Ashay Javadekar

View Original

43) भागधारक निधी पाहणे गरजेचे

Originally published on December 20, 1992

Written by Dr Dileep Javadekar

सतत वाढ दाखविणाऱ्या कंपन्या वार्षिक ताळेबंदात विक्री आणि नफा यात वाढ दाखवतातच; परंतु त्याबरोबरच भागधारक निधी (Share holders fund) मध्येही भरीव वाढ दिसते. भागधारक निधीमध्ये भाग भांडवल आणि संचित गंगाजळी यांची बेरीज येते. सर्व खर्च वजा जाता उरलेला नफा जसाजसा वाढत जातो, तसतसा हा भागधारक निधीसुद्धा वाढत राहतो. सर्वच्या सर्व नफा कोणतीही कंपनी कधी लाभांशाच्या रूपाने वाटून टाकत नाही. तेव्हा कोणत्या कंपनीने किती लाभांश दिला हे पाहण्याबरोबरच हा भागधारक निधी कितीने वाढला, हे ही पाहायला हवे.

या निधीमध्ये कंपनीकडे असलेल्या मुदत ठेवी, कर्जाऊ मिळालेले निधी किंवा डिबेंचर्स धरले जात नाहीत. जेव्हा कधी कंपन्या आपल्या क्षमतेची वाढ करतात, तेव्हा चांगल्या कंपन्या नेहमीच भागधारक निधीमधील पैसा वापरुन नवीन प्रकल्प उभे करतात. त्यामुळेच या निधीत होत जाणारी वाढ ही पुढे कंपनीच्या होणाऱ्या विस्ताराची चाहूलच असते.

चांगले ‘कव्हर’ - कर आणि घसारा वजा जाता उरलेला निव्वळ नफा हा मुख्यत: दोन मार्गांनी वापरला जातो. त्यातला काही भाग लाभांशाच्या रूपाने भागधारकांत वाटला जातो, तर काही भाग कंपनीकडे साठवला जातो. या साठवलेल्या भागाला ‘प्लगबॅक’ म्हणतात. मिळविलेला नफा नुसताच भरमसाट लाभांश वाटण्यात संपवून टाकला तर ‘प्लगबॅक’ कमी उरेल आणि भागधारक निधीमध्ये योग्य वाढ न झाल्यामुळे पुढील विस्तार प्रकल्प आखण्यासाठी कंपनीला पुन्हा कर्ज काढावी लागतील. त्यामुळेच वाढ दाखविणाऱ्या कंपन्यांचा लाभांश बेताचाच असला तरी त्यांची ‘अर्निंग’ (आणि पर्यायाने प्लगबॅक) भरपूर असतात. एखाद्या कंपनीने दर शेअर मागे दहा रुपये निव्वळ नफा कमवला आणि त्यातला फक्त दोनच रुपये लाभांश दिल तर आठ रुपये ‘प्लगबॅक’ राहील. लाभांशाच्या किती पट ‘अर्निंग’ आहे, या गुणोत्तरला ‘कव्हर’ म्हणतात. आताच्या उदाहरणात ‘कव्हर’ पाच येईल. दर वर्षी वाढत जाणारा लाभांश पाहण्यापेक्षा दरवर्षी वाढत जाणारे ‘कव्हर’ जास्त महत्त्वाचे ठरते. कारण लाभांश जरी वीस टक्के दिला तरी ही टक्केवारी ‘फेस व्हॅल्यू’वर असते.

प्रत्यक्ष बाजारभावावर हा लाभांश पाव-अर्धा टक्का पडण्याचीच शक्यता असते. मात्र वाढत जाणारे ‘कव्हर’ हे कंपनीची वर्षानुवर्षे होणारी वाढ दाखवते आणि अशा कंपन्यांनाच बाजारात मागणी असल्यामुळे असे शेअरच खरा फायदा मिळवून देतात.

काही ठिकाणी ‘कव्हर’ ऐवजी ‘पे-आऊट रेशो’ देण्याची पद्धत आहे. ‘पे-आऊट रेशो’ म्हणजे ‘कव्हर’ चा व्यस्तांक किंवा मिळविलेल्या निव्वळ नफ्यातला किती भाग लाभांश म्हणून वाटला त्याला पे-आऊट म्हणतात. या उदाहरणात ‘कव्हर’ पाच आले, परंतु ‘कव्हर’ ‘पे-आऊट’ एक पंचमांश इतका येईल, म्हणजेच दहा रुपयांतील दोन रुपये लाभांश म्हणून वाटले. अर्थातच वाढ दाखविणाऱ्या कंपन्यांचा ‘पे-आऊट रेशो’ जसजशी वर्षे जातील तसतसा कमी कमी होत जाईल.

या दोन्ही गुणोत्तरांवर कंपनीचे भागभांडवल जर बोनस, राइट अगर पब्लिक इश्यूमुळे वाढले तर त्या प्रमाणात परिणाम होतो, हे लक्षात घ्यायला हवे. तेव्हा अचानक ‘कव्हर’ कमी झाल्यास ते अशाच काही कारणांमुळे नाही ना, ते पहायचे विसरून चालणार नाही.

‘प्लगबॅक’ भरपूर असला तरी तो कंपनीच्या आकारमानाच्या तुलनेतच पहायला हवा. मोठ्या कंपन्यांचा ‘प्लगबॅक’ही तसाच मोठा हवा. यासाठी कंपनीचा ‘ग्राॅस ब्लॉक’ पाहतात. ‘ग्राॅस ब्लॉक’ म्हणजे कंपनीची उत्पादन करायची क्षमता. ही क्षमता वाढविल्याशिवाय कंपनीची वाढ होणे अशक्य असते. (काही कंपन्या मुळातच भरपूर क्षमता उभी करतात आणि त्यातला काही भागच वापरात आणतात. या कंपन्या वरील विधानाला अपवाद आहेत.) साधारणत: कंपनीच्या ‘ग्राॅसब्लॉक’च्या १५ ते २० टक्के ‘प्लगबॅक’ दर-वर्षी होऊ शकला, तर कंपनीची वाढ चांगली होईल, असे भाकित करायला हरकत नाही.

Ashay Javadekar

See this social icon list in the original post