Ashay Javadekar

View Original

7) शेअरचे भाव कसे ठरतात?

Originally published on April 12, 1992

Written by Dr Dileep Javadekar

पूर्ण आदर्श कसोटीला उतरणारी गुंतवणूक योजना जरी सापडली नाही तरी त्याच्याशी जास्तीत जास्त जवळ पोहोचणारी म्हणून शेअरमधील गुंतवणूक आहे हे विचाराअंती बऱ्याच लोकांना पटतं. परंतु नुसतं हे पटून काही उपयोग होत नाही. गंगा वाहत असते, कधी कधी ती अंगणातही येते. परंतु आपली घागर तिच्यात बुडवल्याशिवाय घरात पाणी कसे येणार?

शेअरचे भाव हे सतत वरखाली होत असतात. हे असे वरखाली का होतात. त्याच्यामागे ही ठरवणारी कोणती शक्ती काम करते हे नवोदिताला समजत नाही. मग ते आपलं काम नाही, तो जुगाराचा प्रकार आहे असं म्हणून मराठी माणूस आत शिरायच्या आधीच तिकडे पाठ फिरवतो.

शेअरचेच काय पण कुठलेही भाव कसे ठरतात हे सामान्य माणसाला माहीत नसतं. त्यावर तो विचारही करत नसतो. हे भाव ठरवण्यामागं आपणच कारणीभूत असतो हे तो जाणत नसतो.

मार्च-एप्रिल महिन्यात बाजारात आलेला आंबा आपणच जास्त किंमत देऊन खरेदी करतो, तोच आंबा किंवा त्यापेक्षाही उत्तम प्रतीचा आंबा आपल्याला मे महिन्यात स्वस्त का मिळतो?

मोसम सुरू होण्याआधी बाजारात आलेली आंबट द्राक्षेही महाग असतात. नंतर तीच द्राक्षे स्वस्त कशी होतात?

मंडईमध्ये प्रत्येक भाजीवालीच्या टोपलीत असलेली भाजी सगळ्याच भाजीवाल्या आपल्याला हाका मारून स्वस्त का विकतात? तेच एखादीकडेच असलेला भाजीचा, फळांचा प्रकार ती भाजीवाली किती गुर्मीत महाग विकते?

वरील सर्व रोजच्या व्यवहारातल्या गोष्टीमध्ये भाव ठरविणारे मुख्य कारण म्हणजे आपण ग्राहकच असतो, याचा आपण कधी विचारच केलेला नसतो.

शेअरच्या भावांचेही असेच आहे. तेही ठरतात ते आपल्या इच्छेअपेक्षे-वरच! फक्त आपल्यासारख्या खूप प्रचंड ग्राहकांची एक भली प्रचंड शक्ती तिथे कार्यरत असते. आपणही त्यातलेच एक असूनही त्या शक्तीचा आपल्याला अंदाज न आल्यामुळे ते सगळं न समजण्यासारखं आहे असा समज आपण करून घेतो.

नवीन माणसाला कोणत्याही शेअरचा भाव सांगितला तर तो एकच प्रश्न विचारतो ‘कितीचा आहे?’ अर्थसंकल्पावर टाटा स्टीलचा शेअर ४२० रुपयांवर गेला असं सांगितलं की तो लगेच विचारेल ‘कितीचा आहे?’ म्हणजे शेअरची मूळ किंमत (फेस व्हॅल्यू) किती? ती तर आहे दहा रुपये! मग आता जर टाटा स्टील २५० रुपयांना मिळाला तर स्वस्त आहे ‘असं’ सांगितलं तरी नवीन माणूस त्याकडे पाहणार नाही. कारण त्याच्या मनात कुठंतरी दहा रुपयांची वस्तू आपण २५० रूपयांना घेणं हा किती मूर्खपणा आहे असा विचार पक्का झालेला असेल. पण खरोखरच हा मूर्खपणा आहे का? मुळीच नाही! यासाठी शेअरची किंमत कशी वाढते याची उदाहरणं घेऊन माहिती घेऊ.

समजा एक कारखाना १० लाख रुपये खर्च करून उभा केला. यासाठी दहा जणांनी त्याचे सारखे शेअर म्हणजे प्रत्येकी एक लाख रुपयांचे शेअर घेतले म्हणजे प्रत्येक जण त्या कारखान्याचा एक दशांश मालक झाला. प्रत्येक शेअरची मूळ १० रुपये असल्यास प्रत्येकाकडे दहा हजार शेअर असतील. समजा पहिल्याच वर्षी कारखाना चांगला चालला, उत्पादनाला मोठी मागणी आली, भरपूर नफा झाला आणि कामगारांचे पगार, इतर देणी वगैरे भागवून सर्व खर्च वजा जाता पाच लाख रुपये शिल्लक राहिले. आता उदाहरणासाठी असे म्हणू की वरील दहा शेअरहोल्डर्स मुळातच श्रीमंत असल्यामुळे त्यांनी या पाच लाखातील काहीही पैसा न घेता उलट पाच लाखांची आणखी यंत्रसामग्री आणली आणि कारखान्याची वाढ केली. आता दुसऱ्या वर्षीही प्रत्येक शेअरहोल्डर कारखान्याचा एक दशांश मालक आहे आणि प्रत्येकाकडे दहा रुपये फेसव्हॅल्यूचे दहा हजार शेअर आहेत. परंतु कारखान्याची किंमत मात्र आज दहा लाख नसून पंधरा लाख रुपये आहे. म्हणजे प्रत्येक शेअर सर्टिफिकेटवर जरी दहा रुपये किंमत छापलेली असली तरी त्या सर्टिफिकेटची खरी किंमत मात्र आज पंधरा रुपये आहे. कारण कोणत्याही क्षणी कारखाना बंद करून त्याची विक्री करून पैसे वाटून घ्यायचे ठरवले तर प्रत्येक शेअरहोल्डरला दीड लाख रुपये (एक लाख नव्हे) किंवा प्रत्येक शेअर सर्टिफिकेट मागे पंधरा रुपये (दहा नव्हे) मिळणार आहेत. किंवा संपूर्ण कारखाना बंद करणे आणि पैसे वाटून घेणे अशी भाषा न वापरता त्यातल्या एखाद्याला आपले शेअर विकून टाकायचे असतील तर तो प्रत्येक सर्टिफिकेट मागे आपल्याला पंधरा रुपये मिळावे अशीच अपेक्षा करील.

या पंधरा रुपये किमतीला शेअरची पुस्तकी किंमत किंवा बुक व्हॅल्यू म्हणतात. तेव्हा आता आपल्या लक्षात आलेच असेल की शेअर कितीचा किंवा ‘फेस व्हॅल्यू किती’ या प्रश्नाला जुन्या कंपन्यांच्या बाबतीत तरी काही अर्थ नसून प्रश्न विचारायचाच झाला तर ‘बुक व्हॅल्यू किती?’ असा विचारावा लागेल.

अर्थात बाजारातील सौदे बरोबर बुक व्हॅल्यूलाच होतात असे नाही. कारण तसे झाले तर बाजार भरायचेच कारण नाही. तेव्हा या बुक व्हॅल्युवर आणखी कोणत्या शक्ती कार्य करतात ते पुढील लेखात पाहू.

Ashay Javadekar

See this social icon list in the original post