2) दरमहा शंभर रुपये बचत: वीस वर्षांत दीड लाख
Originally published on March 8, 1992
Written by Dr Dileep Javadekar
आपल्या हातून काही तरी बचत व्हायला हवी, हे सगळ्यांनाच मान्य झालेले असते. परंतु सुरुवात कधी आणि कशी करायची, या प्रश्नातच बरेच जण अडकून पडतात आणि मग तो बचतीचा भाग मागेच पडतो.
केवळ पैसे वाचवावे म्हणून रोजच्या आयुष्यातल्या मौजमजेच्या गोष्टीचा त्याग करायला सहसा कुणाला आवडणार नाही आणि तसे करूही नये. असे आयुष्याचा काहीही उपभोग न घेत पैसा पैसा साठविणाऱ्या माणसांना कवडीचुंबक, कंजूस, मख्खीचूस वगैरे उपाधी समाज बहाल करतो. समाजातच नाही तर त्याच्या कुटुंबातही सर्वजण त्याच्यावर चिडून असतात आणि त्यांना योग्य तो मान मिळत नाही.
चक्रवाढ व्याजाची किमया
‘आजची अल्पबचत उद्याची मोठी बचत’ अशा जाहिराती आपण नेहमी वाचतो. पण चक्रवाढ व्याजाची किमया काय असते याचा हिशेब बऱ्याच जणांना माहीत नसतो.’ आपल्या मुलाच्या जन्माच्या वेळी बारसे, इतर कोडकौतुके वगैरेमध्ये अलीकडे लोक बराच खर्च करतात. याचवेळी त्याच्या नावाने एक हजार रुपये जर बाजूला ठेवले (आणि इतर खर्चात मला वाटत हा आकडा तेवढा मोठा नाही.) तर त्याच्या वयाच्या पस्तीसाव्या वर्षी त्याला एक लाख अठ्ठावीस हजार रुपये मिळतील. हा हिशेब साधारण दरसाल दर शेकडा १५ टक्के किंवा पाच वर्षात दामदुप्पट एवढ्या व्याजदराने केला आहे. यापेक्षा जास्त व्याज दर मिळवणेही शक्य आहे.
हे झाले एकरकमी केलेल्या बचतीचे फळ! परंतु आपल्याला आयुष्यात अशी एकरकमी आणि एकदाच बचत करायची नसतेच. आपल्या पगारातून किंवा धंद्यातील मिळकतीमधून दरमहा काही थोडे पैसे आपण वाचवू शकलो तर त्यातून चक्रवाढ व्याजाने केवढी प्रचंड रक्कम जमते याचाही विचार आपण कधी केलेला नसतो.
दरमहा फक्त शंभर रुपये वाचविणे थोड्या प्रयत्नाने शक्य व्हायला काही हरकत नाही. असे आपल्या वयाची फक्त वीस वर्षे (वय वर्षे ३५ ते ५५) केल्यास ५५ व्या वर्षी आपल्याला दीड लाख रुपये मिळू शकतात. आपण वळोवेळी बचत केलेल्या फक्त चोवीस हजार रुपयांचे वीस वर्षांत १५ टक्के दराने दीड लाख रुपये होतात. समजा हा लेख वाचून एखादा २५ वर्षाचा तरुण बचतीसाठी प्रवृत झाला आणि त्याने दरमहा शंभर रुपये एवढी बचत केली तर वयाच्या ५५ व्या वर्षी त्याला किती रुपये मिळतील! श्वास रोखून धरा. अंदाजे सात लाख रुपये! ही आहे चक्रवाढ व्याजाची किमया!
माझे एक डॉक्टर मित्र आहेत. खासगी व्यवसाय करत असल्यामुळे त्यांना पैसे खूप मिळतात, पण मोकळ्या वेळाच्या बाबतीत मात्र ते अगदी गरीब आहेत. एकदा सहज गप्पा मारता मारता ते म्हणाले, ‘अरे आपण खासगी व्यवसायामध्ये आपल्याला ना पेन्शन, ना ग्रॅच्युएटी, ना फंड! मरेपर्यंत आपल्याला असेच पेशंट तपासत राहावे लागणार. कारण रोज काम केले नाही तर पैसे कुठून मिळणार?’
बऱ्याच स्वयंरोजगारी व्यक्तींचा असाच समज असतो. पण नोकरदार माणसांना निवृत्तीनंतर जे पेन्शन मिळते त्याची भरपाई त्यांच्याच पगारातून त्यांच्या कामाच्या दिवसांमध्ये झालेली असते. हा विचार कुणी करत नाही. आयुष्यभर घेतलेला पगार हा द्यावे लागणारे पेन्शन वजा करूनच मोजलेला असतो. तेव्हा स्वयंरोजगारी व्यक्तींनी आपल्या पेन्शनची सोय स्वत:च करून ठेवली पाहिजे. आपल्याला काय करायचेय पेन्शन? आपण कुठं निवृत होणार आहे? आशा घमेंडीत राहू नये. आपण कितीही ठरविले तरी निसर्ग नियमाप्रमाणे वृद्धत्व येणारच आहे. तेव्हा आपण स्वत: निवृत्त झालो नाही तरी निसर्ग किंवा समाज आपल्याला कधी ना कधी निवृत्त करणारच आहे. प्रकृतीच्या तक्रारी सुरू झाल्या, ब्लडप्रेशर वाढू लागले, हृदयावर ताण आला की विश्रांती घ्यावीच लागेल. नवनवीन शोध लागले, धंद्यात नवीन लोक आले, स्पर्धा वाढली, की जुने लोक आपोआप मागे पडतील. हे चक्र कुणी थांबवू शकणार नाही. मग अशा निवृत्तीनंतरच्या दिवसांसाठी आतापासूनच बेगमी करून ठेवायला नको का?
पैशाची एक गंमत आहे, जे खोऱ्यानं पैसे मिळवतात त्यांना त्याची किंमतही तेवढीच असते. किती आले आणि किती गेले याचा हिशेबही त्यांना ठेवणे जमत नाही. आवडत नाही. खूप पैसे मिळवणारे खूप थोडे साठवतात. बचत केलेले पैसे कसे योग्यरीतीने गुंतवावे याचा विचार ते करत नाहीत. त्यांचा तसा कसही नसतो. याउलट मध्यम कमाईच्या माणसांना बचतीची कल्पना, त्यातून मिळणारे व्याज, वाढणारी गंगाजळी हे हिशेब आवडतात. माझा एक बँकेत नोकरीला असलेला मित्र कसा म्हणतो, ‘पैसा काय आज आहे उद्या नाही, असे म्हणतात. आमचे उलट आहे. कदाचित आज खिशात पैसा नसेल, पण उद्या नक्की आहे. कारण आमची गुंतवणूकच तशी आहे.’