48) आशेचा बाजारावर पगडा
Originally published on January 24, 1993
Written by Dr Dileep Javadekar
गुंतवणूकदारांचा तिसरा शत्रू म्हणजे आशा. अतिलोभ, पराकोटीचा मोह वाईट हे कुणालाही पटते.अकारण भीतीपायी स्वत:चा तोटा कसा होत असतो, हेसुद्धा सगळे जण अनुभवत असतात. तेव्हा भीती आणि लोभ आपले वैरी आहेत, याबद्दल कुणाचे दुमत असण्याचा प्रश्न येत नाही. परंतु आशा ही आपली शत्रू कशी? आशेवरच तर सगळे जग चालते. लोकांच्या मनात आशा आहे म्हणून तर शेअर मार्केटसारखे बाजार भरतात. आशेला तुम्ही बाजारातून हुसकावून लावले, तर शेअरचे व्यवहार होणार कसे? तेव्हा आशा ही बाजाराची- बाजारातील गुंतवणूकदारांची शत्रू नसून ती बाजाराचे एक अविभाज्य अंगच नाही का? यासाठी आशेचा बाजारावर असलेला पगडा आणि त्यामुळे सामान्य गुंतवणूकदाराचा होणारा तोटा याचा स्वतंत्र विचार करावा लागेल.
छुपे वार करणाऱ्या मित्रापेक्षा आमनेसामने आव्हान देणारा शत्रू बरा, असं म्हणतात. आशेबद्दल असेच म्हणता येईल. लोभ किंवा भीती हे शत्रू आपल्यावर आपल्या इच्छेविरुद्ध ताबा मिळवतात. आशा मात्र प्रत्येक माणसाच्या मनात असतेच. किंबहुना ती तिथे असते म्हणून तर माणसे बाजारात जातात. तेव्हा आपल्या मनात आधीपासूनच घर करून राहिलेली ही आशा आपली शत्रू कधी बनते?
व्यापारामध्ये फायद्यात चाललेला धंदा वाढवावा आणि तोट्यात चाललेला धंदा लवकरात लवकर बंद करावा, असा एक संकेत आहे. शेअर गुंतवणुकीलाही खरे तर तेच तत्त्व लागू करायला हवे. आपली जी खरेदी फायदा दाखविते आहे ते शेअर ठेवावेत- जमल्यास त्या कंपनीचे आणखी शेअरही घ्यावेत, मात्र आपला जो निर्णय चुकला आहे हे स्पष्ट दिसत आहे, ते शेअर जरी आपल्या खरेदी किमतीच्या खाली बाजारभाव असला, तरी लवकरात लवकर विकून मोकळे व्हावे. यामुळे आपला त्या व्यवहारात थोडा तोटा झाला असे हिशेबात जरी दिसले. तरी पुढे होणारा मोठा तोटा वाचतो आणि रिकामा झालेला पैसा पुन्हा दुसऱ्या एखाद्या चांगल्या शेअरमध्ये गुंतवता येतो.
वर वर्णन केलेली तोट्यातला व्यापार कापण्याची हातोटी फार थोड्या लोकांना जमते आणि इथेच आशा, आपल्यासारख्या सामान्य लोकांची शत्रू बनून काम करते. आपण घेतलेला शेअर घसरत चालला आहे, आपला निर्णय चुकला आहे हे स्पष्ट दिसत असते, परंतु माणूस आपली चूक लवकर कबूल करत नाही. हे दिवस लवकरच जातील आणि पुन्हा तो शेअर वर चढेल, अशी आशा तो करत राहतो. अशा वेळी इतर कुणीही जरी काहीही सांगितले, नियतकालिकां मधून काहीही छापून आले, तरी तो त्यावर विश्वास ठेवत नाही. आपण घेतलेल्या किमतीच्या वर कदाचित तो शेअर जाणार नाही परंतु त्या किमतीला तरी तो नक्की लवकरच येऊन टेकेल, मग आपण ‘ना नफा ना तोटा’ अशा किमतीला तो विकून टाकू अशी तो मनाची तयारी करतो. या आपल्या खरेदी किमतीला ‘ब्रेक इव्हन प्राईस’ म्हणता येईल. अशा ब्रेक इव्हनसाठी अनेक गुंतवणूकदार वाट पाहात बसतात. अशी प्रतीक्षा पाच-पाच, दहा-दहा वर्षे करणारे महाभागही आहेत. पाच वर्षांत ‘दामदुप्पट’ हा इतर गुंतवणुकीमधील वाढीचा दर जर गृहीत धरला, तर पाच वर्षांनंतर तो शेअर घेतलेल्या किमतीला विकणे म्हणजे आपली गुंतवणूक निम्मी करून परत घेणे आहे. परंतु हा विचार माणसे करत नाहीत. आपण वाट पाहिल्यामुळे घेतलेल्या किमतीला तो शेअर कसा विकू शकलो, घाबरून तोट्यात विकण्याची घाई आपण केली नाही हे किती चांगले केले, अशी मनाची समजूत तो करून घेतो. अशा ब्रेक इव्हन प्राईसची वाट पाहताना काही चूक करण्याचीही शक्यता असते.
एखादा शेअर शंभर रुपयांना खरेदी केला आणि नंतर आपला अंदाज चुकल्यामुळे तो घसरत ऐंशी रुपयांवर आला, तर काही गुंतवणूकदार ऐंशी रुपयांना तोच शेअर आणखी थोडे खरेदी करतात. जो शंभर रुपयांना घेण्यासारखा होता तो ऐंशी रुपयांना आणखीनच घेण्यासारखा असतो हे जरी खरे असले तरी तो नियम, आपला निर्णय आणि फंडामेंटल बदलली नसली, तरच खरा आहे. काही वेळा आपली माहिती चुकीची निघते हे ठाऊक असूनही केवळ खरेदी किमतीची सरासरी खाली आणण्यासाठी असा चुकीचा निर्णय आणखी लांबवर राबवत न्यायचा म्हणजे बुडत्याचा पाय आणखीच खोलात जाण्याची शक्यता असते. अशा वेळी ऐंशी रुपयांना आणखी खरेदी करण्यापेक्षा पहिले शेअर वीस रुपये तोट्यात विकून टाकून मोकळे झालेले पैसे दुसऱ्या एखाद्या चांगल्या शेअरमध्ये घालणे शहाणपणाचे ठरते.