Ashay Javadekar

View Original

46) अभ्यास व सराव शेअरसाठी पोषक

Originally published on January 10, 1993

Written by Dr Dileep Javadekar

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना सतावणाऱ्या तीन प्रमुख शत्रूंमधील पहिला शत्रू म्हणजे भीती.

भीतीची अनेक रुपे बाजारात पाहायला मिळतात. आपल्यासारख्या छोट्या गुंतवणूकदाराच्या तर, आपला ब्रोकर आपले पैसे बुडवेल या भीतीपासून ते सरकार कोसळेल या भीतीपर्यंत अनेक भयावह घटना डोळ्यांसमोर नाचत असतात. या सर्व भीतीचा शेवट म्हणजे शेअर बाजार कोसळेल आणि आपल्याकडे असलेल्या शेअर किंमत शून्य होईल, अशा भयस्वपनांनी झोप न येणे!

आपण घेतलेल्या शेअरची किंमत घसरेल ही भीती एकवेळ समजण्यासारखी आहे. परंतु बाजारात भीतीचा एवढा पगडा असतो, की आपण शेअर घेण्याच्या क्रियेच्या आधीपासूनच ती आपल्या पाठलाग करते. एखादा विवक्षित शेअर काही ठराविक दराने खरेदी करण्यायोग्य आहे, असे ठरवून एखादा गुंतवणूकदार आपल्या ब्रोकरला फोन करतो, परंतु तोही लगेच खरेदीची ऑर्डर देत नाही. तो प्रथम ब्रोकरला ‘हा शेअर कसा वाटतो’, ‘घ्यावा काय?’ आदी निरर्थक प्रश्न विचारत राहतो. एखाद्या वेळी ‘शिपिंग? क्यों ले रहे हो?’ असे ब्रोकरने सहज जाताजाता विचारले तरी या गुंतवणूकदाराचे अवसान गळते. तो लगेच खरेदीची ऑर्डर द्यायचे रद्द करतो.

अशी ही भीती जर प्रत्येक ठिकाणी आपल्याला भेडसावत गेली आणि आपण तिच्यापुढे हार मानत गेलो तर आपल्याकडून एकाही शेअरची खरेदी होणे शक्य नाही. अशामुळे काही वेळा आपल्याला ‘बरे केले’ असे वाटणे शक्य असले तरी बऱ्याच वेळा हाताशी आलेल्या सुसंधी दवडल्या गेल्याचेही नंतर लक्षात येईल. पण तेव्हा वेळ गेलेली असेल.

या भीतीवर विजय कसा मिळवायचा? त्यासाठी अभ्यास आणि सराव ही दोनच उत्तरे आहेत. आपण एखादा शेअर घ्यायचा असे ठरविल्यानंतर तो निर्णय आपण काही अभ्यास करून घेतला आहे, की नुसतेच इतर कुणाचे ऐकून घेतला आहे हे तपासून पहावे. इतर कुणाचे ऐकून एखादा शेअर घेण्याचे ठरवण्यात चूक काही नाही. कुणाचेही ऐकू नका, फक्त तुमच्या मनाचा आवाज ऐका असा सल्ला शेअर मार्केटमध्ये अमलात आणणे कठीण आहे, कारण अशा अनेक बातम्या अफवा असतात, ज्या कुणा ना कुणाच्या तोंडूनच ऐकायला मिळतात. शेकडो कंपन्यांबद्दल कुणाचेही न ऐकता नुसती आपल्या मनात अद्ययावत माहिती साठवून ठेवणे अशक्य आहे. तेव्हा कुणाचे ना कुणाचे तरी ऐकावेच लागते. किंबहुना शेअर बाजारात कायम कान टवकारून हिंडणारा खूप पैसे कमावू शकतो. फक्त ऐकलेल्या गोष्टीवर लगेच विश्वास ठेवून पैसे गुंतवू नका.

एखादा शेअर तुमच्या मित्रानें, तुमच्या ब्रोकरने सुचवला तर तो मनात ठेवा. इतरत्र मासिकांतून, नियतकालिकांमधून त्याबद्दल काही माहिती गोळा करता येते का ते पहा. त्यानंतर आठ-पंधरा दिवस त्याच्या बाजारभावावर लक्ष ठेवा. तो कितीपर्यंत मिळाला तर घ्यायचा हे मनाशी पक्के करा. आणि एकदा हे नक्की ठरवले की त्वरिंत ऑर्डर द्या. त्यावेळी किंवा त्या दरम्यान मात्र इतर कुणाला विचारत बसू नका किंवा कुणाचा सल्ला घेऊ नका. असा स्वत: अभ्यास करून घेतलेल्या दहा निर्णयां-पैकी सात जरी बरोबर आले तरी आपण शेअर मार्केटमध्ये यशस्वी झालो असे मानायला हरकत नाही. असा निर्णय घेण्याची सवय स्वत:ला लावून घेताना भीतीला आसपास फिरकूही देऊ नका. स्वयंनिर्णय घेण्याची आणि तो अमलात आणायची एकदा सवय झाली की नंतर याचा सराव होऊन जाईल. अभ्यास आणि सराव यांचे उत्तम मिश्रण एकदा का तुमच्या निर्णयात उतरू लागले, की भीतीला तिथे जागा उरणार नाही. आपल्या मनाची शक्ती हळूहळू वाढत जाईल.

पोहायला शिकताना पाण्याची भीती वाटणे हे प्रथम स्वाभाविक आहे. मी पाण्याला भीत नाही असे सांगणारा खोटे बोलतो हे नक्की ओळखा. मात्र एकदा नक्की पोहायला शिकायचे असे ठरवल्यानंतर पाण्याच्या भितीवर स्वार होणे हा एकच मार्ग उरतो.

Ashay Javadekar

See this social icon list in the original post