तापर्यंतच्या लेखांमध्ये बघितलं आहे. म्हणजे नायकाची ओळख, जिज्ञासा, संघर्ष, कुंडलिनी ग्रेडियंट वगैरे वगैरे). परंतु पटकथेतल्या घटकांची वर्गवारी करायची झाली, तर प्रसंग हा मध्यवर्ती येतो. म्हणजे प्रसंगाचे सुद्धा उपघटक असतात. ज्यांना कॅमेरा अँगल्स किंवा shots असं आपण म्हणू शकतो. आणि हा जो एक शॉट असतो ते अनेक फ्रेम्स चा बनलेला असतो. फिल्मच शूटिंग करत असताना एका वेळेला कॅमेरा चालू झाल्यानंतर कॅमेरा बंद होईपर्यंत जे काही कॅमेऱ्यात रेकॉर्ड होतं, त्याला शॉट असं म्हणूया. एक शॉट हा जवळपास ३-१० सेकंदाचा असतो. तुम्ही जर कुठलीही फिल्म बघितलीत सध्याची तर ती अशी ३-३ सेकंदांच्या फिल्म्स च्या तुकड्यांनी जोडलेली असते. पुढच्या वेळेला फिल्म बघताना कुठे शॉट बदलतो हे बारकाईने पहा म्हणजे मी काय म्हणतो आहे ते लक्षात येईल.
थोडक्यात सर्वात लहान ते सर्वात मोठा घटक अशी वर्गवारी करायची झाली तर पुढीलप्रमाणे करता येईल.
फ्रेम → शॉट → प्रसंग (scene) → घटनाक्रम (sequence) → अंक (Act) → पटकथा (Screenplay)
कुठलीही पटकथा वाचायला घेतलीत तर ठळक जाणवणारा तुकडा म्हणजे प्रसंग किंवा scene. याचं कारण हे आहे की प्रसंगाची आखणी ही तो प्रसंग कुठे घडतो त्या स्थळावरती (location) अवलंबून असते. दोन तीन लोकेशन ला घडणारा प्रसंग हा एकाच मथळ्याखाली लिहून योग्य ठरणार नाही, कारण प्रत्येक लोकेशन नुसार पात्रांच्या जागा, कुठली पात्र कुठे आहेत, props काय आहेत, मेकअप, कपडे हे सगळं बदलतं.
याची आपण नाटकाच्या संहितेशी तुलना करू. नाटकामध्ये जागा (space) ही सहसा स्थिर असते, आणि वेळ (time) बदलते. त्यामुळे फक्त त्या जागेवरचे वेगवेगळे प्रवेश हे नाटकामध्ये लिहिले जातात. सिनेमामध्ये जागा आणि वेळ दोन्ही बदलतं, आणि त्यामुळे प्रत्येक जागेवरचे अनेक प्रवेश सिनेमामध्ये असतात. छोटी छोटी अनेक नाटके एकाच सिनेमा मध्ये असतात असं म्हणता येईल. अजून एक मोठा फरक म्हणजे नाटकामध्ये प्रेक्षकांना दिसणारी फ्रेम एकाच आकाराची असते. जे स्टेज वर दिसतं तेच बघावं लागतं. प्रेक्षकांचं लक्ष कदाचित काही युक्तिदार प्रकाशयोजनेने काही गोष्टींकडे तुम्ही वेधू शकता, पण ती गोष्ट तरीही छोटी असू शकत नाही. उदाहरणार्थ एखादा माणूस पुस्तक वाचत असेल तर तो त्या पुस्तकातलं नेमकं काय वाचतो आहे ते तुम्ही दाखवू शकत नाही. मग त्यासाठी संवाद घालावे लागतात. कृती ही संवादाने समजावून सांगावी लागते.
ज्या क्षणी नाटकामध्ये जागा बदलणे, किंवा कॅमेऱ्याचा वापर करून छोट्या गोष्टी दाखवणे याचा वापर होतो, त्याक्षणी नाटक सिनेमाकडे झुकतं. उदाहरणार्थ फिरता रंगमंच असेल, तर ते नाटक भव्य ठरतं. ब्रॉडवे शोज मध्ये असे प्रसंग वारंवार घडतात. किंवा मी मध्ये लास वेगास ला David Copperfield चे जादूचे प्रयोग बघितले होते, तिथे तो त्याचे छोटे छोटे प्रयोग live camera वापरून स्टेज वरती पडद्यावर प्रोजेक्ट करत होता.
सिनेमातल्या प्रत्येक प्रसंगातून काहिनाकाहीतरी कल्पना, काहीतरी माहिती प्रेक्षकांना सांगितली जाते. आणि ही कल्पना सांगायला वेगवेगळे शॉट्स वापरले जातात. उदाहरणार्थ असा एक प्रसंग आहे असा विचार करू की एक स्त्री पात्र आहे, ती घरी सोफ्यावर बसली आहे, तिला एक फोन येतो, आणि ती तो फोन उचलते. बस! आता हाच प्रसंग वेगवेगळ्या शॉट्स मध्ये कसा विभागता येईल?
१. सोफ्यावर बसलेली स्त्री दाखवणे
२. तिला आलेला फोन दाखवणे
३. तिने फोन उचलला हे दाखवणे
तीन शॉट्स झाले? आता यातला प्रत्येक शॉट दाखवण्यासाठी वेगवेगळा कॅमेरा अँगल वापरावा लागेल.
१. सोफ्यावर बसलेली स्त्री दाखवण्यासाठी सोफा आणि स्त्री या दोन्ही गोष्टी दिसल्या पाहिजेत बरोबर? याचा अर्थ closeup घेऊन चालणार नाही. Wide शॉट पाहिजे.
२. तिला आलेला फोन दाखवण्यासाठी wide शॉट घेऊन चालणार नाही. कारण फोन ही छोटी वस्तू आहे, आणि फक्त फोन दाखवायचा असेल तर उगाच सोफा आणि त्यावर बसलेली स्त्री या दोन्ही गोष्टी दाखवून उपयोग नाही. फोन चा closeup पाहिजे. आता काहीजण या युक्तिवाद करू शकतात की फक्त रिंग वाजते यातून फोन आला हे दाखवू शकतो की आपण. बरोबर आहे. काहीही चूक नाही. पण मग तुम्हाला पहिल्या wide शॉट मधून मग बाहेरच यायची गरज नाही, बरोबर? म्हणजे तुमची फ्रेम बदलत नाही, आणि तुम्ही सिनेमाला नाटकासारखा वागवता. सिनेमा या माध्यमाचा वापर करून घेत नाही. (मी अजिबात म्हणत नाहीये की हे चूक आहे, प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतात.) आता तिला जो फोन येतो तो landline वर येतो, का mobile वर येतो का मनगटावरच्या घड्याळात दिसतो, हाही निर्णय इथे घेणं महत्वाचं आहे.
३. तिने आलेला फोन उचलला आणि कानाला लावला, यामध्ये तुम्हाला फक्त स्त्रीचा चेहरा, तिच्या हातात फोन आणि फोन कानाला लावला ही कृती दाखवणे गरजेचे आहे. पूर्ण wide शॉट ची गरज नाही, ज्यामध्ये सोफा वगैरे दिसतो आहे. कुठली नवीन माहिती मिळते आहे प्रत्येक शॉट मधून याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे जर पहिल्या wide शॉट मध्ये स्त्री सोफ्यावर बसलेली आहे हे दाखवलं आहे, तर परत सोफा दाखवून काय नवीन माहिती मिळणार आहे? स्त्री फोन उचलते ही नवीन माहिती आहे आणि त्याच्यावर फोकस करायला पाहिजे. तर हा मध्यम शॉट होऊ शकतो, अगदी closeup पण नाही, आणि अगदी wide पण नाही.
एका वाक्याच्या प्रसंगासाठी एवढा विचार सिनेमामध्ये करायला लागतो आणि हे सगळं पटकथेमध्ये लिहिणं गरजेचं असतं. जरी ते पटकथेमध्ये लिहिलं नसेल तरी ते शॉट्स शूटिंग च्या आधी माहिती असणं गरजेचं असतं. म्हणूनच मजकूर स्वरूपातली पटकथा ही चित्र स्वरूपात आणली तर या सगळ्या शॉट्स ची कल्पना नीट येऊ शकते. यालाच storyboarding म्हणतात. प्रत्येक कॅमेरा अँगल ला एक एक चित्र काढून जर प्रत्येक प्रसंगातल्या अँगल्स ची चित्रं काढून ठेवली तर नंतर तो सीन चित्रित करताना कुठले शॉट्स घ्यायचे याची माहिती सगळ्यांना होऊ शकते.
माझ्या “kevin” नावाच्या ४ मिनिटाच्या भयपटामध्ये २ प्रसंग होते, आणि २१ शॉट्स होते. त्याचा स्टोरीबोर्ड मी खालीलप्रमाणे काढला होता.
मी जी एक नवीन २ तासाची फिल्म करतो आहे, त्याच्यामध्ये १९० प्रसंग आहेत आणि १२०० शॉट्स आहेत. आपण त्या फिल्म चा स्टोरीबोर्ड जर केविन च्या स्टोरीबोर्ड शेजारी ठेवला तर असं चित्र दिसतं.
स्टोरीबोर्ड तयार करणं हे माझ्यासाठी तरी एक फार महत्वाची गोष्ट मी मानतो कारण त्यामुळे प्रत्येक प्रसंगामध्ये काय काय नक्की चित्रित करायचं आहे हे व्यवस्थित आधीपासून ठरवता येतं. हे जर आधीपासून ठरवलं नसेल तर फार सहजासहजी फिल्म वाहवत जाऊ शकते. आता गंमत अशी की Live action फिल्म्स मध्ये जरी तुम्ही आधीपासून असे शॉट्स प्लॅन केले असले तरीही ऐनवेळेला तुम्ही खूप बदल करू शकता, आणि अजून शॉट्स घेऊ शकता. कारण समोर जिवंत माणूस ठेवून कॅमेरा चालू करणं हे त्या मानाने सोपं आहे. परंतु ज्या ऍनिमेटेड फिल्म्स असतात, त्यांना हे जिवंत माणसाचं स्वातंत्र्य नसतं. त्यामुळे त्यांना आधी सगळी फिल्म स्टोरीबोर्ड वर नीट कळतीय की नाही हे ठरवावं लागतं आणि जेवढं हवं आहे तेवढंच ऍनिमेशन करावं लागतं. कारण त्यांना संपूर्ण माणूस, पात्र उभं करायचं असतं, त्याच्या physical हालचालींसकट. तुम्ही स्वतः आरशासमोर उभे राहून चेहऱ्यावर वेगवेगळे हावभाव करून बघा आणि किती muscle movement होते याचं निरीक्षण करा. आता हि प्रत्येक muscle movement डिजिटल स्वरूपात animators ना बनवावी लागते आणि त्यासाठी वर्षानुवर्षे जातात. म्हणून Pixar ची एक ऍनिमेशन फिल्म बनवायला सहज ४-५ वर्षे जातात. आणि त्याच्यासाठी storyboarding प्रचंड महत्वाचं असतं. वानगीदाखल pixar च्या storyboarding रूमचा एक फोटो इथे दाखवतो आहे.
इतका विचार या सगळ्या गोष्टींचा करून आता सिनेमामध्ये नक्की काय चित्रित करायचं हे ठरवलं जातं, आणि आता यापुढे ते कशानं चित्रित करायचं, कसं चित्रित करायचं याचे निर्णय येतात. त्या निर्णयांशी संबंधित Cinematography या कलाप्रकाराविषयी पुढच्या भागात बोलू.