6) Hero and Desire
Originally published in Mar 2018
मागच्या लेखामध्ये आपण कुंडलिनी ग्रेडियंट विषयी बोललो, ज्याच्यामध्ये फिल्म्स मध्ये जी प्रेरणादायी आणि करुण पात्रे आढळतात त्यांच्यामध्ये हा ग्रेडियंट कसा असतो याविषयी आपण चर्चा केली. एक गोष्ट खरी आहे की प्रेरणादायी किंवा करूण प्रवास होण्यासाठी कुंडलिनीच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे पात्रांचा प्रवास होतो, परंतु हा प्रवास करायला त्या पात्रांना भाग कोण पाडतं? याचा विचार आपण या लेखात करू.
पात्रांच्या भावनिक प्रवासासाठी तीन फार महत्त्वाचे घटक असणं महत्वाचं असतं, ते खालीलप्रमाणे.
१. नायक = प्रत्येक फिल्म मध्ये एक “मनुष्य” स्वरूपातला नायक असावा लागतो.
२. जिज्ञासा (Desire) = नायकाला काहीतरी जिज्ञासा असावी लागते. कशाचीतरी प्रचंड ओढ, ज्वलंत इच्छा. जिज्ञासा हे या भावनिक प्रवासासाठी लागणारं इंधन आहे असं म्हटलं जातं.
३. संघर्ष (Conflict) = नायकाला ज्या गोष्टीची जिज्ञासा आहे ती गोष्ट मिळवण्यासाठी त्याला काहीतरी अडचणी याव्या लागतात. जी गोष्ट हवी आहे ती सहजासहजी मिळाली तर काय मजा? काय मिळेल अशी गोष्ट बघून प्रेक्षकांना? अनेक महानायकांच्या कथा प्रेरणा देणाऱ्या असतात कारण त्यांना ज्या गोष्टीची जिज्ञासा आहे ती मिळवण्यासाठी त्यांना अतोनात कष्टांना सामोरं जायला लागतं. त्या कष्टांवर मात करून त्यांनी ते मिळवलं म्हणून त्यांची कथा प्रेरणादायी ठरते.
“संघर्ष” या विषयी एक वेगळा लेख लिहिला पाहिजे, कारण तो एक खूप मोठा विषय आहे. या लेखामध्ये आपण फक्त नायक आणि जिज्ञासा यांच्याविषयी बोलू.
नायक हा नेहमी “मानवी” स्वरूपातला हवा. “माझ्या गोष्टींमध्ये मुंबई हे शहर नायक आहे” वगैरे अशा गोष्टी खूप गोंधळात टाकतात (उत्तम उदाहरण, धोबी घाट हा सिनेमा). एक लक्षात घेतलं पाहिजे. प्रेक्षक हे कथेतल्या कुठल्यातरी मनुष्याशी रममाण होतात. त्याच्याबरोबर हसतात, त्याच्याबरोबर रडतात. माणूस नसेल तर फिल्म नाही. You need to give someone to the audience to root for.
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे that person should one “one”, not “many”. नायक एकच असला तर ती फिल्म अधिक सोपी आणि प्रभावी बनते. अनेक नायकांची कथा ही गोंधळात टाकणारी असते. (अनेक नायक असल्याचं उदाहरण, राजवाडे अँड सन्स हा सिनेमा. “एका कुटुंबाची गोष्ट” वगैरे खूप व्यामिश्र (complex?) विषय आहे. मला एक हिरो द्या प्लीज.) चार पाच लोकांवर समान प्रेम करायला सगळं जीवन अपुरं पडतं, फिल्म च्या २ - ३ तासांमध्ये चार पाच लोकांवर प्रेम करायला सांगितलं तर कसं जमायचं? एक नायक प्लीज.
मी माझी SHANK’S फिल्म करत होतो तेव्हा या गोष्टीशी मला सामना करायला लागला. मला फिल्म करायची होती मराठी खाद्यपदार्थांविषयी. पण मराठी फूड हा काही नायक असू शकत नाही गोष्टीचा. त्यामुळे मला शशांक जोशी या शेफ च पात्र त्या फिल्म मध्ये टाकायला लागलं. त्याला एक जिज्ञासा द्यायला लागली, संघर्ष करायला लावला. त्याच्या दृष्टिकोनातून मराठी फूड दाखवायला लागलं. त्याच्या आधी केलेल्या माझ्या चित्रपटांमध्ये मी अनेक नायक, अमानवी नायक अशा चुका केल्या होत्या. हा हा!
आता जिज्ञासेविषयी बोलू. हिरो ला असलेली जिज्ञासा अशी पाहिजे की ती गोष्ट जर मिळाली नाही, तर पुढचं आयुष्य जगता येणार नाही. It should break the status quo in a positive (or negative) way! Must have पाहिजे, nice to have नाही. आता ही जिज्ञासा कशा प्रकारची असू शकते हे त्या पात्राची कुंडलिनी ठरवेल.
आता काही उदाहरणांचा विचार करूया.
Inception मध्ये नायक कोण? डॉम कॉब, किंवा लिओनार्डो डी कॅप्रिओ. त्याची जिज्ञासा काय? त्याच्या मुलांपासून तो दूर झालेला आहे आणि त्याला त्यांना परत भेटायचंय. जर तो भेटला नाही तर काय होईल? Is that a must have or nice to have? Of course, it is a “must have”.
Matrix मध्ये नायक कोण? निओ, किंवा कियानू रीव्हस. त्याची जिज्ञासा काय? त्याला त्याच्या आजूबाजूला खूप विचित्र गोष्टी घडतायंत आणि त्याचा छडा लावायचा आहे.
Forrest Gump मध्ये नायक कोण? फॉरेस्ट गम्प, म्हणजे टॉम हँक्स. त्याची जिज्ञासा काय? त्याच्या बालपणीची मैत्रीण “जेनी” शी सतत संपर्कात राहणे.
Gladiator मध्ये नायक कोण? मॅक्सिमस, किंवा रसेल क्रो. त्याची जिज्ञासा काय? सूड. त्याच्या कुटुंबाच्या हत्येचा सूड.
Toy Story मध्ये नायक कोण? वूडी, किंवा टॉम हँक्स. त्याची जिज्ञासा काय? अँडी चं सगळ्यात आवडतं खेळणं बनायचं.
Finding Nemo मध्ये नायक कोण? मार्लिन, किंवा अल्बर्ट ब्रुक्स. त्याची जिज्ञासा काय? स्वतःच्या हरवलेल्या मुलाला शोधणे.
नायक हा मनुष्य स्वरूपात असावा लागतो याचं एक फार intersting उदाहरण जुन्या मराठी चित्रपटात आहे. “मराठा तितुका मेळवावा” या सिनेमामध्ये महाराष्ट्र हा नायक आहे, कारण तो बंदिस्त आहे, आणि त्याला मुक्त व्हायचं आहे. पण त्याला मनुष्यरूप कसं दिलंय? तुम्हाला जर सिनेमा चालू होतानाचा सीन आठवत असेल तर महाराष्ट्र म्हणून एक मनुष्यरूपी मावळा दाखवला आहे, तो “मनुष्य” साखळदंडात बंद आहे. पाहिलंत? “मनुष्यरूपी नायक”! कथेचा नायक महाराष्ट्र (मनुष्य नाही असा) असला तरी.
या लेखामध्ये आपण नायक आणि जिज्ञासा यांच्याविषयी बोललो. पुढच्या लेखामध्ये संघर्षाविषयी बोलू. नायकाला करावा लागणारा संघर्ष हा केवळ भौतिक नसून, मानसिकही असतो, आणि तो “इकडे आड आणि तिकडे विहीर” अशा स्वरूपात येतो. तो कसा याचा विचार करू त्या लेखामध्ये.