Ashay Javadekar

View Original

11) दररोज नवे दहा हजार गुंतवणूकदार

Originally published on May 10, 1992

Written by Dr Dileep Javadekar

शेअर मार्केटमध्ये गुंतविलेल्या पैशांची झालेली प्रचंड वाढ काही उदाहरणे देऊन मागील लेखात पाहिली. मागच्या एका वर्षात तर या गुंतवणुकीत इतकी भरमसाठ वाढ झाली आहे की भल्याभल्यांचे डोळे दिपून गेले आहेत.

आपल्या देशाची अर्थव्यवस्था जास्तीतजास्त खुली करण्याच्या प्रयत्नात सध्या सरकार आहे. यासाठी पुष्कळ वस्तूनिष्ठ असे निर्णय घेण्यात आले आहेत, येत आहेत. येत्या काही वर्षांत कंपन्यांवरील बरेसचे निर्बंध उठवण्यात येणार आहेत. परकीय पैसा भारतातील उद्योगधंद्यात गुंतविण्यास मोकळीक दिली जाणार आहे. छोट्या गुंतवणूकदारांसाठी खासगी म्युच्युअल फंडांना परवानगी देण्यात येणार आहे. असे १०० म्युच्युअल फंड बाजारात उतरायला उत्सूक आहेत. रुपया क्रमश: पूर्णत: परिवर्तनीय करण्यात येणार आहे. आयात-निर्यात धोरण शिथील केले जात आहे. या आणि अशा सर्व धोरणांचा परिपाक म्हणून उद्योगधंद्यांची भरमसाठ वाढ होणार आहे. शेअरबाजारात कोट्यावधी रुपये प्रवेश करणार आहेत. जोपर्यंत बाजारात पैशांचा ओघ चालू असेल तोपर्यंत बाजार मागे वळून पाहणार नाही.

या अशा पार्श्वभूमीवर भारतातील शेअरमार्केटला येणारी दहा वर्षे अतिशय चांगली जातील असे भाकित केले तर ते फारसे चुकीचे ठरू नये. अतिउत्साही अंदाज जरी केले नाहीत तरी येत्या दहा वर्षांत आपली गुंतवणूक दहापट होण्यास काहीच हरकत दिसत नाही. म्हणजे एका वर्षात गुंतवलेले एक लाख रुपये दहा वर्षांत दहा लाखांपर्यंत सहजच वाढावेत, (हा अंदाज तसा फार जपूनच केला आहे. चक्रवाढ व्याजाच्या हिशेबाने दरसाल दरशेकडा २६-२७ चा व्याजदर जर मिळविला तर ही वाढ साधली जाईल. हा दर शेअरमार्केटला काही अशक्य नाही.)

शेअरमध्ये पैसे गुंतवण्याचे फायदे आपण मागील दहा लेखांत पाहिले. त्याची पुन्हा एकदा उजळणी करू. :

१) महागाई निर्देशांकाशी निगडीत अशी गुंतवणुकीमध्ये वाढ मिळते.

२) छोट्या रकमेपासून सुरुवात करता येते.

३) केव्हाही विक्री करून पैसे मोकळे करण्याचे स्वातंत्र्य असते.

४) डिव्हीडंडच्या रूपाने थोडे का होईना नियमित उत्पन्न मिळते.

५) कॅपिटल गेन टॅक्स हा इतर इन्कमटॅक्सच्या तुलनेत कमी असल्याने मिळवलेल्या नफ्यातील जास्त भाग आपल्या खिशात पडतो.

६) मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आपली गुंतवणूक असल्यामुळे आपली बचत ही कळत-नकळत राष्ट्र उभारणीच्या कार्यास मदत करते. शिवाय मोठ्या उद्योगांची अंशत: मालकी मिळाल्यामुळे आपली बचत आपल्याला एक अभिमानाची भावना देऊन जाते.

७) निरनिराळ्या अनेक प्रकारच्या उद्योगधंद्यात आपला पैसा गुंतत असल्यामुळे विविधतेचे फायदे आपल्याला मिळतात. एखाद्या वर्षी एखाद्या उद्योगाला मंदी आली तरी इतर शेअर्स पैसे मिळवून देतात आणि समतोल राखतात. स्वतंत्रपणे एखादा धंदा करायचा म्हटले तर अशी विविधता साधणे आपल्याला शक्य नसते. एखादा डॉक्टर फक्त दवाखाना - हॉस्पिटलच चालवतो. तो सिमेंटचा कारखाना काढत नाही. एखादा हॉटेलमालक कातड्याच्या चपला निर्यात करू शकत नाही. अशा अगदी भिन्न भिन्न धंद्यांमध्ये आपला पैसा आपण फक्त शेअरमार्केटद्वारेच गुंतवू शकतो.

८) बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेऊन एखाद्या धंद्याला मंदी येणार असे दिसताच ते शेअर्स आपण विकून टाकू शकतो. तसेच एखाद्या धंद्याला नवीन सरकारी धोरणांमुळे चांगले दिवस येणार असा होरा असल्यास पैसे तिकडे फिरवू शकतो. ही वारा फिरेल तशी पाठ फिरवण्याची कला इतर कोणत्याही स्वतंत्र उद्योगधंद्यात एवढ्या सहज जमण शक्य नसते. स्टीलचं भांड्याचं दुकान बंद करून ब्युटीपार्लर काढावं असं मनात आलं तरी ते जवळजवळ अशक्य असतं. निरनिराळ्या उद्योगातलं तंत्रज्ञान आत्मसात करणं एखाद्या माणसाला शक्य नसतं परंतु ते आत्मसात न करताही पैसे निरनिराळ्या उद्योगात शेअर्सच्या स्वरूपात गुंतवता येतात. या व्यवसायाला निवृत्ती नाही. कितीतरी सत्तरीच्या पुढचे लोक शेअरबाजारात उत्साहाने पैसा मिळवतात. आजारी, अर्धांगवायूने पछाडलेली माणसंही फोनवरून हा उद्योग करताना मी पाहिलेली आहेत.

या व्यवसायाला शहरात, हमरस्त्यावर जागा, गाळा भरमसाठ पैसे देऊन घ्यावी लागत नाही.

आपली व्यक्तीगत उपस्थिती या धंद्यात आवश्यक नाही. आपण आठ पंधरा दिवस गावाला जाणार असलो तरी ब्रोकरला सूचना देऊन गेलो तर आपला व्यवहार होतो. आजकाल कुठूनही पेपरातले भाव पाहून आपण एस.टी.डी. फोनद्वारे ब्रोकरशी संपर्क साधू शकतो. त्यासाठी आपले सुटीचे दिवस रद्द करून गावातच राहावे लागते असे नाही.

या आणि अशा अनेक फायद्यांकडे पाहून आज शेअरबाजाराकडे बरीच नवीन माणसें वळू लागली आहेत. दीड कोटी गुंतवणूकदारांची संख्या जोमाने वाढत आहे. रोज दहा हजार नवीन गुंतवणूकदार आपला पैसा घेऊन बाजारात उतरत आहेत. काही दिवसांत ही संख्या पाच कोटींच्या पुढे जाईल असे म्हणतात.

देशात आज २० शेअरमार्केटस् आहेत. ती संख्याही लवकरच ४० वर जाईल असा अंदाज आहे. तेव्हा शेअरमधील गुंतवणूक हे फक्त श्रीमंत, बेछूट सट्टेबाजांच कुरण न राहता सामान्य लोकांनी यात मोठ्या उत्साहाने प्रवेश करणं सुरू केले आहे. ही गाडी आपण पकडायची की नाही हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. परंतु मागे राहण्याला काहीच सबळ कारण नसेल तर हा प्रवास सुरू करायला काय हरकत आहे? न पसंत पडल्यास मधल्या एखाद्या स्टेशनला उतरून परत फिरता येईल. मात्र गाडी एकदा सुटून गेल्यावर अशी दुसरी संधी केव्हा येईल याची वाट पहात बसावं लागेल.

Ashay Javadekar

See this social icon list in the original post