22) ट्रान्स्फर अर्ज भरण्याची पद्धती
Originally published on July 26, 1992
Written by Dr Dileep Javadekar
आपल्याकडील ‘बेअरर डिलिव्हरी’ (म्हणजे शेअर सर्टिफिकेट आणि आधीच्या मालकाने सही केलेला ट्रान्स्फर अर्ज) एकदा नावावर चढवून घेण्यासाठी पाठवायची असे ठरविल्यावर आपल्याला काय काय करावे लागेल?
प्रथम आपल्याला हा ट्रान्स्फर अर्ज पूर्ण भरावा लागेल. त्यासाठी त्यात अनेक मोकळ्या जागा असतील. त्या नीट वाचून सुवाच्च्य अक्षरात भराव्या लागतील. अर्ज भरण्यात काहीही खाडाखोड झाली तर त्या दुरुस्तीच्या ठिकाणी विकणारा आणि घेणारा (सेलर आणि बायर) दोघांच्या सह्या हव्यांत, असा नियम आहे. खाडा-खोडीच्या जागी आपण आपली सही करू शकू. परंतु विकणाऱ्याची सही तिथे मिळविणे हे जवळजवळ दुरापास्त आहे. कारण ही डिलिव्हरी आपल्याला मुंबई, बडोदा, अहमदाबाद, दिल्ली अशा कोणत्याही गावाहून आली असण्याची शक्यता आहे. तेव्हा अर्ज भरताना कोणतीही चूक किंवा खाडाखोड करणे कटाक्षाने टाळायला हवे.
ट्रान्स्फर अर्ज हा इंग्रजीमध्ये असतो. त्यावर आपल्याला वरपासून खालील गोष्टी इंग्रजीमध्येच भराव्या लागतील.
१) कंपनीचे पूर्ण नाव इथे आपल्या शेअर सर्टिफिकेटवरील कंपनीचे पूर्ण नाव तसेच लिहावे. काही वेळा कंपनीचे नाव बदललेले असते. उदाहरणार्थ, पूर्वीचे नाव ‘झेनिथ स्टील पाइप्स लिमिटेड’ हे बदलून आता ‘झेनिथ इंडस्ट्रीज लिमिटेड’ झाले आहे. या बदललेल्या नावाचा शिक्का त्या सर्टिफिकेटवर कंपनीने मारलेला असेल तसा तो नसल्यास जुनेच नाव फॉर्ममध्ये भरल्यास काही बिघडत नाही. शेअर्स ट्रान्स्फर होऊन येताना कंपनी नवीन शिक्का मारून पाठवेल.
२) कोणत्या अधिकृत स्टॉक एक्स्चेंजवर कंपनीची नोंदणी आहे? इथे बहुतेक वेळा मुंबई हेच उत्तर येईल. मुंबईत कंपनीचे ‘लिस्टिंग’ नसल्यास ब्रोकरला विचारून मद्रास किंवा कलकत्ता वगैरे लिहावे लागेल.
३) किती शेअर्स या अर्जासोबत पाठविले आहेत? हे अंकात आणि अक्षरात लिहावे लागेल.
४) त्या शेअर्सची बाजारातील किंमत म्हणजे आपल्याला पडलेलीच किंमत असेल, असे नाही. समजा, आपण बेअरर डिलिव्हरी चार महिने तशीच बाळगली आणि नंतर ट्रान्स्फरसाठी पाठविली तर अर्ज ज्या दिवशी भरू (किंवा अर्जावर जी तारीख भरू) त्या दिवशीचा अधिकृत स्टॉक एक्स्चेंजमधील भाव पेपरमध्ये पाहून ही किंमत काढावी. काही काही वेळा विक्रेत्यांच्या गरजेपोटी तो आपल्याला स्थानिक बाजारात शेअर स्वस्तही देईल, परंतु इथे फॉर्मवर मात्र अधिकृत बाजारभावच लिहायला हवा.
५) Distinctive Numbers इथे शेअर्सचें Distinctive Numbers सर्टिफिकेटवर पाहून नीट लिहावे हे From आणि To असे असतील.
६) Corresponding Certificate Nos. वरील Distinctive Nos. खालीच त्या सर्टिफिकेटचा क्रमांक लिहावा. समजा, आपण १०० शेअर्स घेतले आणि त्यांचे एक सर्टिफिकेट असेल तर हा सर्टिफिकेटचा क्रमांक एकच येईल. परंतु काही काही वेळा डिलिव्हरी दोन-तीन किंवा अनेक सर्टिफिकेटमध्ये येऊ शकते. (जसे 20+20+20+20+20) तेव्हा आपल्याला तसे Distinctive Nos. आणि Certificate Nos. लिहावे लागतील.
७) Seller’s Particulars इथे विकणाऱ्याने त्याचे नाव घालून सही केली असेल. त्याने नुसतीच सही केली असल्यास त्या मागे त्याचे नाव शेअर सर्टिफिकेटवर पाहून तसेच्या तसे लिहावे. (उदाहरणार्थ, व्ही. जे. शहा, के. गणेश... वगैरे) यावर चौकटीत विकणाऱ्याचा Regd. Folio No. सुद्धा भरला नसल्यास भरावा. हा क्रमांकही शेअर सर्टिफिकेटवर मिळेल.
यापुढे विकणाऱ्याची सही असेल आणि खाली एका साक्षीदाराची सही व पत्ता असेल. शेजारी Attestation साठी एक चौकट आहे. नेहमीच्या व्यवहारात सही Attest करायची गरज नाही. फक्त सहीच्या ठिकाणी अंगठा किंवा सहीमध्ये फरक वगैरे असल्यास विकणाऱ्याने या चौकटीत न्यायदंडाधिकारी, नॉटरी, बँक मॅनेजर, अधिकृत स्टॉक एक्स्चेंज ब्रोकर यांपैकी कुणाकडून तरी सही Attest करून पाठवली असेल. तसे नसल्यास तिकडे दुर्लक्ष करावे.
८) Buyer’s Particulars इथून पुढे आपली स्वत:ची सर्व माहिती भरावयाची आहे. ती नीट सुवाच्च्य भरावी म्हणजे कंपनीच्या रेकॉर्डमध्ये ती व्यवस्थित जाईल. कारण या नावावर आणि पत्त्यावर पुढचे चेक्स वगैरे येणार असतात.
यात प्रथम आपले नाव व सह्या आहेत. मागे सांगितल्याप्रमाणे कोणतेही शेअर्स शक्यतो जोड नावावर चढवावेत. त्या खाली व्यवसाय, पत्ता वगैरे आहे. तेही नीट भरावे. आपल्याकडे त्याच कंपनीचे शेअर्स पूर्वी असल्यास तो Folio No. कळवावा, अशी कंपनीची अपेक्षा असते. त्यासाठी खाली एक चौकट आहे.
९) शेअर ट्रान्स्फर स्टॅम्पची किंमत-कोणत्याही व्यवहाराला सरकारी स्टॅम्प लावावे लागतात. इथे वरील Consideration च्या ½ टक्का- (१०० रुपयास ५० पैसे) प्रमाणे किंमत भरावी आणि तेवढे शेअर ट्रान्स्फर स्टॅम्प ट्रान्स्फर फॉर्मच्या मागे चिकटवावेत. हे स्टॅम्प स्टॅम्पव्हेंडरकडे मिळतात.
१०) तारीख- ज्या दिवशीचा बाजारभाव लिहिला ती तारीख लिहावी.
११) सर्वांत खाली घेणाऱ्याच्या नमुना सह्यांसाठी चौकट आहे. या सह्या नेहमीसारख्याच कराव्यात. कधी मराठी, कधी इंग्रजी, कधी नुसती आद्याक्षरे अशा करू नयेत.
ट्रान्स्फर अर्जाच्या मागच्या बाजूस शेअर सर्टिफिकेट नावावर चढवल्यावर कोणत्या पत्त्यावर पाठवायचे ते विचारलेले आहे. तिथेही आपला पूर्ण पत्ता भरावा.
वरील सर्व पूर्तता झाल्यावर चिकटवलेल्या ट्रान्स्फर स्टॅम्पवर सह्या करून किंवा शिक्के मारून ती कॅन्सल करावीत.
आता हे सर्टिफिकेट आणि भरलेला अर्ज कंपनीकडे किंवा कंपनीच्या ट्रान्स्फर एजंटकडे रजिस्टर पोस्टाने पाठवावा, कोणत्या पत्त्यावर ही कामे होतात त्या पत्त्यांचे एक पुस्तक ब्रोकरच्या ऑफिसमध्ये असते. त्यातून पत्ता नीट पाहून घ्यावा.
वरील सर्व कामे बहुतेक ब्रोकर त्यांच्या ग्राहकांसाठी करतात. आपण नुसत्या दोन ठिकाणी सह्या करून त्यांना स्टॅम्पचे आणि पोस्टेजचे (आणि त्यांच्या सेवेचे) पैसे दिले तरी चालते. परंतु आपले आपण अर्ज भरणे आणि पाठवणे यात स्वावलंबनाचे एक समाधान तर मिळतेच परंतु परिस्थितीचा अंदाजही आपल्याकडे राहतो, कारण ब्रोकरच्या रोजच्या कामात ही किरकोळ कामे त्यांच्या कपाटात तशीच पडून राहतात आणि ‘बुक क्लोजर’ किंवा ‘रेकॉर्ड डेट’ उलटून जाते, अशी शक्यताही नाकारता येत नाही. शिवाय ब्रोकर स्वत: तर हे करायला रिकामा नसतो. त्याच्या-कडील कारकून बदलत असतात. तेव्हा नंतर आपली सर्टिफिकेटस् गहाळ झालेली लक्षात येण्यापेक्षा हे काम स्वत:च करणे केव्हाही श्रेयस्कर वाटते.