Ashay Javadekar

View Original

1) प्रगतीचे मूळ : बचत

Originally published on March 1, 1992

Written by Dr Dileep Javadekar

पैसा मिळवणे एक वेळ सोपे असेल, परंतु पैसा वाचविणे हे कठीण काम आहे. कारणे अनेक आहेत. वाढत्या महागाईने आम्ही बेजार झालो आहोत. महिन्याचा खर्चच पगारामध्ये भागत नाही, तर बचत कुठून करणार असे पगारदार म्हणतील. अलीकडे धंद्यात पुरेसे मार्जिन राहिलेले नाही, आपण आहे तिथेच राहण्यासाठीसुद्धा खूप जास्त पैसा धंद्यात लावावा लागतो, असे धंदेवाले-व्यावसायिक म्हणतात. मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढला आहे, असे पालक सांगतील. तर इतर मित्रमैत्रिणींबरोबर राहायचे तर एवढा खर्च होणारच, असे मुले सांगतील. कारणे काहीही असोत. परंतु पैसा वाचविणे कठीण होत चालले आहे हे खरे. परंतु हे कठीण आव्हान न झेलल्यामुळं आपला काय तोटा होतो याचा कुणी विचार करतो का?

पूर्वीच्या काळी.. म्हणजे अगदी पूर्वी अश्मयुगात मनुष्यप्राणी रानात राहत होता. त्याच्या आणि पशूंच्या राहणीत काही फरक नव्हता. नंतर हळूहळू त्याची प्रगती होत गेली आणि तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा-जास्त प्रगत बनत गेला. ही प्रगती कशामुळे झाली? त्याच्या बुद्धिमुळे? बरोबर! पण ही बुद्धी वापरायला त्याला सवड कशी मिळाली? माणूस आणि इतर रानटी पशू यात सर्वप्रथम काय फरक पडू लागला? या प्रश्नाच्या मुळाशी गेल्यावर आपल्या लक्षात येईल, की माणूस संचय करू लागला आणि तिथेच मूळ बदल घडला, तोपर्यंत रोजचे अन्न मिळविण्यासाठी मनुष्यप्राण्याला इतर प्राण्यांसारखेच झगडावे लागत होते. शिकारीला जावे लागत होते. त्यातच त्याचा दिवसाचा बहुतांश वेळ आणि शक्ती खर्च होत होती. सर्व बुद्धीही या रोजच्या गुजाऱ्यातच वाया जात होती.

या अस्तित्वासाठी कराव्या लागणाऱ्या झगड्यामध्ये काही पिढ्या तशाच मरूनही गेल्या असतील. परंतु पुढे माणसाच्या लक्षात आले की, मोठी शिकार मिळाली किंवा जास्त खाद्यपदार्थांचा साठा करून ठेवला तर आपल्याला ही रोजची धावपळ करावी लागत नाही. यातूनच तो शेती करू लागला, अर्थात यामुळे मिळालेला मोकळा वेळ तो इतर विचारांमध्ये किंवा अन्य कृतीमध्ये घालवू लागला आणि यातूनच मग त्याला इतर शोध लागत गेले. त्याने नवनवीन अवजारे बनवली, चाकाचा शोध लावला, धातू-मिश्रधातू हुडकून काढले. टोळी करून समाजव्यवस्था उभी केली. जर रोजच्या रोज त्याला धकाधकीमधून मोकळी सवड मिळू शकली नसती तर हे काहीच झाले नसते. यामुळे इतर पशू आणि मनुष्यजात यात एक मोठा फरक पडला. संचय करणारा प्राणी म्हणजे माणूस अशी माणसाची व्याख्या त्यामुळे करता येऊ लागली. या संचयामुळे त्याच्या रोजच्या जीवनात एक स्थैर्य आले.

अश्मयुगातील या प्रगतीच्या गोष्टीपासून आज आपण काय शिकू शकतो? आजच्या प्रगत समाजामध्ये आपल्याला काय दिसून येते.

ज्या माणसाकडे जास्त संचय आहे त्याच्या आयुष्यात, त्याच्या कुटुंबाला एक प्रकारचे स्थैर्य असते. अर्थात, अशा कुटुंबातील मुलेच पुढे प्रगती करतील, शकतील, असे मुळीच नाही. तरीही रोजच्या जमाखर्चाच्या तोंडमिळवणीसाठी ज्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला दिवसरात्र धडपडावे लागते, त्या कुटुंबातली मुले काही नवीन, उच्च संशोधन करतील, तर समाजाला, देशाला त्यांच्या बुद्धीला काही मोठा उपयोग होईल अशी अपेक्षा करणे हे थोडेसे चुकीचे होऊ शकते. ज्या माणसाकडे, स्वत:च्या कुटुंबाला व्यवस्थितपणे पुरेल असा पैसा निवृत्तीच्यावेळी साठवलेला असेल, अशा माणसाची मुले उच्च प्रगत शिक्षणासाठी आपल्या आयुष्याची काही वर्षे निर्विवादपणे देऊ शकतात. ही बेगमी आपल्या आयुष्यात जो करू शकला नाही त्याच्या मुलांना लवकरच शिक्षण थांबवून कमाईसाठी बाहेर पडावे लागते.

वरील विचारांमध्ये नवीन असे काहीच नाही. परंतु आपल्या रोजच्या धावपळीमध्ये आपण हे विचार रोज मनात ठेवतोच असे नाही. काही काही वेळा पुरेसे पैसे मिळवत असूनदेखील त्यातून उद्यासाठी काही ठेवायला हवे, याचे भान आपल्याला नसते आणि मग असा विचार कधी आलाच तर अनेक सबबी आपण सांगतो. या सबबी पूर्णपणे खोट्या आहेत असे नाही. परंतु आज आपण ज्या महागाईच्या काळात आयुष्य जगतो आहोत त्यातूनच आपल्यालां काही बचत काही संचय करायला हवा. नुसती महागाईबद्दल ओरड करीत बसलो तर आयुष्याची संध्याकाळ कधी आली ते समजणारही नाही आणि आपली पुढची पिढी अधिक वाईट परिस्थितीत सापडेल. आपल्यापेक्षा चांगल्या परिस्थितीत पुढच्या पिढीला सुरुवात करून देणे हे आजच्या प्रत्येक माणसाचे कर्तव्य नाही का?

Ashay Javadekar

See this social icon list in the original post