19) शेअर्स विकत कसे घ्यायचे?
Originally published on July 5, 1992
Written by Dr Dileep Javadekar
प्रत्यक्ष स्टॉक एक्स्चेंजच्या रिंगमध्ये ब्रोकर्स जॉबरच्या मध्यस्थीने व्यवहार कसे करतात हे आपण पाहिले. परंतु खरे तर ही माहिती आपल्याला केवळ एक माहिती म्हणूनच उपयोगी पडेल. कारण आपण स्वत: तर रिंगमध्ये कधीच जाणार नाही आणि रिंगच्या आसपास जाऊन उभे राहणेही शेअर्स खरेदी-विक्रीसाठी आवश्यक नाही. आपण स्टॉक मार्केटपासून शेकडो मैलांवर राहात असल्यामुळे ते आपल्याला शक्यही नाही.
मग आपण शेअर्स विकत कसे घ्यायचे? त्यासाठी आपल्याला एखादा शेअर ब्रोकर गाठून त्याच्याकडे आपली ऑर्डर द्यायला पाहिजे. आपण पाहिल्याप्रमाणे प्रत्यक्ष शेअरमार्केटमधील रिंगमध्ये अधिकृत शेअर ब्रोकरच जाऊ शकतो. आता मुंबईतील अधिकृत शेअर ब्रोकर आपल्याला सांगली, कोल्हापूरमध्ये कसा भेटेल? स्वाभाविकपणेच त्याचं कार्यालय मुंबईमध्येच असणार. आता यासाठी आपण त्याला एक तर पोष्टाने किंवा फोनवरून एस.टी.डी. द्वारे ऑर्डर देऊ शकू. परंतु अशी ऑर्डर घेण्याआधी त्याची आपली ओळख असायला हवी, अन्यथा तो आपली छोटी ऑर्डर घेणार नाही.
वरील गोष्टीला पर्याय म्हणून आपल्याला आपल्याच गावात एखादा सब ब्रोकर किंवा उपदलाल गाठता येईल. या सबब्रोकरचे मुंबईच्या एखाद्या अधिकृत ब्रोकरकडे खाते असेल. आपल्यासारख्या बऱ्याच ग्राहकांच्या ऑर्डर्स एकत्र करून तो त्या मुंबईच्या ब्रोकरकडे फोनने कळवेल.
समजा आपल्याला शंभर मास्टर शेअर्स घ्यायचे आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या गावातील सब ब्रोकरकडे आपल्याला तशी ऑर्डर द्यावी लागेल. या पर्चेस ऑर्डरमध्ये दोन प्रकार आहेत. एक तर आपण त्या खरेदीसाठी जास्तीत जास्त किती किंमत द्यायला तयार आहोत ते सांगता येईल, म्हणजे ‘शंभर मास्टर शेअर्स ५५ रुपयांना द्या’ याचा अर्थ जास्तीत जास्त ५५ रुपये दरानेच ही खरेदी करायला आपण तयार आहोत. त्याहून जास्त दर असल्यास आपल्याला खरेदी करायची नाही. या ऑर्डरला ‘लिमिट ऑर्डर’ असे म्हणतात. परंतु आपण पाहिल्याप्रमाणे मार्केटमध्ये चढ-उतार क्षणा-क्षणाला होत असतात. पेपरात कालचा ५४-५५ भाव पाहून आपण ५५ ची लिमिट दिली आणि आज भाव ५६-५८ असा वर खाली होत राहीला तर आपली ऑर्डर पुरी होणार नाही. बरे तो ५५ पर्यंत कधी उतरतो हे पाहत बसणं एका ऑर्डरसाठी ब्रोकरला किंवा त्याच्या प्रतिनिधीला शक्यही नसतं. यासाठी त्याला किमतीबद्दल थोडे स्वातंत्र्य दिले तर तो जास्त चांगल्या रीतीने तत्परतेने आपल्याला सेवा देऊ शकेल. म्हणून शंभरमास्टर शेअर्स घ्या अशी नुसती ऑर्डर आपण दिली तर कदाचित ५६ रुपयांना आणि आपल्या नशिबानं भाव थोडे नरम आले तर कदाचित ५२-५३ रुपयांना आपली खरेदी त्वरित होईल. या ऑर्डरला ‘बेस्ट प्राइज ऑर्डर म्हणतात. म्हणजे त्यातल्या त्यात चांगला भाव पाहून खरेदी करा’ अशी ऑर्डर! यातही ब्रोकर त्याच थोडे डोके वापरेल. म्हणजे भाव एकदमच ६०-६५ असे येऊ लागले तर जरा थांबेल, वाट पाहील असे. परंतु अशी वाट किती पाहायची हे मार्केटचा नूर पाहून त्याचा तो ठरवेल. जरी ‘बेस्ट प्राईस’ म्हणजे ‘उत्तम किंमत’ असा अर्थ असला, तरी आपल्याला पडलेला दर हा सर्वात कमी असेल असे धरून चालू नये. कारण थोड्या वेळानंतर काय भाव होणार आहेत हे ब्रोकरलाही समजणं शक्य नाही. परंतु ‘बेस्ट प्राईज ऑर्डर’ लौकर पुऱ्या केल्या जातात आणि ‘लिमिट ऑर्डर’ मागे राहतात असा सामान्य अनुभव आहे. कशाप्रकारे ऑर्डर द्यावी हे ज्या त्या वेळेची आपसी गरज आणि मार्केटचा मूड पाहूनच ठरवावे.
शेअर्स विकतानाही आपण आपल्या ब्रोकरला (किंवा सब ब्रोकरला) अशीच ‘लिमिट’ किंवा ‘बेस्ट प्राईस’ ऑर्डर देऊ शकतो.
आपली ही ऑर्डर जर आपले शेअर्स सहज मिळण्यासारखे अगर विकले जाण्यासारखे असले तर त्याच दिवशी अधिकृत स्टॉकमार्केटमध्ये अंमलात आणली जाईल. परंतु अशी ऑर्डर घेताना आपल्याकडून ब्रोकर काही मागणी करण्याची शक्यता आहे. शेअर्स विकण्याची ऑर्डर असल्यास तो ती शेअर सर्टिफिकेटस् आधी मागेल. जर खरेदीची ऑर्डर असेल तर अंदाजे रकमेच्या काही टक्के रक्कम तो आधी मागेल. ही रक्कम किती मागावी असे काही बंधन नाही. तुमच्या आणि ब्रोकरच्या परस्पर विश्वासावर हे ठरते. परंतु एक लक्षात ठेवावयास हवे. विश्वास हा हळू हळू वाढत जात असतो. एखादा ब्रोकर पहिल्या पहिल्यांदा आधी पैसे मागतो म्हणून तो आपला अपमान करतो असे समजू नये. जुन्या ग्राहकांच्या लाख रुपयांच्या ऑर्डर्स तो नुसता फोनवर घेतो आणि आपले मात्र काही हजार रुपये आधी मागतो, अशी कुणाशी तुलना करू नये. हळू हळू विश्वास संपादन झाल्यावर तोही आपल्या ऑर्डर्स दूरध्वनीवरून घेणारच असतो. तसेच विकताना शेअर सर्टिफिकेटस् आधी मागण्यातही काही चूक नसते. कारण काही शेअर्स ‘पार्टली पेड’ (अर्धेच पैसे भरलेले) असतात. काही डिबेंचर्स कनव्हर्शन होऊनसुद्धा शेअर सर्टिफिकेट या स्वरूपात आलेली नसतात वगैरे गोष्टी नव्या गुंतवणूकदारांना माहिती नसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा आपली आणि ब्रोकरची चांगली ओळख होईपर्यंत दोन्हीकडून व्यवहाराला चोख राहिले तर त्यात राग मानण्याचे कारण नाही.