Ashay Javadekar

View Original

14) शेअर्सचे अर्ज भरण्याची पध्दत

Originally published on May 31, 1992

Written by Dr Dileep Javadekar

एखाद्या नव्या इश्यूमध्ये अगर जुन्या कंपनीच्या राईट कम पब्लिक इश्यूमध्ये पैसे गुंतवायचे ठरविल्यानंतर आपण काय करतो? तर तो अर्ज भरून पैसे पाठवतो. हा अर्ज भरताना आणि पैसे पाठवताना काय काळजी घ्यावी लागेल?

साधारणपणे शेअर्सचे अर्ज हे फारच लहान अक्षरात छापलेले असतात. असे अर्ज नेहमी भरणाऱ्यांना चाळीशीचा-जवळचे वाचण्याचा चष्मा लवकरच लागायला हरकत नाही. नुसती छापलेली अक्षरेच लहान असतात असे नाही तर त्यात आपण आपली माहिती भरण्यासाठी जी जागा सोडलेली असते तीही छोटीच असते. परंतु या छोट्या जागेतच आपले नाव स्वच्छ आणि सुवाच्य अक्षरात लिहावे. या नावावरच पुढील सारा पत्रव्यवहार आणि डिव्हिडंडचे चेक वगैरे येणार असतात. तेव्हा नाव आणि पत्ता कुणालाही वाचता येईल असाच भरावा.

सामान्यतः कोणताही अर्ज जोडनावावर करावा. यामुळे पहिल्या शेअरहोल्डरच्या मृत्यूनंतर फक्त त्याच्या मृत्यूचा दाखला कंपनीकडे पाठविल्यास शेअर्स दुसऱ्या नावावर केले जातात. जर अशी काळजी घेतली नसेल तर मात्र कोर्टाकडून वारसाला दाखला मिळवावा लागतो. ही काळजी घेणे आज अनावश्यक वाटेल तरी आवर्जून अशी सवय लावून घ्यावी. कारण असे कोट्यावधी रुपये आज गुंतवणूकदारांच्या निष्काळजीपणामुळे बँकांमध्ये आणि कंपन्यांमध्ये अडकून पडलेले असतात हे सांगून खरे वाटणार नाही. फॉर्मवर सही करताना सहीचा एकच नमुना ठेवावा. कधी मराठीत, कधी इंग्रजीत, कधी नुसती आद्याक्षरे अशा वेगवेगळ्या सह्या करू नयेत. अशाने कुठल्या कंपनीच्या रेकॉर्डला आपली कोणती सही आहे हे लक्षात न राहिल्याने शेअर्स विकताना अडचण येऊ शकते.

आपण किती पैसे पाठवणार आहोत, ते शेअर फॉर्मवर एक चौकट असते त्यातील कोष्टक पाहून ठरवावे. बहुतेकवेळा हे पैसे पुणे-मुंबईच्या बँकांमध्ये भरावे लागतात. क्वचितच ही सोय कोल्हापूर-सांगली-बेळगावला होऊ शकते. या बँकांची नावे आणि पत्ते फॉर्मच्या पाठीमागे असतात.

पैसे तीन प्रकारे पाठविता येतील. आपला अर्ज आणि रोख पैसे घेऊन आपण स्वत: किंवा आपला माणूस सदर बँकेत जाऊन पैसे भरू शकेल. सदर रकमेचा चेक अगर डिमांड ड्राफ्ट अर्जासोबत जोडून त्या बँकाकडे रजिस्टर पोस्टाने पाठविता येईल किंवा नव्या स्टॉक इन्व्हेस्ट योजनेद्वारे पैसे पाठविता येतील.

चेक किंवा ड्राफ्ट हा त्या त्या गावातच वठणारा लागतो. त्यामुळे अर्ज मुंबईला पाठविल्यास चेक किंवा ड्राफ्ट मुंबईच्या बँकेवरीलच हवा. चेक/ड्राफ्टवर काय नाव टाकायचे हे फॉर्मच्या मागील सुचनात लिहिलेले असते. उदा. ‘State Bank of India - A/c ABC Equity Issue’ वगैरे चेक अगर ड्राफ्ट पाकिटात घालताना हे नाव, रक्कम, वठविण्याचे शहर तपासून पहावे. तसेच ड्राफ्टच्या मागे पेन्सिलने आपल्या अर्जाचा नंबर लिहावा. म्हणजे अर्ज आणि ड्राफ्ट वेगळे झाल्यास गोंधळ होणार नाही.

नवीन स्टॉक इन्व्हेस्ट योजना काही बँकांमधून सुरू झाली आहे. ही गुंतवणूकदाराच्या दृष्टीने फारच आकर्षक योजना आहे. समजा आपण एखाद्या कंपनीला पाच हजार रुपये भरून अर्ज करणार असलो तर त्या योजनेद्वारे त्या बँकेत आपले सेव्हिंग खाते उघडून पाच हजार रुपये भरून घेतले जातात, आणि आपल्याला पाच हजार रुपये किमतीचे स्टॉक इन्व्हेस्ट दिले जाते. मात्र आपले पाच हजार रुपये आपल्या सेव्हिंग खात्यावरच राहतात. दोन-अडीच महिन्यांनी जर आपल्याला शेअर्स मिळाले तरच कंपनी त्या बँकेकडून ते पैसे उचलते. यामुळे दोन-अडीच महिन्यांचे आपल्या रकमेचे व्याज बुडत नाही. मात्र या मधल्या काळात हे पैसे अडकवून ठेवले जातात. म्हणजे ते आपल्याला इतर कोणत्या कारणासाठी काढता येत नाहीत एवढेच. ही योजना जिथे चालू असेल तिथे हिचा जरूर वापर करावा, इतकी ही चांगली आहे.

एवढी तयारी झाल्यावर आपला अर्ज आणि ड्राफ्ट किंवा स्टॉक इन्व्हेस्ट एकत्र पीन करून बँकेकडे रजिस्टर पोस्टाने पाठवावे. हे पाठविण्याआधी आपल्या अर्जाचा कमांक, पाठविलेली रक्कम, ड्राफ्टचा क्रमांक, अर्जावरचे पहिले नाव आणि या इश्यूचा पुढील पत्रव्यवहार कोणत्या पत्त्यावर करायचा तो पत्ता (हा पत्ता अर्जाच्या मागे तळाशी असतो.) आपल्या डायरीत लिहून ठेवावा. अर्जाच्या उजव्या, वरील कोपऱ्यात अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख असते. त्या तारखेच्या आत आपला अर्ज पोहोचेल असा पाठविल्यावर बँक शिक्का मारून अर्जाखालील कागदाची पट्टी पावतीच्या स्वरूपात आपल्याला परत पाठवेल. ती जपून ठेवावी.

हल्ली खासगी कुरियर सर्व्हिसेस हे अर्ज पोहोचविण्याचे आणि वरील पावती शिक्का मारून परत आणण्याचे काम करतात. विश्वासू कुरियर हुडकून त्यांच्यावर हे काम सोपविल्यास पोस्टापेक्षा ही कामे जलद होतात असा अनुभव आहे.

Ashay Javadekar

See this social icon list in the original post