Ashay Javadekar

View Original

12) शेअर बाजारातील व्यवहार

Originally published on May 17, 1992

Written by Dr Dileep Javadekar

मागील अकरा लेखांकांमध्ये पाहिलेली माहिती मनात ठेवून आता आपण शेअरबाजारात प्रत्यक्ष व्यवहार कसे करायचे याकडे वळायला हरकत नाही. यापेक्षाही खूप सखोल अभ्यास करता येणे शक्य आहे. परंतु प्रत्यक्ष सहभागाशिवाय अशा विवरणात्मक लेखांमधून फार काही साधले न जाता ते विवरण कंटाळवाणे होत जाण्याची शक्यता असल्यामुळे आता प्रत्यक्ष व्यावहारिक ज्ञानाकडे वळणे आवश्यक वाटते. ज्या वाचकांनी अजून शेअर खरेदी-विक्री केली नसेल परंतु ज्यांची तशी तीव्र इच्छा असेल त्यांनी आता थोड्या रकमेसहीत यात उडी घ्यायला हरकत नाही.

शेअर घेताना ते दोन प्रकार घेता येतात. प्रत्यक्ष बाजारात ब्रोकरच्या मध्यस्थीने सौदे करून जुन्या कंपन्यांचे शेअर विकत घेता येतात किंवा छापील अर्ज भरून पब्लिक इश्यूमधून शेअर मिळू शकतात. याला इंग्रजीमध्ये सेकंडरी मार्केट आणि प्रायमरी म्हणतात. आपण जरी शेअर खरेदी प्रायमरी मार्केटमध्ये केली तरी त्यांची विक्री मात्र स्वाभाविकपणे सेकंडरी मार्केटमध्येच करावी लागते. कारण एकदा विकलेले शेअर कंपनी परत घेत नाही. ते आपल्याला बाजारात विकावे लागतात.

सेकंडरी मार्केटपेक्षा प्रायमरी मार्केट हे नवोदित गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय असते. याचं कारण बऱ्याच वेळा प्रायमरी मार्केटमध्ये शेअर अ‍ॅट पर विकले जातात. म्हणजे दहा रुपयांचा शेअर दहा रुपयांनाच मिळतो. त्यामुळे शेअरची बुकव्हॅल्यू काय आहे, अर्निंग किती आहे वगैरे गोष्टीमध्ये डोके घालायला लागत नाही.

प्रायमरी मार्केटमध्ये दोन प्रकारचे ‘इश्यू’ निघू शकतात. एक म्हणजे पूर्णपणे नवीन कंपनी भांडवल उभारणीसाठी गुंतवणूकदारांकडे येते किंवा आस्तित्वात असलेली नफा मिळवणारी कंपनी काही विस्तार योजना, काही नवीन क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी, पैसे उभे करण्यासाठी पब्लिक इश्यू काढते. सामान्यत: नवीन कंपनी वर दिल्याप्रमाणे ‘अ‍ॅट पार’ इश्यू काढते मात्र जुनी कंपनी ‘इश्यू विथ अ प्रिमियम’ म्हणजे दहा रुपयांचा शेअर समजा तीस रुपयांना अशा प्रकारे इश्यू काढते. अर्थात या अस्तित्वात असलेल्या कंपनीच्या बाजारातील शेअरचा बाजारभाव या प्रिमियमपेक्षा पुष्कळ जास्त असतो. (असे जर नसेल तर गुंतवणूकदार अर्ज करीत न बसता प्रत्यक्ष बाजारातूनच शेअर घेतील.)

पूर्ण नवीन कंपनीसाठी अर्ज करताना काय खबरदारी घ्यावी लागेल? कोणत्याही नवीन भांडवल उभारणीपूर्वी कंपनीला एक माहितीपत्रक काढावे लागते. त्यात या नव्या कंपनीची बरीच माहिती असते. त्या कंपनीचे प्रवर्तक कोण आहेत, कंपनी कोणते उत्पादन करणार आहे, या उत्पादनाला देशात आणि परदेशात काय मागणी आहे, या उत्पादनाचा उपयोग इतर कोणत्या उद्योगधंद्यांना कच्चा माल म्हणून होणार आहे, कंपनीचा कारखाना कोठे आहे, तो सुरू व्हायला अजून अंदाजे किती महिने किंवा वर्षे लागतील, प्रवर्तकांनी स्वत: यात किती पैसे गुंतवले आहेत, इतर अर्थसंस्था आणि बँकांकडून किती कर्ज घेतले आहे, सुरुवातीला खर्च वजा जाऊन कंपनी नफा कितव्या वर्षापासून मिळवू लागेल, कंपनीच्या उत्पादनात इतर कोणत्या अडचणी येण्याची शक्यता आहे वगैरे बरीच माहिती या माहितीपत्रकात असते. बऱ्याच वेळ आपल्यापर्यंत ती येतच नाही. परंतु त्यातील संक्षिप्त माहिती आता शेअरच्या अ‍ॅप्लिकेशन फॉर्मसोबत देण्याची सक्ती आहे. तेव्हा नुसताच अर्धा फाडलेला फॉर्म स्वीकारू नये. ही माहिती जोडलेला जोड कागदच ब्रोकरच्या ऑफिसमधून मागून घ्यावा. प्रथम प्रत्येक गोष्टीचा अन्वयार्थ लावता आला नाही तरी ही माहिती वाचण्याची सवय स्वत:ला आवर्जून लावून घ्यावी. आपण एखाद्या इश्यूला अर्ज करणार नसलो तरीही ही माहिती वाचायचा प्रघात ठेवावा. आपल्याला ओघवती इंग्रजी भाषा येत नसली तरी सतत त्या भाषेत बोलायचा प्रयत्न करून आणि त्या लोकांमध्ये राहून जशी ती येऊ लागते तसेच या महितीचेही आहे. हळूहळू याचा अर्थ समजू लागतो.

नंतर आर्थिक विषयाला वाहिलेल्या नियतकालिकांमध्ये या नव्या इश्यूंबद्दल माहिती येते ती वाचावी. प्रॉस्पेक्टस् किंवा अर्जासोबतच्या कागदात एखादी नसलेली माहिती या नियतकालिकांमध्ये मिळू शकते. तसेच काही नियतकालिके या इश्यूंना ‘रेटिंगही देतात (म्हणजे शंभरपैकी मार्क देतात. त्यावरून एखाद्या आठवड्यात येणाऱ्या चार-पाच नव्या इश्यूंची तुलनात्मक माहिती कळू शकते.)

वरील सर्व माहिती वाचून झाल्यावर आपल्यासारख्याच परंतु मुरब्बी गुंतवणूकदारांनी या नव्या इश्यूची काय किंमत केली आहे हे पाहण्यासाठी त्यावर अनधिकृत प्रिमियम किती चालू आहे ती चौकशी ब्रोकरकडे करावी. (काही साप्ताहिके उदाहरणार्थ मनी अपॉर्च्यू-निटीज हा प्रिमियम छापतात.) प्रत्यक्ष शेअर वाटप होण्याआधीच या शेअरची अनधिकृत खरेदी-विक्री नुसती कागदावर सुरू होते. तिथे एखाद्या शेअरला किती रुपये ‘ऑन’ चालू आहे यावरूनही एखाद्या नव्या कंपनीला शेअर मार्केट काय वजन देते हे कळू शकते.

एवढी माहिती मिळाल्यावर अर्ज भरायला हरकत नाही.

Ashay Javadekar

See this social icon list in the original post