13) नवीन गुंतवणूकदारांसाठी
Originally published on May 24, 1992
Written by Dr Dileep Javadekar
जुन्या कंपनीला जनतेकडून भांडवल मागण्याआधी पहिल्या शेअरहोल्डर्सनाही काही ‘ऑफर’ द्यावी लागते. समजा एक दहा कोटीची मालमत्ता असलेली कंपनी आपले भांडवल दुप्पट करू इच्छिते, तर ती ते एकतर आधीच्या शेअरहोल्डर्सकडूनच मागू शकेल किंवा त्यातील काही भाग आधीच्या शेअरहोल्डर्सकडून आणि काही भाग इतर जनतेकडून उभा करू शकेल. मात्र आधीच्या शेअरहोल्डर्संना काहीच ‘ऑफर’ न देता सर्व नवे भांडवल इतर लोकांकडून गोळा करणे हा आधीच्या शेअरहोल्डर्सचा एक प्रकारे विश्वासघात होईल. त्यामुळे कंपनी एकतर ‘राईट इश्यू’ (आधीच्या शेअरहोल्डर्संना हक्क म्हणून नव्या शेअर्सची ऑफर) किंवा ‘राईट कम पब्लिक इश्यू’ (म्हणजे काही भाग हक्क तत्त्वावर आणि उरलेला आम जनतेसाठी खुला) काढेल.
मागील लेखात सांगितल्याप्रमाणे हा ‘राईट कम पब्लिक इश्यू’ बहुतेक वेळा ‘विथ अ प्रीमिअम’ किंवा दहा रुपयांचा शेअर चाळीस रुपयांना अशा प्रकारे असतो. यातील दहा रुपये शेअर खात्यावर आणि तीस रुपये हे प्रीमिअम अकाऊंटमधून कंपनीच्या साठवलेल्या निधीमध्ये जमा होतात.
कोणताही उद्योगधंदा सुरू करताना भांडवल उभारणी दोन प्रकारे होते. एक म्हणजे मालकाने त्यात घातलेला पैसा आणि दूसरा प्रकार म्हणजे बॅंका, अर्थसंस्था किंवा इतर लोकांकडून परतफेडीच्या बोलीवर व्याजाने घेतलेले कर्ज!
मालकाचा स्वत:चा पैसा म्हणजे विकलेल्या शेअर्समधून जमलेला निधी. याशिवाय कंपनी अर्थसंस्था, बॅंका याकडून कर्जाऊ रक्कमही उचलते. याबरोबरच सामान्य माणसाकडून मोठमोठ्या कंपन्या कर्ज घेतात. ते कसे? तर डिबेंचरच्या स्वरूपात. डिबेंचर म्हणजे कर्जरोखा! लार्सन टुब्रो, एस्सार, गुजरात, टाटा स्टील यांसारख्या प्रचंड महाकाय कंपन्यांनाही आपल्यासारखा छोटा माणूस पैसे कर्जाऊ देऊ शकतो. कंपनीला हवा असलेला कर्जनिधी कंपनी शंभर शंभर रुपयांच्या छोट्या कर्जरोख्यांमध्ये विभागते आणि मग ते कर्जरोखे आपण घेतो. अटीनुसार मला त्यावर १६-१७ टक्के दरसाल व्याजही मिळते. आणि सात ते दहा वर्षांच्या मुदतीनंतर हे पैसे परतही मिळतात. शेअरमध्ये गुंतवलेले पैसे असे परत मिळू शकत नाहीत.
या डिबेंचर्समध्येही नॉन कनव्हर्टिबल, पार्टली कनव्हर्टिबल आणि फुल्ली कनव्हर्टिबल असे प्रकार असतात.
नॉन कनव्हर्टिबल म्हणजे शेअर्समध्ये रूपांतर न होणारे डिबेंचर्स. ते मुदतीनंतर पूर्णपणे परत केले जातात. हे खऱ्या अर्थाने कर्जरोखे म्हणता येतील.
पार्टली कनव्हर्टिबल डिबेंचर्सचा काही भाग हा सहा महिन्यांनंतर किंवा ठरलेल्या मुदतीनंतर ठरलेल्या प्रीमिअमला त्याच कंपनीच्या शेअरमध्ये रुपांतरित केला जातो. या प्रकारात कंपनीला सहा महिनेच शंभर रुपयांवर व्याज द्यावे लागते. त्यानंतर फक्त साठ रुपये कर्जस्वरूपात राहतात. गुंतवणूक दारालाही हे सोयीचे असते. कारण चाळीस रुपयांना कनव्हर्शन होऊन मिळालेला शेअर बाजारात कदाचित शंभर-दीडशे रुपयांनाही विकला जातो.
फुल्ली कनव्हर्टिबल डिबेंचर्स हे टप्प्या-टप्प्याने पूर्णपणे शेअरमध्ये रूपांतरित होतात. आणि डिबेंचर होल्डर्संना शेवटी काही रक्कम परत करायची जबाबदारी कंपनीवर राहत नाही.
राईट कम पब्लिक इश्यू हा अशा कनव्हर्टिबल डिबेंचर्सचा असला तरी त्याचा फॉर्म वगैरे शेअरसारखाच भरून अर्ज करावा लागतो.
एका बाजूला आपले हे शेअर गुंतवणुकीचे गोडवे गाणारे लेख सुरू आहेत आणि दुसऱ्या बाजूला कोट्यावधी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या रोजच्या रोज बातम्या येत आहेत.
या बातम्या वाचून नवीन गुंतवणूकदार वर्ग पुन्हा घाबरला आहे. गुंतवणुकीत फारशी वाढ झाली नाही, तरी चालेल. परंतु शेअर बाजाराकडे वळायला नको बुवा, अशी एक मनोवृत्ति बनू लागली आहे. याला कारणेही अनेक आहेत. एप्रिलमध्ये शेअर मार्केटमध्ये गर्दी करणारा नवा गुंतवणूकदारही डोळ्यावर तेजीची झापडे लावून जेवढा आंधळेपणाने या गुंतवणुकीकडे वळला होता तेवढाच आज तिथून पळ काढणारा गुंतवणूकदारही अनभिज्ञ आहे.
शेअर दलाल हर्षद मेहता याने बऱ्याच बँकांना हाताशी धरून बराच पैसा शेअर मार्केटमध्ये ओतला आणि अभूतपूर्व तेजी आली/आणली, असे म्हणतात. तशी तेजी आली हे खर असलं तरी त्यातला पोकळपणा किती होता? प्रत्यक्ष कोणत्याही व्यवहारांची पैशाकडून आणि शेअर डिलिव्हरीच्या दृष्टीनं पूर्तता करायची तयारी श्री. हर्षद मेहता यांनी दाखवली आहे. असे जर होऊ शकत असेल तर त्या व्यवहारांना पोकळ म्हणता येणार नाही. या तेजीमध्ये आपल्याकडील शेअर विकलेल्या लोकांना जर त्यांचे पैसे मिळणार असतील तर गैरव्यवहार झाला कुठे? तर हा गैरव्यवहार बँकांमधील पैसा अयोग्य रीतीने शेअर बाजारात वळविण्यात आला तिथे झाला आहे, असे म्हणता येईल. प्रत्यक्ष या व्यवहारांची तपासणी सी.बी.आय. करीत आहेच. त्यातून सत्य बाहेरही येईल. परंतु असा पैसा बँकेतून जर बाहेर काढत येत असेल तर खरा धोका शेअर बाजारात पैसे गुंतवण्यात आहे, की बँकांमध्ये ठेवी ठेवण्यात आहे, याचाही विचार करायला नको का?
साधारण एप्रिलमध्ये जी अभूतपूर्व तेजी आली त्याच्यापेक्षा आज शेअर्सचे भाव ३० टक्क्यांनी उतरले आहेत. कोणत्याही अशा तेजीनंतर बाजार एवढी प्रतिक्रिया दाखवतोच, त्यात नवीन काही नाही. दोन वर्षांपूर्वी शेअर बाजार निर्देशांक १६०० वरुन १००० पर्यंत घसरला. तेव्हाही पेपरमधील बातम्यांमध्ये गुंतवणूकदारांचे हात असेच भाजले होते. परंतु तेव्हा १६०० च्या दरम्यान निर्देशांक असतानाही ज्या गुंतवणूकदारांनी धीराने आणि वस्तुनिष्ठ विचारांनी आपले शेअर्स धरून ठेवले आणि बाजार घसरल्यावर त्यात भर टाकली त्यांची संपत्ती आज किती वाढली हे कुणी छापत नाही. उंच डोंगर चढून जातानाही आपण मध्ये थोडा वेळ दम खाण्यासाठी थांबतो. शेअरबाजारही असाच थांबला आहे. आज हे हर्षद मेहता प्रकरण झाले नसते तरीही बाजार असा कुठे तरी थांबला, घसरला असताच. त्यामुळे उलट पुन्हा वर जायला त्याला शक्ती मिळते.
खरोखरच या कोसळण्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांचे किती नुकसान झाले आहे त्याचा विचार करू या! आपला एक गुंतवणूकदार मे १९९१ पासून दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शंभर मास्टर शेअर विकत घेत आला आहे, असे समजू. हा गुंतवणूकदार आणि त्याची गुंतवणूक आज कुठे आहे?
महिना वर्ष गुंतवलेले रुपये शेअर्सची संख्या
मे १९९१ ३००० १००
जून १९९१ ३६५० २००
जुलै १९९१ ३३५० ३००
ऑगस्ट १९९१ २५०० ४००
(बोनस २ : १) ६००
सप्टेंबर १९९१ २८५० ७००
ऑक्टोबर १९९१ २६०० ८००
नोव्हेंबर १९९१ २६५० ९००
डिसेंबर १९९१ २४५० १०००
जानेवारी १९९२ २७०० ११००
फेब्रुवारी १९९२ ३३५० १२००
मार्च १९९२ ७००० १३००
एप्रिल १९९२ ९५०० १४००
एकूण गुंतवणूक ४५९०० रुपये
अशा रीतीने मागील वर्षात केलेल्या एकंदर ४५,९०० रुपयांचे आजच्या मास्टर शेअरच्या ६८ रुपये भावाने ९५,२०० रुपये झाले आहेत. म्हणजे ४९,३०० रुपये नफा झाला आहे. हा नफा वेळोवेळी केलेल्या गुंतवणुकीवर झाल्यामुळे प्रत्यक्षात ४५,९०० रुपये वर्षभर गुंतवलेलेही नाहीत.
आता हात पोळले कुणाचे? तर जो माणूस फक्त मार्च-एप्रिलमध्येच शेअर बाजारात शिरला आणि ज्याने ९०-९५ च्या भावानेच सगळी खरेदी केली. परंतु अशा माणसांनीही आज बाजारातून पळ न काढता अशीच गुंतवणूक चालू ठेवली तर पुढील वर्षाअखेर तो पुन्हा नफ्यात यायला हरकत नाही.
शेअर बाजारात नेहमीच आशेचा आणि भीतीचा अतिरेक होत असतो. या दोन्ही भावनातिरेकांवर काबू मिळवायला शिकणे ही तर शेअर बाजारातील यशाची गुरुकिल्ली आहे. ज्यांनी मार्च-एप्रिलमध्येच सगळी खरेदी केली त्यांना थोडे थांबावे लागेल. परंतु भीतीपोटी सगळे शेअर्स तोट्यात विकून मोकळे होणे हा त्यावरचा मार्ग नाही. मग मात्र खरोखरच हात पोळले जातील, हे नक्की!