36) चांगल्या कंपन्यांतील गुंतवणूक फायद्याची
Originally published on November 1, 1992
Written by Dr Dileep Javadekar
प्रत्यक्ष खिशात पैसे नसताना लाखो शेअर्सची उलाढाल करणारे सट्टेबाज आपण पाहिले. ठराविक शेअर्सची किंमत मनाशी पक्की करून गर्दीच्या मानसिक अवस्थेत स्वत:ला न अडकू देणारे अभ्यासू गुंतवणूकदारही पाहिले.
वरील दोन्ही प्रकारचे लोक शेअर बाजारात पैसे मिळवू शकतात. परंतु आपल्यातल्या बहुतांश गुंतवणूकदारांची एकच अडचण असते. आम्हाला रोजच्या रोज शेअर्सचे भाव पाहणे, त्याकडे लक्ष ठेवणे शक्य नाही. आमच्या व्यवसायामधून आम्हाला उसंत मिळत नाही. आम्ही गुंतवणूक करू पण ती पुन्हा केव्हा विकायची वगैरे निर्णय घेण्यासाठी अभ्यास करायला आम्हाला वेळ नाही.
वास्तविक पाहता ही अडचण सांगणे योग्य नाही. आपल्या व्यवसायातील एखाद्या ग्राहकाची उधारी वसूल करायची असेल तेव्हा आपण दहा वेळा माणूस पाठवू. पन्नास फोन करू मग आपलाच पैसा आपण जेव्हा शेअर्समध्ये गुंतवला असेल तेव्हा त्याकडे लक्ष द्यायला नको? शिवाय रोजच्या वर्तमानपत्रात शेअर्सचे दर पाहणे, ब्रोकरला एखादा फोन करणे यासाठी दिवसातली दहा-पंधरा मिनिटेसुद्धा वाया जात नाहीत. पण तरीही एकदा शेअर्स खरेदी केल्यानंतर आपण कोणते शेअर्स काय भावाने घेतले आहेत, आज त्याचा काय दर चालू आहे, वगैरेकडे अजिबात लक्ष न देणारे गुंतवणूकदार कल्पनेपेक्षा खरोखरच खूप जास्त आहेत. अशा लोकांच्या गुंतवणुकीचे मग पुढे काय होते.
कंपनी अधेमधेच मोडकळीस आली तर या शेअर्सची किंमत जवळपास शून्य होते. अर्थात आपला गुंतवणूकदार त्या दराकडे पाहतही नसल्यामुळे त्याला त्याचे दु:खही होत नाही. परंतु चांगल्या प्रगतशील कंपन्यांच्या शेअर्सचे काय होते? जरी गुंतवणूकदारांचे ते शेअर्स खरेदी केल्यावर तिकडे परत वळून पाहिलेही नाही, तरी कंपनी मोठ्या प्रमाणावर आपली प्रगती करतच असते. त्यातून दरवर्षी कंपनी लाभांशाच्या रूपाने काही रक्कम गुंतवणूकदाराला पाठवत राहाते. अधूनमधून बोनस शेअर्स वाटते कधीतरी एखाद्या नवीन प्रकल्पासाठी राईट इश्यू काढते. सामान्य गुंतवणूकदाराने शेअर्स न विकता फक्त डिव्हिडंड, बोनस, राईटस् घेत राहिले तरी त्याला खूप मोठे घबाड मिळत राहतें. हे डिव्हिडंडचे चेक्स, बोनस शेअर्सची सर्टिफिकेटस्, राईट ईश्युचे फॉर्मस् परस्पर घरच्या पत्त्यावर कंपनीकडून येत असतात. त्यासाठी गुंतवणूकदाराला शेअर बाजारातील वधघटीकडे लक्ष ठेवावे लागत नाही. फक्त आलेले चेक्स बँकेत भरणे, बोनस शेअर्सची सर्टिफिकेटस् जपून ठेवणे, राईटस् साठी आलेले अर्ज भरून पाठवणे एवढेच काम करावे लागते. हे आलेले चेक्ससुद्धा बँकेत भरायचे विसरून जाणारे, राईट इश्यूची आलेली पाकिटे फोडूनही न पाहणारे असेही महाभाग आहेत. असे लोक आपल्या इतर व्यवसायात फारच बुडालेले असल्यामुळे त्यांना ही कामे जमत नसतील तर त्यांनी शेअर गुंतवणुकीकडे न वळलेले बरे. असेच म्हणावे लागेल.
एखाद्या गुंतवणूकदाराकडे चांगल्या दहा कंपन्यांचे शेअर्स असले तर दर वर्षी त्यास कोणते ना कोणते तीन बोनस आणि तीन ते पाच कंपन्यांचे राईटस् येतच राहतील. फक्त एवढे घेण्याचे काम केले तरी खूप फायदा होईल.
नुसत्या बोनसच्या वाटपामुळे कोलगेट कंपनीच्या १९८०-८१ मध्ये घेतलेल्या १०० शेअर्सचे आज २५६० शेअर्स कसे झाले आहेत आणि त्यावेळी गुंतवलेल्या १२ हजार ५०० रुपयांचे आज बाजारभावाणे १० लाख २४ हजार रुपये (अधिक ३० रजार रुपये या काळात मिळालेला डिव्हिडंड) असे झाले आहेत. ते मागे एका लेखात आपण पाहिलेच आहे.
१९८०-८१ मध्ये घेतलेले शेअर्स आज १९९३ सालापर्यंत न विकता नुसते ठेवून देणाऱ्याला एवढी रक्कम आज मिळू शकेल. परंतु अशा रितीने शेअर्स १०-१५ वर्षे ठेवणे शक्य होईलच असे नाही. त्यासाठी काही चांगल्या कंपन्यांचे शेअर्स दोन-तीन वर्षांपूर्वी घेतले आणि त्यावरील डिव्हिडंड बँकेत जमा करत गेले, तसेच बोनस आणि राईटस् घेत राहिले तर वार्षिक किती टक्के दराने आपल्या गुंतवणुकीवर वाढ झाली हे पुढील कोष्टकात पहायला मिळेल. यामध्ये राईटस् साठी भरलेल्या पैशांचाही हिशेब केलेला आहे.
कंपनी द.सा.द.शे २ वर्षांपूर्वी खरेदी वृद्धी ३ वर्षांपूर्वी खरेदी
आय.टी.सी. १४६% १३१%
ए.सी.सी. १४०% १२०%
जयप्रकाश इंडस्ट्रीज १४४% १०५%
थॉमस कुक ११३% ११०%
बॉम्बे सबर्बन इलेक्ट्रिक सप्लाय १५०% १५०%
एच.डी.एफ.सी. १४०% ११५%
वरील यादी अशी बरीच वाढवता येईल. दोन किंवा तीन वर्षात एखादी चांगली कंपनी आपली गुंतवणूक कशी भरभरून वाढवते हे वरील उदाहरणावरून दिसेल. यात मधल्या रोखे गैरव्यवहार, शेअर बाजारातील चढ-उतार सगळे येऊन गेले हेही लक्षात ठेवले पाहिजे. तसेच हीच गुंतवणूक बँकेत अगर इतर ठराविक व्याजाच्या डिपॉझिटस् मध्ये ठेवली असती तर दरसाल दर शेकडा १५ पेक्षा जास्त व्याज सुटले नसते, हेही स्वत:शी विचार करून जाणले पाहिजे.