Ashay Javadekar

View Original

8) सतत चढणारे शेअर्सचे भाव

Originally published on April 19, 1992

Written by Dr Dileep Javadekar

शेअरच्या फेसव्हॅल्यूपेक्षाही पाहायचीच झाली तर शेअरची बुकव्हॅल्यू किती ते पाहावे लागेल, हे आपण मागील लेखात पाहिले. ही बुकव्हॅल्यू कुठे पाहायला मिळेल? आर्थिक विषयाला वाहिलेली जी नियतकालिके असतात त्यात प्रत्येक अंकात निरनिराळ्या शेअर्सची बरीच संख्यात्मक माहिती असलेली कोष्टके दरवेळी प्रसिद्ध केली जातात. यात त्या त्या शेअरची बुकव्हॅल्यू किती हे पाहता येईल. परंतु या बुकव्हॅल्यूच्या आसापास तरी बाजारातील शेअरचा सौदा होतो का? या प्रश्नाचे उत्तर ‘बहुतेक वेळा नाही’ असेच द्यावे लागते. किंबहुना एका दिवसांतदेखील एखादा शेअर ६०, ६५, ८०, ७५ असा वरखाली झालेला आपल्याला वर्तमानपत्रात वाचायला मिळतो. एका दिवसात बुकव्हॅल्यू काही अशी वरखाली होत नाही. मग बाजारातील भाव वरखाली का होतो? आंबा तोच असतो मग त्याचा भाव का कमी-जास्त होतो? याच उत्तर आहे मागणी आणि पुरवठा! मागणी आणि पुरवठा यांच संतुलन होईपर्यंत कुठल्याही वस्तूचा भाव स्थिर राहत नाही. हे जरा विस्तारानं पहायला हवं.

समजा आपल्या गावात एका दुकानदाराकडं एक वस्तू विकण्यासाठी आली आणि गावातील इतर कोणत्याही दुकानात ती वस्तू नाही. त्या वस्तूवर जास्तीत जास्त किंमत वगैरे काही छापलेली नाही आणि त्या दुकानदाराला ती वस्तू मोकळेपणाने हव्या त्या भावाला विकण्याची मुभा आहे. आता ती वस्तू घेण्यासाठी समजा पाच ग्राहक आले, तर दुकानदार ती वस्तू कोणाला विकेल? अर्थात त्या वस्तूची जो जास्तीत जास्त किंमत देईल त्याला. म्हणजे त्या वस्तूची किंमत ठरविण्यासाठी त्या पाच जणांत स्पर्धा लागेल. अशा रीतीने किंमत वाढत जाईल. एका ठराविक आकड्याला त्या पाच जाणांतील चौघांना ती किंमत परवडणार नाही. एवढे पैसे देऊन घेण्यासारखं यात काही नाही, असं म्हणून ते बाजूला होतील आणि मगच त्या वस्तूची विक्री होईल. प्रथम पुरवठा एक आणि मागणी त्याच्या पाचपट अशी परिस्थिती असताना वस्तूची किंमत वाढत गेली आणि जेव्हा मागणी घटून पुरवठा एक आणि मागणीही एक अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हाच तो व्यापार झाला.

या उलट उदाहरणातदेखील असेच आहे. समजा पाच दुकानात एकच वस्तू विकण्यासाठी ठेवली आहे आणि ती खरेदी करण्यासाठी गेलो तर काय करू? जो दुकानदार आपल्याला ती वस्तू सगळ्यात स्वस्त देईल त्याच्याकडूनच ती आपण खरेदी करू. म्हणजे मागणी एक आणि पुरवठा त्याच्या पाचपट अशी परिस्थिती आली, की आपला माल खपण्यासाठी किंमत कमी केली जाईल आणि वस्तू स्वस्त होईल.

बरोबर हीच गोष्ट शेअर मार्केटमध्ये हरघडी होत असते. म्हणूनच शेअरचे भाव दोन तासांत अनेक वेळा वरखाली होत असतात. या अर्थसंकल्पाच्या आसपास हेच झालं. आपल्या अर्थमंत्र्यांच्या नव्या प्रागतीक धोरणामुळे अचानक शेअर्सना प्रचंड मागणी आली. दिवसेंदिवस ही मागणी वाढतच गेली. मागणी वाढते आहे हे लक्षात येताच आपल्याजवळचे शेअर्स विकायला कुणी बाहेर काढेना. बाजारात शेअर्सविकायला अगदी थोडे आणि ते घेण्यासाठी भलीमोठी झुंबड अशी परिस्थिती निर्माण झाली. अशा वेळी ज्या मिळेल त्या भावाला शेअर्स घ्या,अशा सूचना विकत घेणाऱ्यांनी त्यांच्या ब्रोकरला दिल्या. आपल्या मालाला उठाव आहे म्हटल्यावर शेअर विकायला तयार असलेले लोक भावाच्या मुद्यावर अडून बसले. अशा रीतीने आठ दिवसांत बऱ्याच शेअर्सचे भाव दुपटीहून अधिक झाले. तरीही आतून मागणी चालूच होती. असे होता होता केव्हातरी मग या किमती खरेदीदारांना न पेलण्यासारख्या होतात. मग ते बाजारातून बाहेर पडतात. ज्यांनी काही दिवसांपूर्वीच स्वस्तात शेअर्स घेतले असतील तेही थोड्या दिवसांत मिळालेला फायदा खिशात घालण्यासाठी आपले शेअर्स विकायला काढतात. मग ही रस्सीखेच मार्केटला उलट दिशेकडे खेचू लागते. विक्रीचा दबाव हळूहळू वाढत जातो. त्याप्रमाणात खरेदीचा उत्साह दिसून येत नाही. मग मिळेल त्या किमतीला विका अशी भावना विकणाऱ्यामध्ये होऊ लागली, की बाजारातून बाहेर पडून कुंपणावर बसलेले खरेदीदार आत येतात आणि भाव पाडून मागतात. कुणीतरी उतरत्या भावात विक्री सुरू केली, की मग उत्साहावर हळूहळू विरजण पडत जातं आणि मग शेअर्सचे भाव हळूहळू खाली येऊ लागतात, असं हे वरखाली आणि खालीवर चक्र चालू राहतं.

असं म्हणतात, की शेअर्सच्या भावांना वर जायला मागणीचा भक्कम आधार लागतो. मात्र खाली येताना ते भाव आपोआप आपल्या वजनानं पडतात. कारण मागणीचा आधार काढून घेतला, की उंच जागेवर अधांतरी शेअर राहू शकत नाही. तो आपोआप घरंगळायला लागतो. कुणीतरी ही घसरण मागणी करून थांबवावी लागते. त्यामुळे शेअर चढायला बाजारात गर्दी असावी लागते. पण शुकशुकाट असला तरी भाव उतरतात. दोन महिन्यांत एखादा शेअर जेवढा चढेल तेवढाच उतरायला त्याला एक महिनादेखील पुरतो.

अर्थात तरीही लांब पल्ल्याचा विचार केला, तर शेअर्सचे भाव नेहमी चढतातच. जशी कितीही थांबवली तरी महागाई होतेच, तसेच शेअरचेही आहे.

Ashay Javadekar

See this social icon list in the original post