33) सट्ट्याचे व्यवहार कसे चालतात
Originally published on October 11, 1992
Written by Dr Dileep Javadekar
इतर वायदे बाजारात व्यवहारपूर्तीचे कालखंड बराच मोठा जवळजवळ तीन-चार महिन्यांचा असला तरी शेअरबाजारात मात्र तो त्या मानानं फारच छोटा दोन आठवड्यांचाच असतो. ज्या शेअर्समध्ये वायद्याचे व्यवहार होऊ नयेत असे गृहीत आहे त्या रोखीच्या गटात तर आता हा कालखंड फक्त एक आठवड्याचाच केला आहे.
या व्यवहारपूर्ती कालखंडामध्ये प्रत्यक्ष हातात पैसे नसताना किंवा शेअर नसताना खरेदी-विक्रीचे सट्ट्याचे व्यवहार कसे करता येतात, हे आता पाहू. नवीन गुंतवणूकदारांना एक अतिशय महत्त्वाची सूचना इथे द्यावीशी वाटते- पुढील माहिती ही केवळ एक माहिती म्हणूनच वाचावी. अनुभव नसताना एवढ्या तुटपुंज्या ज्ञानावर खिशात पैसे नसताना वायद्याचे व्यवहार करायला पुढे सरसावू नये. यातील खाचाखोचा कळायला- खऱ्या अर्थाने कळायला नवीन माणसाला बाजारात किमान तीन-चार वर्ष तरी मुरावे लागते. तेव्हा सावधान!
समजा ‘अ’ गटातील शेअरसाठी व्यवहारपूर्ती कालखंड २० फेब्रुवारी ते ५ मार्च असा आहे. आता २० फेब्रुवारी-पासून मी जर एखाद्या विवक्षित कंपनीच्या शेअर खरेदीचा सपाटा लावला तर त्याचे पैसे मला केव्हा भरावे लागतील? मी बाजारातील एक जुना गुंतवणूकदार असल्यामुळे आणि माझे आणि ब्रोकरचे विश्वासाचे संबंध असल्यामुळे मला माझ्या खरेदीचे पैसे ५ मार्चनंतरच द्यावे लागतील. कारण प्रत्यक्ष ब्रोकर-ब्रोकरमधील देण्या-घेण्याचे व्यवहार हे ५ मार्चनंतरच होणार असतात. या गोष्टीचा फायदा घेऊन मी काही खरेदी खिशात पैसे नस्तानासुद्धा करू शकेन.
समजा माझा असा अंदाज आहे, की २७ फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प हा गुंतवणुकीला चलन देणारा असेल आणि त्यात बऱ्याच लोकप्रिय घोषणा केल्या जातील, तर त्यानंतरच्या आठवड्यात शेअरचे भाव चांगलेच सुधारतील. यातही माझ्या अंदाजाप्रमाणे जर या अर्थसंकल्पात रुपया पूर्णत: परिवर्तनीय केला जाईल असे वाटत असेल तर ज्या कंपन्यांची निर्यात ही आयातीपेक्षा जास्त आहे (म्हणजेच ज्या कंपन्या डॉलरमध्ये बराच नफा कमवत आहेत) त्यांना या घोषणेचा फायदा होईल. या माझ्या अंदाजाप्रमाणे मी ज्या कंपनीचा डॉलरमध्ये नफा पुष्कळ आहे अशी एखादी कंपनी निवडेन आणि त्या शेअरची खरेदी आताच सुरू करेन. पाच मार्चपर्यंत मला पैसे द्यायचे नसल्यामुळे मी माझ्या खिशाकडे न पाहताही ही खरेदी चालू ठेवू शकेन. उदाहरणादाखल मी आय.टी.सी. हा शेअर निवडला आणि खालीलप्रमाणे खरेदी करीत गेलो-
तारीख संख्या किंमत रु.
२० फेब्रुवारी १०० ५१,०००
२२ फेब्रुवारी १०० ५३,०००
२४ फेब्रुवारी २०० १,१२,०००
२६ फेब्रुवारी ४०० २,३२,०००
८०० ४,४८,०००
अशारीतीने २७ फेब्रुवारीच्या सकाळी माझ्या खात्यावर ८०० आय.टी.सी. चे शेअर खरेदी केले गेले आणि मी एकूण ४,४८,००० रुपये ब्रोकरला देणे आहे. माझ्यासारख्याच इतरही काही गुंतवणूकदारांचा होरा असल्यामुळे जसजशी अर्थसंकल्पाची तारीख जवळ येऊ लागली तसतसा मागणी वाढल्यामुळे शेअरचा भावही वाढू लागला. मलाही माझ्या अंदाजाबद्दल जास्त जास्त खात्री पटू लागल्यामुळे मीही सुरुवातीला शंभर शेअर खरीदे करत होतो. ते पुढे २००, ४०० असे घेतले.
२७ फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पत रुपया पूर्ण परिवर्तनीय झाला आणि जेव्हा अशी काही प्रत्यक्ष घोषणा होईल तेव्हाच खरेदी करू आधी धोका पत्करायला नको, असा विचार करून कुपणावर बसलेले भरपूर गुंतवणूकदार आय.टी.सी. खरेदीच्या भरमसाट ऑर्डर घेऊन रिंगणात उतरले. अशारीतीने मागणी वाढल्यावर आय.टी.सी. चा भाव सरसर चढत ७०० रुपयांपर्यंत गेला. हे पाहून मी ब्रोकरला ३ आणि ४ मार्चला माझे आठशे शेअर विकून टाकायची ऑर्डर दिली आणि त्याने ते ७०० रुपये दराने विकले. त्यामुळे माझ्या खात्यावर ७००x८००= ५,६०,००० रुपये जमा झाले.
पाच मार्चला हे सेटलमेंट संपल्यावर जेव्हा हिशेब केला जाईल तेव्हा माझ्या नावावर शिल्लक खरेदी कांहीच नाही. कारण घेतलेले सर्व शेअर मी त्याच सेटलमेंटमध्ये विकून टाकले आहेत. मात्र क्रेडिट साईडला ५,६०,००० रुपये जमा आहेत. आणि डेबिट साईडला ४,४८,००० रुपये नावे आहेत. तेव्हा या सेटलमेंटच्या हिशेबानंतर मला माझा ब्रोकर इतर कॉन्टॅक्ट नोट वगैरे कागदपत्रांबरोबर १,१२,००० रुपयांचा चेकही देईल. अशा रितीने खिशातला एकही पैसा खर्च न करता पंधरा दिवसांच्या सेटलमेंटमध्ये खरेदी-विक्री करून मी एक लाखापेक्षा जास्त रुपये मिळविले असे झाले.
यात समजा अंदाजाप्रमाणे अर्थसंकल्पानंतर तेजी आलीच नाही तर ५ मारचनंतर माझे काय होईल ते पुढील लेखात पाहू.