Ashay Javadekar

View Original

20) खरेदी ऑर्डरचा पाठपुरावा कसा करायचा?

Originally published on July 12, 1992

Written by Dr Dileep Javadekar

मागील लेखात आपण आपल्या ब्रोकरला (अगर सब ब्रोकरला) आपली खरेदीची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरचे पुढे काय होते आणि त्याचा आपण काय पाठपुरावा करायचा हे आता पाहू.

समजा आपण एखादी लिमिट ऑर्डर दिली आहे (उदाहरणार्थ मागील लेखात सांगितलेली ‘१०० मास्टरशेअर्स ५४-५५ भावाने घ्या’ अशी ऑर्डर दिली आहे असे समजू). ब्रोकरच्या मागणीप्रमाणे समजा आपण २५ टक्के रक्कम (म्हणजे अंदाजे १४०० ते १५०० रुपये) त्याच्याकडे पाठविली. हे पैसे पाठविल्यावर ब्रोकर आपल्याला त्याची पोचपावती देईल. मास्टरशेअर्सच्या खरेदीसाठी १५०० रुपये ‘मार्जिन’ म्हणून मिळाले अशी नोंद त्यावर असेल. ही पावती आपण प्रथम जपून ठेवू.

आता मास्टरशेअर हा रोजच्या रोज भरपूर प्रमाणात विकला व खरेदी केला जाणारा शेअर असल्यामुळे आपली ऑर्डर त्याच दिवशी अमलात यायला काही अडचण येणार नाही. दुपारी १२ ते २ या दरम्यान अधिकृत स्टॉक एक्स्चेंजवर आपली खरेदी होईल आणि आपल्या सबब्रोकरला ती माहिती सायंकाळपर्यंत कळेल. सायंकाळी तो आपल्याला ‘तुमचे १०० मास्टरशेअर्स ५५ रुपये भावाने घेतले’ अशी माहिती चौकशी केल्यावर सांगेल. अशी चौकशी आपण केलीच नाही तरी ब्रोकर ही माहिती तुम्हाला फोन करून कळवेल. परंतु आपल्या ऑर्डरचा पाठपुरावा आपणच केलेला केव्हाही चांगला नंतर तो ब्रोकर आपल्याला एक ‘कॉन्ट्रॅक्ट नोट’ किंवा बिल देईल. यावर १०० मास्टर शेअर्स ५६ रुपये ५० पैसे भावाने (५५ रुपये खरेदी आणि १ रु. ५० पैसे दलाली) खरेदी केले असे लिहून त्यावर ब्रोकरने सही केली असेल. ही ‘कॉन्ट्रॅक्ट नोटही’ आपण जपून ठेवू. दलालीचा दर साधारणपणे २ ते ३ टक्क्यांपर्यंत पडावा अशी अपेक्षा असते.

आता ही खरेदी होऊनही आपल्या हातात शेअर नसतातच. शेअर प्रमाणपत्र हातात यायला दीड-दोन (किंवा जास्तही) महिने लागतात. या काळात आपले पैसे उगीच अडकून पडतात असा काही नवीन गुंतवणूकदारांचा समज आहे. परंतु प्रत्यक्षात तसे नसते. वरील ‘कॉन्ट्रॅक्ट नोट’च्या तारखेपासून आपण त्या शेअर्सचे मालक झालेलो असतो. पुढील आठवड्यात जर याच मास्टर शेअर्सचा भाव ७५ रुपये झाला तर हातात सर्टिफिकेटस् नसतानाही आपण हे खरेदी केलेले १०० शेअर्स ७५ रुपये भावाने विकू शकतो. मात्र ही विकण्याची ऑर्डर साहजिकच आपल्याला त्याच ब्रोकरकडे द्यावी लागेल कारण त्यानेच आपली खरेदी केलेली असल्याने त्या कॉन्ट्रॅक्टची सत्यासत्यता त्याला पटवून द्यावी लागणार नाही. मात्र दुसऱ्या ब्रोकरकडे विकण्याची ऑर्डर दिली आणि त्याने आपल्याकडे शेअर प्रमाणपत्र मागितली तर ती आपल्याकडे नसतात आणि परक्या ब्रोकरची ‘कॉन्ट्रॅक्ट नोट’ स्वत:च्या सुरक्षिततेसाठी नवीन ब्रोकर स्वीकारणार नाही. परंतु एवढे त्याच ब्रोकरकडे विकण्याचे पथ्य आपण पाळले तर अगदी दुसऱ्या दिवसापासून आपण ते शेअर्स विकू शकू.

समजा आपण शहरात एक फ्लॅट बुक केला तर प्रत्यक्ष त्या फ्लॅटचे बांधकाम पूर्ण व्हायला दोन वर्षे लागणार असली तरी या काळात आपला विचार बदलल्यास आपण तो बांधून पूर्ण न झालेला फ्लॅट तिसऱ्या व्यक्तीस विकू शकतो. (आणि मधल्या काळात फ्लॅटस्च्या वाढलेल्या भावाचा फायदा घेऊ शकतो). तसेच हे आहे.

आता या कॉन्ट्रॅक्ट नोटच्या एकूण ५६५० रुपयांपैकी १५०० रुपये आपण आधी दिलेले आहेत. उरलेले पैसे कधी द्यायचे? इथे पुन्हा ब्रोकरच्या आणि तुमच्या संबंधाचा प्रश्न येतो, प्रत्यक्ष या शेअर्सची आणि पैशाची देवाणघेवाण ब्रोकर्समध्ये आपापसात १५ दिवसांतून एकदाच होते. या तारखा आधीच ठरलेल्या असतात. यावेळी ब्रोकर्स आपापसात ‘क्लिअरिंग’ पद्धतीने व्यवहारपूर्ती करतात. म्हणजे आपण जरी १०० मास्टरशेअर्स खरेदी केलेले असले तरी आपल्या ब्रोकरने या १५ दिवसांत बऱ्याच वेळा बऱ्याच ग्राहकांसाठी मास्टरशेअर्सची खरेदी आणि विक्री केली असेल. तेव्हा शेवटी अधिक-वजा करून तो कोणत्या ब्रोकरला किती सर्टिफिकेटस् देणे किंवा घेणे आहे हे ठरेल. ही सर्व पूर्तता अधिकृत नियामक मंडळाच्या देखरेखीखाली केली जाईल आणि आपले शेअर्स त्यानंतर आपल्या सबब्रोकरकडे येतील. याला ‘डिलिव्हरी येणे’ असे म्हणतात. आपला ब्रोकर या डिलिव्हरीच्या येण्याआधी आपल्याकडून उरलेले पैसे मागेल किंवा काही वेळा स्वत:चे पैसे गुंतवून डिलिव्हरी घेईल आणि आपल्याला शेअर्स देताना उरलेले पैसे मागेल. ही डिलिव्हरी आल्यावर प्रत्यक्ष हे शेअर आपण हातात घेतो, तोपर्यंत आपण फक्त कॉन्ट्रॅक्ट नॉटचेच धनी असतो.

Ashay Javadekar

See this social icon list in the original post