34) भावांच्या चढउताराचे गणित काय?
Originally published on October 18, 1992
Written by Dr Dileep Javadekar
प्रत्यक्ष खिशात पैसे नसताना ४,४८,००० रुपयांचे शेअर्स एकाच व्यवहारपूर्ती कालखंडामध्ये घेऊन त्याच कालखंडात फायद्यात विकल्यामुळे मला एक लाखाहून जास्त रुपये कसे मिळाले हे मागील लेखात पाहिले. परंतु प्रत्यक्षात दरवेळी असे करणे जमेलच का? याचे उत्तर बहुतेक वेळ ‘नाही’ असेच येईल. एक तर भावांच्या चढउतारांच्या दृष्टीने पंधरा दिवसांचा कालखंड हा फारच लहान. अंदाज करायला अतिशय कठीण इतक्या प्रमाणात छोटा असतो.
पंधरा दिवसांत कंपनीचा नफा, विक्री किंवा इतर चांगल्या गोष्टी अगर कामगार समस्या किंवा इतर विरुद्ध बाबी यांच्यामध्ये फारसा फरक पडणे शक्य नसते. शिवाय याच पंधरवड्यात काय अनपेक्षित गोष्ट घडणार आहे याची माहिती कुणाला असणे शक्य नसते. उदाहरणार्थ उद्या श्री. राजीव गांधी यांचा वध होणार आहे किंवा उद्या आखाती युद्ध सुरू होणार आहे अगर उद्या मुंबईत दंगल उसळणार आहे, अशी बातमी आदल्या दिवशी कुणालाच ठाऊक नसते आणि शेअर बाजारात तर अशा बातम्या या बऱ्याच वेळा आपल्या फायद्यासाठी अफवांच्या स्वरूपात पसरवून आपल्या-कडच्या शेअर्सची चढ्या भावात विक्री किंवा भाव पाडून मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यामागेच मोठ्या खेळाडूंचा भर असतो.
तेव्हा आपल्या अंदाजाप्रमाणे समजा एखाद्या व्यवहारपूर्ती कालखंडामध्ये आपण खरेदी केलेल्या शेअरचा भाव चढलाच नाही तर आपले काय होईल? उत्तर सोपे आहे. आपल्याला कालखंडाच्या शेवटच्या दिवशी तो तोट्यात विकावा लागेल किंवा प्रत्यक्ष पैसे देऊन ती डिलिव्हरी घ्यावी लागेल. आपण आपल्या खऱ्या ताकदीच्या पलीकडे जाऊन जवळजवळ पाच लाख रुपयांची खरेदी केलेली असल्यामुळे शेवटचे दोन-तीन दिवस साहजिकच आपली झोप उडेल आणि शेवटच्या दिवशी आपण आपली सगळी खरेदी विकायची ऑर्डर ब्रोकरला दिली तर विक्री किंमत खरेदी किंमतीच्या जितकी कमी येईल तितके रुपये आपल्यास ब्रोकरला द्यावे लागतील. यात कदाचित साठ-सत्तर हजार किंवा लाख-दीड लाख तोटाही होऊ शकेल. परंतु आपल्याकडे डिलिव्हरी घेण्यासाठी पाच लाख रुपये नसल्यांमुळे नाईलाजाने आपल्याला हा तोटा पदरात घ्यावा लागेल. दुसरा पर्यायच नसेल!
पण खरोखरच दुसरा पर्याय नाही का? माझा असा अंदाज असेल की जरी या कालखंडामध्ये माझा अंदाज चुकला असला तरी येणाऱ्या पंधरा दिवसांत नक्कीच मी खरेदी केलेले शेअर्स वर चढणार आहेत, तर मला आणखी पंधरा दिवस मुदत-वाढवून मिळणार नाही का? शेअर बाजाराच्या नियमांप्रमाणे अशी मुदतवाढ दिली जात नाही. तरीही मला जर खरोखरच आणखी पंधरा दिवस थांबायचे असेल आणि आज तोट्यात विक्री करायची नसली तर मी काय करावे? उत्तर सोपे आहे. कुणा मित्राकडून नातेवाईकाकडून पाच लाख उसने आणावेत. ते ब्रोकरला देऊन शेअर्सची डिलिव्हरी घ्यावी, पुढील कालखंडात ते विकावेत, जर या व्यवहारात खरेच अंदाजाप्रमाणे फायदा झाला, तर पैसे उसने देणाऱ्या मित्राला पाच लाख रुपये परत करण्यात मला काहीच अडचण येणार नाही. किंबहुना त्यावर बँकेच्या दराने त्या दिवसांचे व्याज द्यायलाही मला जमेल. परंतु त्या मित्राने तरी मला एवढे पैसे उसने का द्यावेत, त्याला बँकेपेक्षा थोडे जास्त व्याज मिळाले, तरच त्याच्यासाठीसुद्धा हा व्यवहार सुखाचा होईल.
अशारीतीने एका व्यवहार कालखंडातून पुढील कालखंडात आपली खरेदी ढकलायची असेल तर त्याला फॉरवर्डेशन म्हणतात. यासाठी पैसे मागायला आपल्याला कुणी मित्र नातेवाईक हुडकत बसावेही लागत नाही. काही ब्रोकर्स, काही अर्थसंस्था किंवा धनाढ्य लोक शेअरबाजारात सट्ट्यासाठी असे पैसे पुरवायला तयार असतात. मात्र त्यासाठी त्यांना बँकांपेक्षा जास्त व्याज अपेक्षित असते. या अशा प्रकारच्या अर्थपुरवठ्याला बदला फायनान्स असे म्हणतात. हा फायनान्स करणारे लोक स्वत: प्रत्यक्ष शेअर खरेदी-विक्री न करता अशी करणाऱ्या सट्टेबाज लोकांना पैसा पुरवतात, आणि त्यावरचे व्याज घेतात. या व्याजाचा दर देखील शेअरबाजाराच्या चालीप्रमाणे मागणी आणि पुरवठा या तत्त्वावरच ठरतो. बाजार चढत चालला सट्टेबाजी वाढू लागली, की अशा फायनान्सर्सना मागणी वाढते. साहजिकच मग बदल्याचा दरही वाढतो. हा वाढीव बदल्याचा दर देऊनही आपल्याला फायदा होईल, अशा अवस्थेत लोक सट्टेबाजी खेळतात. अर्थात प्रत्यक्ष सट्टेबाज नफ्यात जातो अगर तोट्यात बदला फायनान्सरला चढ्या दराने व्याज मिळतच राहते. असे दोन-चार-पाच कालखंड फॉरवर्डशन करूनही जर अपेक्षित किंमत आली नाही, तर शेवटी नाईलाजस्तव तोट्यात शेअर्स विकण्यावचून पर्याय राहत नाही.