7) Conflict

Originally published in Apr 2018

मागच्या लेखामध्ये आपण फिल्म्स मधल्या पात्रांच्या भावनिक प्रवासासाठी जे तीन महत्वाचे घटक असतात त्यांच्याविषयी बोललो. ते म्हणजे, नायक (Hero), जिज्ञासा (Desire) आणि संघर्ष (Conflict). नायक आणि जिज्ञासा विषयी मागच्या लेखात आपण सविस्तर चर्चा केली आणि आता या लेखामध्ये आपण संघर्षाविषयी बोलू. 

संघर्ष हा कुठल्याही कथेमध्ये, चित्रपटामध्ये किती महत्वाचा आहे? याचं उत्तर फारच सोपं आहे. संघर्ष नसेल तर कथेला कथेपणच येणार नाही अशा मताचा मी आहे. तुमच्या कथेचा नायक अडचणींना पार कसं करतो, याच्यामुळे कथा उत्कंठावर्धक होते. संघर्ष नायकाला कुंडलिनीचा प्रवास करायला भाग पडतो, आणि त्यातून काहीतरी नायकाला मिळतं. त्यामुळे कुठल्याही कथेतली अत्यावश्यक गोष्ट म्हणजे नायकाला करायला लागणारा संघर्ष. 

आता संघर्ष म्हणजे काय नक्की? नुसती एखादी आलेली अडचण? नाही. मी इंजिनीरिंगला असताना आमचे एक प्रोफेसर होते ते आम्हाला सांगायचे की कुठल्याही अडचणीला मात करताना तुमच्यासमोर तीन पर्याय असतात, 

१. अडचणीला सामोरे जा (Face the problem)

२. अडचणीला टाळा (Avoid the problem)

३. अडचणीला वस्तुस्थिती समजा (Accept the problem)

आपल्या नायकाने काय करायला पाहिजे? जर नायकाने आलेल्या अडचणीला टाळलं, किंवा तिला वस्तुस्थिती समजलं तर सिनेमा तिथेच संपला, नाही का? कारण मग काही बघण्यासारखं उरलंच नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या नायकाला अडचणीला सामोरं जायला लावायचं आहे. पण असं करायचं असेल तर दुसरा मार्ग आणि तिसरा मार्ग (टाळणे किंवा वस्तुस्थिती समजणे) हे अस्तित्वातच नसले पाहिजेत. नायकाने अडचणीला सामोरं गेलं पाहिजे आणि जर तो नाही गेला तर त्याच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नसला पाहिजे. 

याला मराठी मध्ये एक उत्तम म्हण आहे, “इकडे आड आणि तिकडे विहीर”. हे केलं तरी प्रॉब्लेम, आणि ते केलं तरी प्रॉब्लेम. कात्रीत अडकायला पाहिजे हिरो. त्याच्यासमोर दोन पर्याय पाहिजेत आणि दोन्ही त्याला नको असलेले हवेत. The hero has to face two equally unacceptable choices. अशी जेव्हा स्थिती येईल तेव्हा संघर्ष निर्माण झाला असं म्हणता येईल. 

आता काही उदाहरणे घेऊन बघूया कसा संघर्ष निर्माण होतो फिल्म्स मध्ये. 

१. Story of a UD Student

माझी “Story of a UD Student” अशी एक ऍनिमेशन फिल्म आहे. ती खालच्या लिंक वर बघता येईल. 

https://www.youtube.com/watch?v=1gz6eJTvC0w

या फिल्म मध्ये तो स्टुडन्ट आहे, तो हळू हळू शिक्षणातली एक एक पायरी चढतो, आणि त्या पायऱ्या जसजसा तो वरती जाईल तसतशा उंच होत जातात. पहिल्यांदी तो कोर्सेस ची पायरी चढतो, मग थिसीस ची चढतो, मग ग्रॅड्युएशन ची चढतो, आणि मग सगळ्यात सगळ्यात शेवटी “जॉब सर्च” च्या पायरीपाशी येतो. ही पायरी सगळ्यात उंच असते आणि त्याला ती काही केल्या चढता येत नाही. आणि त्याला मागे पण जात येत नाही, कारण त्याचं ऑलरेडी ग्रॅड्युएशन झालेलं असतं, त्याला सर्वांची मान्यता मिळालेली असते, शिक्षण पूर्ण झालेलं असतं. त्याची इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती होते. त्यातून तो कसा बाहेर पडतो हे जाणून घेण्यासाठी ती फिल्म बघा. 




२. The King’s Speech

या सिनेमा मध्ये अल्बर्टला तोतरेपणाचा त्रास असतो, आणि त्यामुळे बराच न्यूनगंडही आलेला असतो. त्याला तो राजा बनू शकेल असा अजिबात आत्मविश्वास नसतो. परंतु त्याचा मोठा भाऊ एडवर्ड, जो खरा वारसाहक्काने राजा बनणार असतो, तो ते पद सोडतो आणि अल्बर्ट वरती जबाबदारी पडते. जरी त्याला नीट बोलता येत नसलं, स्वतःवर विश्वास नसला तरीही त्याला अशा पदाची जबाबदारी सांभाळावी लागते की जिथे वक्तृत्व, आत्मविश्वास हा गोष्टी असणं गरजेचं असतं. इकडे आड आणि तिकडे विहीर अशा परिस्थितीत तो सापडतो. 

३. चाची ४२०

या सिनेमा मध्ये कमल हसन चा घटस्फोट झालेला असतो, आणि त्याची एकुलती एक मुलगी असते तिची जबाबदारी आईने (तब्बूने) घेतलेली असते. त्यामुळे त्याला स्वतःच्या मुलीला जास्त वेळ भेटता येत नाही. आणि घटस्फोट तर झालेला असतो, त्यामुळे परत बायको आणि मुलीबरोबर राहायची सोय नसते. इकडे आड आणि तिकडे विहीर अशा परिस्थितीत तो सापडतो. 

image9.jpg

४. Kevin

माझी “Kevin” नावाची एक शॉर्ट फिल्म आहे. त्यामध्ये एक मुलगा आपल्या बाबांना रात्री झोपेतून उठवतो. त्याला एकट्याला त्याच्या खोलीमध्ये झोपायची भीती वाटत असते, त्यामुळे तो रडत असतो. बाबा उठतो, पण त्याला परत लगेच झोपायला जायचं असतं. झोपायला जाऊ का मुलाकडे बघू अशा कात्रीत तो सापडतो. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण होते. 

ही फिल्म तुम्ही खालच्या लिंक वर बघू शकता. 

४. Casablanca

Casablanca फिल्म मध्ये रिक चं पात्र असं आहे की त्याला कुणाच्याही कामामध्ये नाक खुपसायला आवडत नाही. “I don’t stick my neck out for anyone”. असं तो अभिमानाने सांगतो. परंतु त्याचीच पूर्वीची मैत्रीण, ईलसा त्याच्या आयुष्यात परत येते, आणि तिची आणि तिच्या प्रियकराची Casablanca मधून सुटका करून द्यायची वेळ येते, तेव्हा मात्र तो त्याच्या तत्वाला मुरड घालतो. इकडे आड आणि तिकडे विहीर अशा कात्रीत तो सापडतो.

५. The Lord of the Rings (LOTR)

LOTR मध्ये फ्रोडो च पात्र असं आहे की त्याला शायर मध्ये राहायचं आहे, कुठेही बाहेर पडायचं नाहीये, कसलंही टेन्शन नको आहे. पण हे सुंदर जग वाचवायला एका जीवावर भेटणाऱ्या मोहिमेवर त्याला जावं लागतं आणि ती रिंग नष्ट करायची जबाबदारी त्याच्याकडे येते. Physically तो सगळ्यात कमकुवत उमेदवार असतो त्या कामगिरीसाठी, परंतु त्याला जी जबाबदारी पेलावी लागते. इकडे आड आणि तिकडे विहीर अशा कात्रीत तो सापडतो.

image10.jpg

६. ArkAngel (Black Mirror)

नेटफ्लिक्स वरती ब्लॅक मिरर नावाची एक सिरीयल आहे. त्याच्या चौथ्या सीझनमधला एक “ArkAngel” नावाचा एपिसोड आहे. त्याच्यामध्ये एक आई आपल्या मुलीचं रक्षण करण्यासाठी, तिला ज्या गोष्टींची भीती वाटते त्या गोष्टी तिच्यापासून एक यंत्र वापरून लपवते. परंतु असं केल्यामुळे तिच्या मुलीची वाढ नीट होत नाही, आणि काही संवेदना नीट develop होत नाहीत. म्हणून ते ते यंत्र काही वेळापुरतं निकामी करते, पण मग तिला सतत मुलीची काळजी वाटत राहते. मग कधीतरी ती अशीच ते यंत्र चालू करते तर तिची मुलगी तिच्या बॉयफ्रेंड बरोबर असतानाची दृश्य तिला दिसतात. तिला खरं तर तिच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नसते पण तिला तिची काळजी पण वाटत असते. इकडे आड आणि तिकडे विहीर अशा कात्रीत ती सापडते. 

७. The Crown

नेटफ्लिक्स वरती The Crown नावाची अजून एक सिरीयल आहे. त्याच्यामध्ये तर राणी एलिझाबेथ अनेक वेळेला अशा कात्रीत सापडताना दाखवलेली आहे. त्यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे तिची स्वतःची स्टोरी, ज्याच्यामध्ये तिचे तिच्या नवऱ्याबरोबरचे संबंध बरे नसतात, लग्न मोडकळीला आलेलं असतं, पण ती राणी असते, आणि राणीने घटस्फोट घेणे हे अमान्य असतं. त्यामुळे तिला तिचं लग्न काही केल्या तिकवावं लागतं. इकडे आड आणि तिकडे विहीर अशा कात्रीत ती सापडते.

image7.jpg

८. The People vs OJ Simpson

नेटफ्लिक्स वरती The People vs O J Simpson नावाची अजून एक सिरीयल आहे. त्याच्यामध्ये एक अतिशय प्रसिद्ध खेळाडू, O J Simpson, एका खुनाच्या प्रकरणामध्ये सापडतो. त्याच्याविरुद्ध केस एक स्त्री वकील लढत असते. तो इतका प्रसिद्ध असतो की त्याला जर शिक्षा झाली तर समाजाचा प्रचंड रोष ओढवून घ्यायची शक्यता असते, आणि तिचं स्वतःचं वकिली करिअर धोक्यात येणार असतं. पण तिला केस तर लढवायची असते कारण सर्व पुरावे OJ च्या विरोधात असतात. इकडे आड आणि तिकडे विहीर अशा परिस्थितीत ती सापडते. 

image12.jpg

अशी अनेक उदाहरणे देता येतील. जवळ जवळ प्रत्यक्ष सिनेमामध्ये इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती मुख्य पात्र अनुभवतं, आणि त्यातून ते कसं बाहेर पडतं याने सिनेमा घडतो. 

या आणि याच्या आधीच्या लेखामध्ये मिळून आपण तीन महत्वाच्या गोष्टींविषयी बोललो ज्या फिल्म मधल्या पात्रांच्या भावनिक प्रवासासाठी महत्वाच्या आहेत. आता या तीन गोष्टी आणि आपला कुंडलिनी ग्रेडियंट एकत्र करून आपण संपूर्ण फिल्म च्या रचनेविषयी विचार पुढच्या लेखात करू. 

Previous
Previous

6) Hero and Desire

Next
Next

8) Trailers