8) Trailers

Originally published in May 2018

मागच्या काही लेखांमध्ये आपण ज्या महत्वाच्या गोष्टींविषयी बोललो त्यांचा थोडक्यात आढावा घेऊ. 

१. फिल्म मधली पात्रं कुंडलिनी ग्रेडियंट मधून जातात. फिल्म च्या सुरुवातीला पात्रांची एक कुंडलिनी असते आणि सगळ्यात शेवटी दुसरी. 

२. आधीची कुंडलिनी नंतरच्या कुंडलिनी पेक्षा खालच्या पातळीला असेल तर ते पात्र प्रेरणादायी ठरतं, आणि जर वरच्या पातळीला असेल तर ते पात्र करुण ठरतं. 

३. कुंडलिनी चा हा प्रवास घडण्यासाठी तीन महत्वाच्या गोष्टी असणं आवश्यक आहे. फिल्मला एक नायक पाहिजे, त्या नायकाला काहीतरी जिज्ञासा पाहिजे. 

४. त्या जिज्ञासेच्या आड येणारी एक अडचण, जी इकडे आड आणि तिकडे विहीर या स्वरूपात येते, आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संघर्षाला नायकाला तोंड द्यावं लागतं. 

आता या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आख्खा सिनेमा नक्कीच बघू शकतो, पण एखाद्या सिनेमा मधल्या या गोष्टी जाणून घ्यायचा सगळ्यात सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्या सिनेमाचं ट्रेलर बघणे. कुठल्याही सिनेमाचं ट्रेलर हे नेहमी मोफत उपलब्ध असतं, आणि फक्त YouTube वरती जाऊन शोधावं लागतं. 

आता इथे थोडं सावधानतेने पावलं टाकली पाहिजेत बरं का! कारण सिनेमाचं ट्रेलर संकलित करणं ही एक फार मोठी कला आहे असं मला वाटतं. ट्रेलर दाखवण्यामध्ये त्या सिनेमाधले ठळक मुद्दे हे दाखवावे अशी माझी तरी अपेक्षा आहे. आणि ठळक मुद्दे म्हणजे कथेतले ठळक मुद्दे. ते तर minimum असले पाहिजेत. बाकी डोळ्याचं पारणं फेडणारी चित्रं (आणि कधी कधी कानाचे पडदे फाटवणारे ध्वनी) असतातच ट्रेलर मध्ये, पण ते सोडून कथेतले महत्वाचे मुद्दे असले पाहिजेत. बऱ्याचशा ट्रेलर मध्ये ते नसतात. याचं एकमेव कारण म्हणजे कथेपेक्षा चित्रांना, किंवा ध्वनीला अवाजवी महत्व दिलं जातं. हा प्रॉब्लेम बऱ्याच ट्रेलर्स मध्ये दिसून येतो (कौल नावाच्या मराठी सिनेमाचं ट्रेलर बघा). 

ट्रेलर म्हणजे काय असतं? इंग्लिश मध्ये ज्याला “elevator pitch” असं म्हणतात, त्यालाच सिनेमाच्या भाषेत आपण ट्रेलर म्हणू. ट्रेलर मध्ये तुम्हाला २-३ मिनिटे दिलेली आहेत, आणि त्या वेळामध्ये तुम्हाला तीन मुख्य गोष्टी करायच्या आहेत. 

१. तुमच्या कथेतले महत्वाचे मुद्दे सांगायचे आहेत (In the order of highest to lowest priority, नायक, जिज्ञासा, त्याचा संघर्ष, आणि मग कुंडलिनी ग्रेडियंट च्या पातळ्या. या मधले पहिले दोन मुद्दे हे सर्वात महत्वाचे. बाकीचे पर्यायी, किंबहुना कुंडलिनी चे मुद्दे सांगून टाकले तर मग सांगायचं काहीच उरणार नाही.) 

२. एक प्रश्न अनुत्तरित सोडायचा आहे की ज्याचं उत्तर मिळायला लोक सिनेमा बघतील. सहसा हा प्रश्न संघर्षाशी निगडित असतो (म्हणजे एकतर संघर्ष काय, किंवा संघर्ष आधीच सांगितला असेल तर त्याचा निकाल काय लागणार, असा प्रश्न) 

३. चित्र, ध्वनी आणि चित्रपट निर्माते यांच्याविषयी विश्वास संपादन करायचा आहे. 

तिसरा मुद्दा हा महत्वाचा आहे पण पहिल्या दोन मुद्द्यांच्या मानाने गौण आहे. 

कुठल्याही सिनेमाच्या ट्रेलर मध्ये हे तीन मुद्दे थोड्याफार फरकाने सापडतात. काही ट्रेलर्स ही नायकाच्या ओळखीने चालू होतात, काही ट्रेलर्स ही संघर्षाने चालू होतात, तर काही ट्रेलर्स ही फक्त चित्र, ध्वनी आणि चित्रपट निर्माते यांच्यावर भर देतात. 

काही ट्रेलर्स ची उदाहरणे घेऊ. 

१. दंगल 

मला वाटतं हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये नायकाला एक अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे बरीचशी हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमांची ट्रेलर्स ही चालूच नायकाच्या ओळखीने होतात. मग जमलं तर त्याची जिज्ञासा, आणि मग संघर्ष येतो. दंगल च्या ट्रेलर मध्ये आमिर खान सारखा मोठा नायक असूनही कथेतल्या मुद्द्यांना खूपच महत्व दिलेलं आहे ही कौतुकाची गोष्ट आहे. 

हे ट्रेलर बघा. विचार करा यामध्ये काय काय सांगितलंय?



नायक = महावीर सिंग फोगाट 

जिज्ञासा = स्वतःला भारतासाठी सुवर्णपदक मिळवता आलं नाही, म्हणून मुलांनी मिळवावे ही इच्छा 

संघर्ष = जिज्ञासा पूर्ण करायला मुलगा हवा, पण चार मुली झाल्या, आता सुवर्णपदक कसं मिळवणार?

अनुत्तरित प्रश्न ज्याच्यासाठी लोक सिनेमा बघतील = मुली सुवर्णपदक मिळवणार का? जिज्ञासा पूर्ण होणार का?

चित्रपट निर्माता आणि अभिनेता = आमिर खान, आधी चांगले सिनेमे काढायचं track record असल्याने विश्वास संपादन

२. कबाली 

हा तर रजनीकांत चा सिनेमा आहे. रजनीकांत च्या सिनेमाला फक्त रजनीकांत नायक आहे एवढं सांगितलं तरी पुरतं नाही का? 

याच ट्रेलर इथे बघू शकता. 



नायक = कबाली, म्हणजे रजनीकांत 

जिज्ञासा = काय माहिती? 

संघर्ष = No idea! 

अनुत्तरित प्रश्न ज्याच्यासाठी लोक सिनेमा बघतील = हा फारच गहन प्रश्न झाला. हा हा! हा कुठला सिनेमा बरं रजनीकांतचा हाच अनुत्तरित प्रश्न आहे फक्त. 

चित्रपट निर्माता आणि अभिनेता = रजनी, रजनी आणि रजनी. बास! 

३. The Dark Knight

हे ट्रेलर नायकाच्या ओळखीने चालू होतं. गंमत म्हणजे ही ओळख त्या सिनेमाचा खलनायक म्हणजे जोकरच करून देतो. त्यामुळे नायक आणि संघर्ष दोन्ही एकदमच कळतात almost. अजून महत्वाची गोष्ट म्हणजे जोकर हा कसा मानसिक खेळ खेळणारा खलनायक आहे ते कळतं. नंतर Gotham विषयीचं ब्रूस चं प्रेम, शहराची झालेली दयनीय अवस्था, आणि शहराला वाचवायची ब्रूस ची जिज्ञासा याही गोष्टी स्पष्ट होतात. 

याचं ट्रेलर इथे बघू शकता. 

नायक = ब्रूस वेन किंवा बॅटमॅन 

जिज्ञासा = गॉथम शहराला वाईट लोकांपासून वाचवणे  

संघर्ष = जोकर शी प्रत्यक्ष सामना 

अनुत्तरित प्रश्न ज्याच्यासाठी लोक सिनेमा बघतील = बॅटमॅन आणि जोकर मध्ये नक्की कशी लढाई होते?  

चित्रपट निर्माता आणि अभिनेता = ख्रिस्तोफर नोलान, बॅटमॅन, देमारपट वगैरे वगैरे.  

४. फास्टर फेणे

हा ट्रेलर खरं तर भा रा भागवतांच्या ओळखीने चालू होतो. म्हणजे नायक, किंवा कथेपेक्षा मूळ कथाकाराच्या नावाने प्रेक्षकांना आत ओढण्याचा प्रयत्न. मग नंतर नायक दिसतो, पण त्याची जिज्ञासा आधी दिसते. (काहीतरी हरवलंय का? मी शोधून देऊ? म्हणजे सतत या मुलाला कसलंतरी कुतूहल आहे ही जिज्ञासा.) मग त्याचं नाव समोर येतं, बनेश फेणे. मग जवळपास सगळं ट्रेलर संघर्षात जातं. खलनायक सुद्धा शेवटी येतो. पण नक्की संघर्ष काय आहे, कदाचित कळत नाही असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं सांगा! म्हणजे गिरीश कुलकर्णीच्या छद्मी हसण्यावर जास्त फोकस आहे, actually तो बनेश फेणेच्या विरोधात का आहे हे सांगण्यापेक्षा. काय वाटतं?

ट्रेलर तुम्ही इथे बघू शकता. 

नायक = बनेश फेणे

जिज्ञासा = विविध गोष्टींचं कुतूहल, काहीतरी सारखं शोधून काढायचा प्रयत्न   

संघर्ष = खलनायकाशी सामना  

अनुत्तरित प्रश्न ज्याच्यासाठी लोक सिनेमा बघतील = हे फार काही चांगल्या प्रकारे स्पष्ट होत नाही, कारण खलनायक कशासाठी खलनायक आहे आणि त्यामुळे नायकाशी सामना कशा प्रकारे होईल हे कळत नाही (The Dark Knight मध्ये कसं, गॉथम शहरावर आलेले संकट (संघर्ष) आणि गॉथम शहराला वाचवणे (जिज्ञासा) यामध्ये गॉथम शहर हा समान दुवा आहे.)   

चित्रपट निर्माता आणि अभिनेता = भा रा भागवतांच्या कथेवर सिनेमा, देमारपट, रितेश देशमुख ची निर्मिती वगैरे वगैरे   

५. Cars 

Pixar चं ट्रेलर नायक आणि संघर्ष यांच्यापासून चालू होतं. नायक, म्हणजे Lightening McQueen येतो, मग तो स्वतःचं वर्णन करतो, आणि मग त्याचा संघर्ष म्हणजे तो त्याचं जे जे वर्णन करतो, त्याच्या बरोबर विरुद्ध गोष्टी त्याला करायला लागतात. नंतर Pixar च्या आधीच्या सिनेमांची ओळख, म्हणजे Finding Nemo, The  Incredibles  असे सिनेमे बनवणाऱ्या स्टुडिओ कडून येणारा नवीन सिनेमा, असं! अशी त्यांनी त्यांची जाहिरात करणं अगदी सार्थ आहे, कारण त्यांचे आधीचे सिनेमे पूर्णपणे अभिमान वाटण्याच्याच (किंवा फुल्ल माज करण्याच्याच) प्रतीचेच होते. आणि मग नंतर त्याची जिज्ञासा समोर येते की जेव्हा Mator त्याला विचारतो कि “What’s so important with this race of yours?”

हे ट्रेलर इथे बघू शकता. 

नायक = Lightening McQueen 

जिज्ञासा = रेस कार आणि सेलेब्रिटी म्हणून मिरवणे, रेस मध्ये भाग घेणे आणि जिंकणे    

संघर्ष = जिथे त्याच्याविषयी लोकांना काहीही माहिती नाहीये अशा ठिकाणी येऊन पडणे आणि तिथून कसंतरी बाहेर पडून रेस पर्यंत पोचणे   

अनुत्तरित प्रश्न ज्याच्यासाठी लोक सिनेमा बघतील =  Lightening McQueen रेस पर्यंत पोचतो का? What has he been missing?

चित्रपट निर्माता आणि अभिनेता = विनोदी ऍनिमेशन, Pixar स्टुडिओ ची फिल्म   

६. The Lord of the Rings : Fellowship of the Ring

याचं ट्रेलर तर फारच इंटरेस्टिंग आहे, कारण ते संघर्षाने उघडतं. नायक नंतर येतो. कदाचित याचं कारण असं असावं की हा सिनेमा आला तेव्हा नायक हा काही फार ओळखीचा चेहरा नसावा. किंवा संपूर्णपणे मूळ कथेला न्याय देण्यासाठी असा विचार केला असावा. 

ट्रेलर इथे बघू शकता. 

नायक = फ्रोडो 

जिज्ञासा = रिंग नष्ट करणे 

संघर्ष = जी रिंग मिळवायला दुष्टातला दुष्ट खलनायक टपून बसलेला आहे, त्याच्या नकळत ती रिंग Mount Doom ला नेऊन नष्ट करणे.  

अनुत्तरित प्रश्न ज्याच्यासाठी लोक सिनेमा बघतील = फ्रोडो रिंग नष्ट करू शकतो का?  

चित्रपट निर्माता आणि अभिनेता = प्रसिद्ध कादंबरीवरती सिनेमा आहे, त्यामुळे ज्यांना ती कादंबरी माहिती आहे, ते तो सिनेमा नक्की बघणार.  

७. The Silence of the Lambs

हे ट्रेलर संघर्ष आणि नायक दोन्हीने उघडतं. पहिलाच प्रश्न नायिकेला विचारला जातो कि “तू सहजासहजी घाबरतेस का?” आणि मग नायिका समोर येते. यावरून कळतं की नायिकेला कशाचीतरी भीती वाटणार आहे. या ट्रेलर मध्ये आणि कदाचित अशा जुन्या ट्रेलर्स मध्ये सर्रास एक वेगळं निवेदन वापरलं जायचं. म्हणजे फक्त सिनेमामधले शॉट्स नाही तर मागे एक वेगळा आवाज ट्रेलर मध्ये काय दिसतंय ते समजावून सांगायचा. ट्रेलर मधली गोष्ट पटकन कळायला याचा उपयोग होतोच, पण खर तर ही थोडीशी पळवाट आहे असं मला वाटतं. या ट्रेलर मध्ये असंच निवेदन आहे. “A killer is on the loose, a rookie FBI agent … “ वगैरे वगैरे. 

हे ट्रेलर इथे बघू शकता. 

नायक = क्लॅरीस स्टर्लिंग (जोडी फॉस्टर) 

जिज्ञासा = स्वतःला स्वतःच्या करिअर मध्ये सिद्ध करणे, आणि मारेकऱ्याला शोधणे

संघर्ष = एक अत्यंत हुशार अपराधी, जो जवळजवळ संमोहन करून तुमचे विचार बदलू शकतो, अशा माणसाबरोबर काम करून मारेकऱ्याला शोधणे

अनुत्तरित प्रश्न ज्याच्यासाठी लोक सिनेमा बघतील = क्लॅरीस तो मारेकरी शोधते का?  

चित्रपट निर्माता आणि अभिनेता = यावर काही एवढा भर आहे असा नाही वाटत मला.  

८. कौल 

मला अजूनपर्यंत कळलेलं नाही या ट्रेलर मधून काय सांगायचं आहे. मला जाणून घ्यायला नक्की आवडेल. 

हे ट्रेलर इथे बघू शकता. 

नायक = माहिती नाही 

जिज्ञासा = कळत नाही. 

संघर्ष = छे!   

अनुत्तरित प्रश्न ज्याच्यासाठी लोक सिनेमा बघतील = काही प्रश्नच विचारला नाही तर..   

चित्र, ध्वनी आणि चित्रपट निर्माता = चित्र आणि ध्वनी चांगल्या प्रतीचे आहेत, पण काय पुढे काय?   

९. The Script

माझ्या या सिनेमाचं ट्रेलर मी २०१४ मध्ये यूट्यूब वर प्रदर्शित केलं होतं. या सिनेमाची कथा अशी होती की दोन माणसे एका संपूर्ण मोकळ्या रूम मध्ये अचानक अवतरतात. त्यांना माहिती नसतं ते कोण आहेत, कशासाठी तिथे आलेत वगैरे वगैरे, पण त्यांना हळू हळू कळत जातं की ती एका गोष्टीतली दोन पात्रे आहेत, आणि सिनेमा जसजसा पुढे जातो तसतसे ते घडत जातायंत. ट्रेलर एक simple tagline होती. “Two Men, Being Developed, in a Script”. खूप मजा अली होती ट्रेलर edit करताना. 

माझ्या आत्ता लक्षात आलं की मी यामध्ये मी नायक, जिज्ञासा आणि संघर्षाला एकाच वेळेला समोर आणलं. बघा या ट्रेलर मध्ये. 

आणि हा संपूर्ण सिनेमा तुम्ही इथे बघू शकता. 

नायक = दोन नायक आहेत. इथे मी जो एक नायकाचा नियम आहे तो मोडला.  

जिज्ञासा = स्वतःचे नाव, तिचे असायचा हेतू शोधणे. 

संघर्ष = कशाचाही गंध नासाने आणि घडणाऱ्या गोष्टींवर नियंत्रण नसणे 

अनुत्तरित प्रश्न ज्याच्यासाठी लोक सिनेमा बघतील = त्यांना कळतं की ती घडत जाणारी पात्रे आहेत, पण मग पुढे काय होतं?   

चित्र, ध्वनी आणि चित्रपट निर्माता = चित्र आणि ध्वनी चांगल्या प्रतीचे आहेत, चित्रपट निर्माता, मीच तो. हाहाहा!   

१०. Shank’s 

हा माझा सगळ्यात नवीन सिनेमा. मागच्या वर्षी प्रदर्शित झाला. एक मराठी शेफ बऱ्याच अडचणींना पार करून कसं त्याचं मराठी रेस्टॉरंट उघडतो, अशी कथा आहे. ट्रेलर उघडतं खरं तर मराठी खाद्यपदार्थांच्या शॉट्स ने. आणि मराठी कुझीन विषयी काही चर्चा होते. याचं कारण हे की लोकांना ट्रेलर मध्ये इंटरेस्ट निर्माण करण्यासाठी आधी मराठी फूड चा आसरा घेणं गरजेचं होतं, कारण माझ्या सिनेमामध्ये काही ओळखीचा चेहरा किंवा मोठा चित्रपट निर्माता नव्हता. मग नायकाची, म्हणजे शेफ ची ओळख आणि मग त्याची मराठी रेस्टॉरंट काढायची जिज्ञासा. त्याच्या संघर्षाची थोडीशी चाहूल करून दिली त्याच्या बायकोच्या ओळखीतून, की त्याची बायको जर त्याच्याबरोबर नसती तर जे काही रेस्टॉरंट त्याने उघडलं ते तो उघडू शकला नसता. 

हे ट्रेलर तुम्ही इथे बघू शकता. 

नायक = मराठी शेफ, शशांक जोशी   

जिज्ञासा = मराठी fine dining रेस्टॉरंट उघडणे  

संघर्ष = रेस्टॉरंट उघडायला आलेले कष्ट  

अनुत्तरित प्रश्न ज्याच्यासाठी लोक सिनेमा बघतील = कोण आहे हा शशांक जोशी आणि त्याने कसं मराठी रेस्टॉरंट उघडलं?   

चित्र, ध्वनी आणि चित्रपट निर्माता = मराठी फूड ची “fine dining” सारखी चित्रं  

पुढच्या वेळेला एखादं ट्रेलर बघाल तेव्हा या गोष्टींचा विचार नक्की करा, आणि मला सांगा की तुम्हाला मी सांगितलेले मुद्दे पटतात का ते. सिनेमामधलं काय निवडायचं ट्रेलर मध्ये दाखवायला ही खरंच कला आहे असं मला वाटतं आणि ती आत्मसात करायला “गोष्ट सांगायची कशी?” याचा अभ्यास नक्कीच महत्वाचा आहे.

आत्तापर्यंतच्या सगळ्या लेखांमध्ये आपण सिनेमाची कथा, त्यातले महत्वाचे मुद्दे, पात्रांचा प्रवास यांचा विचार केला. आता यापुढच्या काही लेखांमध्ये तांत्रिक बाबींविषयी बोलू. 

Previous
Previous

7) Conflict

Next
Next

9) Screenplay