Ashay Javadekar

View Original

39) शेअर निवडीला अनेक निकष लावावेत

Originally published on November 22, 1992

Written by Dr Dileep Javadekar

आपल्याकडील शेअरमध्ये विविधता आणली, की जोखीम कशी कमी होत जाते ते आपण मागील लेखात पाहिले. पण ही विविधता म्हणजे केवळ निरनिराळ्या कंपन्यांचे वीस-पंचवीस प्रकारचे शेअर गोळा करणे नव्हे. या विविधतेतसुद्धा अनेक विविध प्रकारे विचार करता येतो.

एकाच कंपनीचे शेअर न घेता अनेक कंपन्यांचे शेअर घेतल्यावर तेजी-मंदीच्या चक्राप्रमाणे विविध शेअर विविध जागी असल्यामुळे जोखीम कमी तर होतेच. परंतु हे तेजी-मंदीचे चक्र विवक्षित कंपनीला नसून त्या विवक्षित उद्योगाला असते. त्यामुळे एकाच उद्योगधंद्यातले अनेक कंपन्यांचे शेअर घेतले तर थोड्याफार फरकाने ते सर्व शेअर तेजीच्या किंवा मंदीच्या एकाच पायरीवर असणार. नुसते भिन्न कंपन्यांचे शेअर घेऊन म्हणूनच चालणार नाही तर ते भिन्न उद्योगातीलही हवेत.

वरवर पाहता उद्योग भिन्न असले तरी बरेच उद्योग आतून एकमेकांवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ मोटार किंवा स्कूटर उद्योगाला मंदी आली तर त्यांना सुटे भाग पुरवणाऱ्या शॉक अ‍ॅबसॉर्बर्स, ब्रेक लायनर्स, ऑटोलॅम्पस् या उत्पादनाला-सुद्धा उठाव येणार नाही. सिमेंटच्या दरातील चढ-उताराचा बांधकाम उद्योगांवरही परिणाम होईल. असे एकमेकांवर अवलंबून असणारे उद्योगधंदे एकमेकांचा हात धरूनच खाली पडतील किंवा वर चढतील. तेव्हा अशा परस्परावलंबी उद्योगांचे शेअर वरकरणी वेगवेगळ्या कंपन्यांचे भासले तरी त्यांचे भवितव्य आतून निगडितच असेल.

हा सर्व विचार करून खरोखरच भिन्न, एकमेकांवर अवलंबून नसलेले शेअर निवडले तरी निवडीला अजून खूप प्रकारचे निकष लावता येतील-

आपल्या देशात आणि इतर देशांतही काही मोठी कुटुंबे निरनिराळे प्रचंड उद्योग सांभाळतात- त्यांना ‘इंडस्ट्रिअल हाऊसेस’ म्हणतात. उदाहरणार्थ : टाटा, बिर्ला, मल्होत्रा, मल्लय्या, मोदी अशी अनेक नावे संगता येतील. जरी कंपन्या ‘पब्लिक लिमिटेड’ म्हणजे आपल्यासारख्या छोट्या शेअरहोल्डर्सच्या भांडवलावर चालत असल्या तरी त्यातील मोठा वाटा आपल्या कुटुंबाकडे ठेवून त्या कंपन्यांच्या व्यवस्थापनावर या मोठ्या ‘हाऊसेस’नी ज्ञात ठेवलेला असतो. साहजिकच टाटा स्टील, ए.सी.सी., टायटन वॉच, टाटा केमिकल्स आदी अगदी भिन्न उत्पादन करणाऱ्या कंपन्या दिसल्या तरी त्यांचे संचालन टाटा पद्धतीनेच केले जाते. आता ही ‘टाटा पद्धत’ म्हणजे काय? तर प्रत्येक कुटुंबाला त्यांचा असा एक स्वभाव असतो. काही कुटुंबे मिळालेला नफा शेअरहोल्डर्सना वाटण्यात तत्पर असतात. त्यामुळे त्या कंपन्यांना डिव्हिडंड आणि बोनस सढळ हाताने मिळतो. काही व्यवस्थापने याबाबतीत जरा कंजूष असतात, काही व्यवस्थापने सरकार, राजकारण, राजकारणातले पक्ष यांच्याशी अतिजवळचे संबंध ठेवून असतात. त्यामुळे दुसऱ्या पक्षाचे सरकार आले की त्यांची डाळ शिजत नाही. काही व्यवस्थापन कुटुंबात आतल्या आत भांडणे असतात. अर्थातच त्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापनात गलथानपणा येतो. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यावर जरी भिन्न कंपन्यांचे शेअर घेतले तरी ते एकाच कुटुंबाच्या व्यवस्थापनाखालील असू नयेत, हे कुणालाही पटेल. तेव्हा हे डायव्हर्सीफिकेशनही पाहायला हवे.

भिन्न कंपन्या, भिन्न उद्योगधंदे, भिन्न संचालक कुटुंबे एवढी भिन्नता आपल्या पोर्टफोलिओमध्ये आणल्यावर तरी आपली जोखीम शून्य होते का? ती पुष्कळ कमी होते हे खरे, परंतु शून्य होत नाही. कारण आपण खरेदी करत असलेल्या दिवसालाही महत्त्व असते. पेपरमधले शेअरचे दर पाहिले तर वाचकांच्या हेही लक्षात येईल, की एखाद्या दिवशी दर चढले की जवळजवळ सर्वच शेअरचे दर चढतात आणि गडगडले की सगळेच शेअर गडगडतात. आता आपली खरेदी कमी दरात झाली पाहिजे हे खरे, परंतु आज आपण आपली सर्व खरेदी केली, पैसे संपवले आणि पुढच्या आठवड्यात दर आणखी खाली आले तर? त्यावेळीही खरेदीसाठी काही पैसे आपल्या जवळ हवेत. तेव्हा कितीही मोह झाला तरी एकाच वेळी सर्व खरेदी करायची नाही. म्हणजेच खरेदीच्या काळामध्येही डायव्हर्सीफिकेशन हवेत. वर्षाच्या बारा महिन्यांत प्रत्येक महिन्यात थोडी-थोडी खरेदी केल्यास सर्वच्या सर्व बाजार दर किंवा खाली जाण्याचे जे एक चक्र आहे, त्या चक्राच्या प्रत्येक पायरीचा फायदा आपल्या पोर्टफोलिओला मिळेल.

हे सर्व विचार करून पोर्टफोलिओमध्ये विविधता आणायचा प्रयत्न केला तरी प्रत्येक शेअरला त्याचा असा एक स्वभाव असतो. तेव्हा आपल्या किंवा आपल्या पोर्टफोलिओच्या स्वदराशी कोणत्या शेअरचे जमते तेही पाहावे लागते. ते कसे पाहता येईल ते पुढील लेखात पाहू.

Ashay Javadekar

See this social icon list in the original post