Ashay Javadekar

View Original

37) पोर्टफोलिओ मॅनेजमेंट-धारावाही कार्यक्रम

Originally published on November 8, 1992

Written by Dr Dileep Javadekar

वेगवेगळ्या प्रकारे शेअरबाजारात सट्टा खेळणारे आणि गुंतवणूक करणारे लोक पाहिल्यावर आता हळूहळू आपण ‘Portfolio Management’ या विषयापर्यंत येऊन पोहोचलो आहोत.

कोणत्याही गुंतवणूकदाराकडे कधी एकाच प्रकारची गुंतवणूक नसते. थोडी बचत बँकेत ठेवलेली असते, थोडी, पोस्टाच्या बचत योजनांमध्ये असते. थोडेफार सोने-चांदी घेऊन ठेवलेले असते. याहून जास्त पैसे शिल्लक असलेले लोक गुंतवणूक म्हणून जमिन, प्लॉट, फ्लॅट आदि घेतात. आता बऱ्याच लोकांकडे काही थोड्या कंपन्यांचे शेअरही असतात. या सर्व वेगवेगळ्या गुंतवणुकीची मिळून प्रत्येक माणसाची अशी एक बचतीची टोपली असते. शहाणा माणूस कधी नुसतेच प्लॉटस् घेत राहणार नाही, नुसतेच सोने-दागिने खरेदी करत राहणे हेही शहाणपणाचे ठरणार नाही. या लेखमालेच्या अगदी सुरुवातीला प्रत्येक प्रकारच्या गुंतवणुकीत काही फायदे, काही तोटे कसे आहेत हे आपण पाहिलेले आहे. तेव्हा निरनिराळ्या प्रकारच्या गुंतवणुकीचे फायदे आपल्याला मिळावेत आणि एकीकडचा तोटा दुसरीकडे भरून निघावा हा हेतू प्रत्येक जंण पाहत असतो.

लांबच्या प्रवासाला निघताना आपण सगळेच पैसे जसे एकाच बॅगेत ठेवत नाही. थोडे बॅगेत, थोडे खिशातल्या पाकिटात, थोडे पत्नीच्या पर्समध्ये विभागून जसे ठेवतो तसेच हे आहे.

गुंतवणुकीच्या या सर्व प्रकारांची यादी करून त्यात कशात किती पैसे गुंतविले आहेत असे जर पाहिले तर तो त्या माणसाच्या गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ आहे, असे म्हणता येईल.

यातील शेअर गुंतवणुकीचा स्वत:चा असा एक स्वतंत्र पोर्टफोलिओ असतो. सोन्यामधली गुंतवणूक ही शेवटी ‘सोने’ या स्वरूपातच असते आणि सोन्याच्या भावाच्या चढ-उताराबरोबरच ती वर-खाली होणार असते. परंतु शेअरचे तसे नाही. बाजारात असंख्य प्रकारचे शेअर असतात आणि त्यातल्या काही थोड्या कंपन्यांचे शेअरच आपण घेऊ शकतो. तेव्हा वरीलप्रमाणचे आपल्याकडे असलेल्या शेअरची यादी आणि त्यांचा बाजारभाव यांची यादी केली तर तो आपल्या शेअर गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ आहे, असे म्हणतात.

आज घेतलेले शेअर त्यात अपेक्षित वाढ झाल्यावर उद्या आपण विकणार असतो. काही चांगल्या कंपन्यांचे आणखी शेअर घेणार असतो. त्यामुळे आपला पोर्टफोलिओ हा दर वर्षी, दर महिन्याला, दर आठवड्याला आपल्या उलाढालीच्या प्रमाणात बदलत असतो. किंबहुना बदल हा तर शेअरबाजाराचा आणि त्यातील गुंतवणुकीचा मूळ पाया आहे. हा बदल कधी, कसा करावा, कधी कोणते शेअर विकावे, कोणते अधिक घ्यावेत, कुठले ‘राइट’ घ्यावेत, कुठले राइट विकून टाकावेत आदी. हे निर्णय घेण्यामगची आणि ते अंमलात आणण्यामगची जी एक यंत्रणा आपल्या मनात आणि कृतीत अवतरत असते त्याला ‘पोर्टफोलिओ मॅनेजमेंट’ असे म्हणतात.

वरील विवेचनावरून एक लक्षात येईल, की पोर्टफोलिओ मॅनेजमेंट हा एक सतत प्रवाहित असणारा धारावाही कार्यक्रम आहे. दोन-चार लाखांचे शेअर एकदम खरेदी करायचे आणि नंतर त्याकडे पाहायचे नाही अशा गुंतवणुकीलाही जरी शेअरमधील गुंतवणूक असेच म्हणता आले तरी त्याला पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणता येणार नाही. शिवाय पोर्टफोलिओमध्ये सगळी गुंतवणूक कधी एकाच दिवशी अगर एकाच आठवड्यात होणार नाही. अशा खरेदीला पोर्टफोलिओ मॅनेजमेंट अशी संज्ञा देणे चूक आहे.

वरीलप्रमाणे पोर्टफोलिओ मॅनेज करणे हे आपण त्यात जितके डोके घालू तितके अभ्यासाचे आणि कष्टाचे बनत जाणारे काम आहे. परंतु परीक्षेच्या अभ्यासात जसे चांगले गूण मिळविणारे विद्यार्थी ठराविक पुस्तके वाचून यश मिळवू शकतात. परंतु त्याहीपेक्षा पुढे जाण्यासाठी मग स्कॉलर मुले अन्य जास्तीची पुस्तके वाचून इतरांपेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न करतात तसेच पोर्टफोलिओ मॅनेजमेंटचेही आहे. ज्याला चांगले आणि समाधानकारक यश मिळवायचे असेल त्याला पोर्टफोलिओ मॅनेजमेंट तेवढी कठीण जात नाही, नंतर आपल्या आवडीप्रमाणे वाटले तर जास्त खोलात शिरता येईल.

Ashay Javadekar

See this social icon list in the original post