Ashay Javadekar

View Original

44) वर्धिष्णू कंपन्यांचे गुणधर्म

Originally published on December 27, 1992

Written by Dr Dileep Javadekar

वर्धिष्णू कंपन्यांचे आणखी काही गुणधर्म या लेखात पाहू.

‘अर्निंग’ आणि ‘इक्विटी’ यांचे उच्च गुणोत्तर : कोणत्याही धंद्यात अगर व्यवसायामध्ये कर्ज काढून पैसा गुंतवला तर त्यावर १८ ते २० टक्के वार्षिक दराने व्याज द्यावे लागते. हा व्याजदर लक्षात घेतला तर एखाद्या उद्योगात स्वत: गुंतविलेल्या पैशावर यापेक्षा जास्त दराने ‘अर्निंग’ व्हायला हवे, अन्यथा एवढे व्याज देऊन आपल्याकडून कर्ज उचलणारा इतर कुणी उद्योजक गाठणे आणि त्याला कर्ज देऊन आपण स्वस्थपणे १८-२० टक्के व्याज मिळवणे हा सोपा आणि सोयीचा मार्ग ठरेल.

या विवेचनावरुन हे लक्षात येईल, की ‘अर्निंग’ आणि ‘इक्विटी’ यांचे गुणोत्तर चांगल्या कंपन्यांमध्ये २५ ते ३० टक्क्यांपर्यंत, काही वेळा त्यापेक्षाही अधिक मिळले. मात्र साधारणत: हा दर ४० टक्क्यांपेक्षा जास्त मिळवणाऱ्या कंपन्या फारच थोड्या सापडतील.

वापरात असलेल्या मुद्दलावर चांगला परतावा : वरील गुणोत्तरात आणि या हिशेबामध्ये थोडा फरक आहे. भागभांडवलावर किंवा इक्विटीवर किती ‘अर्निंग’ मिळवले हे वरील गुणोत्तरात पाहिले. परंतु केवळ भागभांडवलावर कंपनीचा कारभार चालू नसतो. भागभांडवलाबरोबरच संचित भागधारक निधी, डिबेंचर कॅपिटल, अर्थसंस्थांकडून घेतलेली कर्जे असा बऱ्याच ठिकाणांहून गोळा केलेला निधी उद्योगासाठी आवश्यक असतो. तेव्हा या सर्व निधीवर कंपनी किती प्रमाणात नफा मिळवते आहे, हे पाहणे जास्त संयुक्तिक ठरते. कारण त्यातूनच कंपनीची वाढ होत असते. किंबहुना काही वेळा जर काढलेल्या कर्जावर द्याव्या लागणाऱ्या व्याजापेक्षा भरपूर प्रमाणात नफा होत असेल तर प्रत्यक्ष भागभांडवल जास्त न वाढवता दुसऱ्यांकडून घेतलेल्या कर्जाऊ पैशावर कंपनी चालविणे जास्त हुशारीचे ठरू शकते.

वारंवार आणि मुबलक दिले जाणारे बोनस, इश्यूज : बोनस किंवा कॅपिटलायझेशन शेअर म्हणजे काय, हे पूर्वी या लेखमालेत पाहिले आहे. बोनसमुळे प्रत्यक्ष भागभांडवल वाढले तर भागभारक निधीमधील संचित साठवणुकीचे भागभांडवलात रूपांतर केले जाते किंवा रिझर्व्हस् चे कॅपिटलायझेशन केले जाते. परंतु तरीही बोनस देणे ही कंपनीचा स्वत:बद्दलचा विश्वास दाखविणारी कृती ठरते. वाढलेल्या भाग-भांडवलावरदेखील आम्ही पुढील वर्षी असाच लाभांश देऊ, अशी एक आत्मविश्वासदर्शक सूचना त्यातून मिळते. शिवाय बोनसमुळे बाजारातील शेअर वाढतात आणि त्यामुळे जास्त लोकांच्या भावभावना त्यात गुंततात. त्यामुळे साहजिकच त्या कंपनीच्या शेअरना चांगली मागणी आणि चांगली किंमत येते.

चांगली वाढ दाखवू शकणाऱ्या कंपन्यांचे काही गुणधर्म मागील तीन लेखांत एकत्रित करायचा प्रयत्न केला आहे. अर्थात या गुणधर्माच्या कसोटीवर घासून एखाद्या कंपनीबद्दल विचार करायचा झाल्यास त्यासाठी कमीत कमी सलग तीन वर्षांचा अहवाल किंवा नफा-तोट्याचे आकडे आपल्यासमोर हवेत. कारण वाढ या शब्दांमध्येच एक काळाचे परिमाण दडलेले आहे. एखाद्या मुलाचे वजन वाढते आहे की नाही, हे एकदा वजन करून कुणीच सांगू शकणार नाही. त्यासाठी महिन्या महिन्याच्या अंतराने तीन-चार वेळा वजन केले तरच काही निर्णय देता येईल. एखादी कंपनी आज किती मोठी, मध्यम किंवा छोटी आहे यावर ती चांगली की वाईट हे ठरविणे चुकीचे ठरू शकते. यासाठी आजचा विस्तार हा पाया धरून तीन वर्षांमध्ये ती किती वाढते हे पाहणे गुंतवणुकीच्या दृष्टीने जास्त योग्य ठरते. कोणत्याही कंपनीचे तीन-चार वर्षांचे आकडे पाहिले तर साधारणपणे त्या कंपनीचा वाढीचा वेग लक्षात येतो. त्यावरून पुढील काही वर्षांचा अंदाज बांधणे शक्य होते.

Ashay Javadekar

See this social icon list in the original post