Ashay Javadekar

View Original

16) शेअर्सचे व्यवहार कसे चालतात

Originally published on June 14, 1992

Written by Dr Dileep Javadekar

गुंतवणुकीच्या माध्यमांचा विचार करता करता हळूहळू आपण कंपन्या, शेअर्स, डीबेंचर्स यांची माहिती घेतली. नवीन शेअर्ससाठी अर्ज कसे भरावे हेसुद्धा पाहिले. एवढे सगळे झाल्यावर आता खऱ्या अर्थाने शेअर बाजारात शिरण्याशिवाय आपल्याला गत्यंतर उरलेले नाही. कारण मागेच सांगितल्याप्रमाणे नवीन अर्ज करून मिळालेले शेअर्स विकण्यासाठी तेवढा एकच मार्ग आहे.

शेअर मार्केट, स्टॉक मार्केट किंवा स्टॉक एक्स्चेंज ही नावे शेअर बाजारासाठीच वापरली जातात. स्टॉक ही अमेरिकन संज्ञा आहे. दूसरा एक शब्द वापरता येतो तो म्हणजे सिक्युरिटीज! सिक्युरिटी हे नाव शेअर, डीबेंचर अन्य बचतपत्रे यांना सगळ्यांना मिळून दिलेले आहे.

शेअर मार्केटबद्दल सामान्य माणसाला फार कमी माहिती असते. दूरदर्शनवर दाखविलेल्या शेअर मार्केटच्या चित्रांमुळे तो चक्रावून जातो. मासळी बाजाराप्रमाणे आरडा ओरडा आणि ओढाओढ असलेल्या या ठिकाणी पैशाचे व्यवहार कसे होत असतील हे त्याला कोडे पडते.

आज देशात एकूण वीस शेअर मार्केट आहेत. त्यातील मुंबईचे मार्केट अग्रगण्य मानले जाते. या मुंबई शेअर बाजाराची अधिकृत स्थापना १८७५ मध्ये झाली. त्याआधी हे सौदे फारच कमी प्रमाणात होत असत. मोजके पाच-सहा दलाल आज मुंबईत जे हॉर्निमन सर्कल आहे तिथे एका वडाच्या झाडाखाली जमत आणि शेअर्सचे सौदे करीत नंतर हळूहळू कंपन्या वाढत गेल्या. या सौद्यांना अधिकृतता आली. आज मुंबई स्टॉक एक्स्चेंजची स्वत:ची अशी भव्य इमारत उभी आहे. तिथे पाचशेहून जास्त अधिकृत दलाल सौदे करतात.

नंतर १८९४ मध्ये अहमदाबाद इथे तर १९०८ मध्ये कलकता इथे स्टॉक एक्स्चेंज सुरू झाली. आपल्या महाराष्ट्रात दुसरे स्टॉक एक्स्चेंज पुण्याला १९८२ ला चालू झाले.

हे शेअर मार्केट, त्यातील दलाल, तो आरडा-ओरडा यांची गरज कशी निर्माण होते हे समजून घेतले तर त्यात काही नवलाईची गोष्ट नाही हे पटेल. त्यासाठी आपण एखादी गोष्ट विकायला किंवा विकत घ्यायला गेलो तर काय करतो, याचा विचार करावा लागेल. समजा आपल्याला आपली जुनी स्कूटर विकायची आहे, तर आपण काय करतो? आपल्या चार मित्रांना तसे सांगून कुणी घेणार असल्यास संपर्क साधायला सांगतो. दोन-चार गॅरेजमध्ये सांगून ठेवतो. क्वचितप्रसंगी पेपरमध्ये छोटी जाहिरात देतो. हे सर्व आपल्याला का करावे लागते? खरेदीदार कोण आहे हे आपल्याला ठाऊक नसते. त्याचा आणि आपला संपर्क जुळून यावा यासाठी हे प्रयत्न करावे लागतात. आपल्या आसपास किती तरी जण सेकंड हँड स्कूटर घ्यायच्या विचारात असण्याची शक्यता असते. परंतु आपली स्कूटर विकायची आहे हे त्यांना माहित नसते. कारण त्यांची आपली ओळख नसते. ही ओळख होण्यासाठी मध्यस्थाची गरज लागते. हा मध्यस्थ म्हणजेच दलाल! आता काही गॅरेजवाले दर रविवारी अशा सेकंड हँड गाड्यांच्या खरेदी-विक्रीचा मेळा भरवतात. या मेळ्यात आपले जुने वाहन विकू इच्छिणारेही येतात आणि खरेदी मनात असलेलेही येतात. म्हणजे प्रत्यक्ष ओळख नसली तरी खरेदी-विक्रीची इच्छा असली तर अशा मेळ्याच्या ठिकाणी जाऊन आपण त्या लोकांत सहभागी होऊ शकतो. अशा वेळी निरनिराळ्या चार स्कूटर खरेदीसाठी आपण तुलनात्मकदृष्ट्या पाहू शकतो. तसेच विकणाऱ्याला कमी-जास्त पैसे देणारे चार भिन्न ग्राहक भेटू शकतात. खरेदीदार आणि विक्रेते अशा दोघांनाही परस्पर ओळख नसताना एकत्र आणण्याचे काम असे बाजार करतात. यामुळे वेळही वाचतो आणि वर दिल्याप्रमाणे खुल्या वातावरणात निवड करायला आणि भाव ठरवायला जास्त संधीही मिळते.

शेअरबाजाराचेही असेच आहे. प्रत्यक्ष मोठ्या शेअर बाजारातील तंत्र समजावून घेण्याआधी छोट्या प्रमाणात सांगली, कोल्हापूरसारख्या शहरांत शेअर होल्डर्स ज्या संस्थामध्ये एकत्र येऊन ही खरेदी-विक्री करतात तिथली रचना आणि कामे कशी चालतात हे पाहिले तर त्यावरून मोठ्या मार्केटची कल्पना करणे अगदी सोपे जाईल.

सांगली, कोल्हापूर, जयसिंगपूर या गावांमध्ये तिथल्या शेअर गुंतवणुकीमध्ये आवड असलेल्या लोकांनी अशा संस्था स्थापन केलेल्या आहेत. साधारणपणे आठवड्यातून एकदा हे लोक सभा घेऊन एकत्र जमतात. आपल्याला काही शेअर्स विकायचे किंवा घ्यायचे असतील, तर या सभेला लोक हजर राहतात. तसेच प्रत्यक्ष खरेदी-विक्री न करताही केवळ होणाऱ्या सौद्यांची माहिती मिळविण्यासाठी लोक इथे आवर्जुन येतात.

जास्त गर्दी होऊन गोंधळ होऊ नये म्हणून या इन्व्हेस्टर्स असो-सिएशनचे एक नियामक मंडळ निवडलेले असते. तसेच काही वर्गणी घेऊन इच्छुक लोकांना सभासद करून घेतलेले असते. तसे सभासद क्रमांक असलेले ओळखपत्रही त्या त्या माणसांना देण्यात येते.

हे सभासद एकमेकात शेअर्स खरेदी-विक्रीचे व्यवहार करू शकतात. तसेच सभासद नसलेल्या मित्रमंडळींचे शेअर्सही हे लोक स्वत:च्या नावावर विकू अगर घेऊ शकतात.

प्रत्यक्ष व्यवहार कसे होतात हे पुढील लेखात पाहू.

Ashay Javadekar

See this social icon list in the original post