Ashay Javadekar

View Original

32) नित्य व्यवहारातही अनेक वायदे

Originally published on October 4, 1992

Written by Dr Dileep Javadekar

वायदे व्यवहारांची माहिती घेतल्यानंतर आपल्या शेअरबाजाराकडे वळण्यापूर्वी वायद्याचाच थोडा विचार करू.

हा वायदे बाजार किंवा हे कायद्याचे व्यवहार आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी नाहीतच, असा पुष्कळ लोकांचा समज असतो. आपण कधी उधारीने वस्तू आणत नाही तेव्हा आपल्या आयुष्यातील सर्व व्यवहार रोखीचेच असतात, असं वाटण्याचा संभव असतो. परंतु वायदे व्यवहार आणि रोखीचे व्यवहार यातील सीमारेषा बऱ्याचदा पुसट असते. तशीच ती मागे-पुढेही होत असते, हा विचार मनोरंजक आहे.

आपण रोजच्या व्यवहारातही अनेकदा वायद्याचे व्यवहार करत असतो. एखाद्या मासिकाची एक वर्षाची वर्गणी आपण आगावू भरतो. नंतर दरमहा ते मासिक आपल्याला ठरलेल्या किमतीत पोस्टाने घरपोच मिळते. मध्यंतरीच्या काळात या मासिकाची किंमत वाढली तरी जुन्या वर्गणीदारांना त्याच दराने मासिक पाठविले जाते, हा वायदेव्यवहारच नाही का?

प्रत्येक व्यवहाराची खऱ्या अर्थाने पूर्तता होण्यास काही कमी-जास्त काळ लागतच असतो. एखाद्या दुकानदाराला आपण फोनवरुन मालाची ऑर्डर देतो, दर काय ते विचारून घेतो, नंतर तो दुकानदार तो माल यथावकाश घरपोच करतो आणि पैसे घेऊन जातो. हा मधला काळ वायदापूर्तीचाच असतो. ठरलेला व्यवहार ठरलेल्या दराने पुरा करणे हे बंधन दोन्ही बाजूंना असतेच. एखाद्या वेळी आपल्या मागणीपैकी एखादा जिन्नस नसेल, तर दुकानदार तसं सांगून म्हणेल, ‘हे तुम्हाला उद्या पाठवतो.’ पण तरीही तो भाव आजचाच लावेल. हा व्यवहारपूर्तीचा काळ जेव्हा अगदी कमी असतो. म्हणजे आपण पैसे देऊन एखादी गोष्ट मागायची आणि दुकानदाराने कपाट उघडून ती द्यायची तेव्हा तो व्यवहार रोखीचा समजला जातो. परंतु जेव्हा जेव्हा हा व्यवहार मधला काळ काही कारणाने वाढू लागतो तेव्हा या व्यवहाराला वायद्याचे परिमाण लाभू लागते. आज दुकानात नसलेला माल दुकानदार आपल्याला तोंडी विकतो आणि दुसऱ्या दुकानातून आणून प्रत्यक्ष डिलिव्हरी दुसऱ्या दिवशी देतो. या व्यवहारात तो स्वत:कडे नसलेले वस्तू विकत असतो किंवा शेतात न पिकलेल्या हळदीचे जसे वायदे होतात तसाच काहीसा व्यवहार करत असतो. तेव्हा वायदेबाजार म्हणजे फक्त सट्टेबाजांचा खेळ आहे. तिथे प्रत्यक्षात नसलेला माल दिला आणि घेतला जातो तेव्हा आपल्यासारख्या सामान्य माणसांचा अशा व्यवहारांशी कधीच संबंध येत नाही असा गैरसमज करून घेऊ नये.

हा व्यवहारपूर्तीचा काळ जसा कमी-जास्त असतो अगदी कमी असला तर तो रोखीचा व्यवहार मानला जातो आणि हा काळ जास्त ताणला गेला, की वायदाव्यवहार गणला जातो. याचा शेअरबाजारात कसा उपयोग करून घेतला जातो ते आता पाहाता येईल.

शेअर्सचे सौदे जेव्हा बाजारात ‘रिंग’ वर होत असतात तेव्हा तिथले ब्रोकर्स फक्त आपल्या ऑर्डर्स आणि वह्या-पेन्सिली घेऊनच तिथे गेलेले असतात. प्रत्यक्षात कुणाकडेच शेअर सर्टिफिकेटस् किंवा पैसे अगर चेक बुके नसतात. कारण एक साधा ब्रोकरसुद्धा दोन तासांत दोन-तीनशे सौदे करून परत येत असतो, तेव्हा एवढे सौदे प्रत्यक्ष देवाण-घेवाण होऊन वेळात आटोपणे केवळ अशक्य असतं. मग या झालेल्या सौद्यांची व्यवहारपूर्ती केव्हा होते?

यासाठी नियामक मंडळाने काही ठराविक कालखंडामध्ये वर्ष विभागलेले असते. साधारणपणे एका वर्षाचे २५ किंवा २६ भाग पाडले जातात. म्हणजे दोन (किंवा क्वचितप्रसंगी तीन) आठवड्याचा एक कालखंड मानला जातो. या कालखंडाला ‘वळण’ किंवा Settlement Period म्हणतात. त्या त्या Settlementचे हिशेब तो काळ किंवा ते दोन आठवडे संपल्यानंतरच पाहिले जातात. अर्थात वेळोवेळी झालेले सौदे आणि त्यांचे ठरलेले भाव वहीमध्ये नोंदलेले असतात. त्या दरानेच हिशेब होतात. फक्त सोयीसाठी ते पंधरा दिवसांतून एकदा बघितले जातात. अशा या Settlement to Settlement पुढे सरकणाऱ्या ‘वळणा-वळणाच्या’ रस्त्यावर लोक सट्टा कसा खेळतात, ते पुढील लेखात पाहू.

Ashay Javadekar

See this social icon list in the original post