21) विक्रीची ऑर्डर कशी द्यावी?

Originally published on July 19, 1992

Written by Dr Dileep Javadekar

एखादा शेअर खरेदी करण्यासाठी ब्रोकरकडे ऑर्डर कशी द्यावी आणि त्यानंतर काय करावे याची माहिती आपण घेतली. त्यानुसार आपल्या फाईलमध्ये ब्रोकरची कॉन्ट्रॅक्ट नोट आपण लावूनही ठेवली. विक्रीची ऑर्डर देतानाही अशीच क्रिया करावी लागेल. फक्त आधी मार्जिन म्हणून थोडे पैसे भरणे किंवा डिलिव्हरीच्या वेळी पूर्ण पैसे भरणे असे न करता आपल्याला आपल्याकडचे शेअर्स डिलिव्हरी म्हणून द्यावे लागतील. म्हणजे आपण दूरध्वनीवरून एखादी विक्रीची ऑर्डर दिल्यावर आपला ब्रोकर आपल्याला लिमिट विचारेल. नंतर सायंकाळी काय दराने आपले शेअर विकले गेले ते कळवेल आणि विक्रीची कॉन्ट्रॅक्ट नोट देईल. याही कॉन्ट्रॅक्ट नोटवर कंपनीचे नाव, विक्रीचा नेट भाव (बाजारातील भाव वजा दलाली) तारीख असेल आणि ब्रोकरची सही असेल. ही कॉन्ट्रॅक्ट नोट आपल्याला पुढील कार्यवाहीसाठी (किंवा इन्कमटॅक्स अधिकाऱ्याना पुरावा म्हणून दाखविण्यासाठी) जपून ठेवणे आवश्यक आहे.

नंतर आपण आपली शेअर सर्टिफिकेटस् ब्रोकरकडे नेऊन दिल्यावर तो आपल्याला कोरा ट्रान्स्फर फॉर्म देईल. त्यावर विकणाऱ्याच्या सहीच्या जागी आपली सही करून द्यावी लागेल. हा सही केलेला फॉर्म आणि शेअर सर्टिफिकेट एकत्र पिन करून आपला ब्रोकर विकत घेणाऱ्या ब्रोकरकडे पाठवेल. यालाच डिलिव्हरी देणे-घेणे म्हणतात. नंतर तिकडून आलेले आपले पैसे आपल्याला ब्रोकरच्या कार्यालयातून मिळतील.

जसे खरेदी केलेले शेअर प्रत्यक्ष डिलिव्हरी घेण्याआधी कॉन्ट्रॅक्ट नोटवर आपण विकू शकतो तसेच वरील विकलेले शेअर डिलिव्हरी देण्याआधी परत खरेदीही करू शकतो. याला आपली विक्री ‘कव्हर’ करणे असे म्हणतात.

आपल्या खरेदीची डिलिव्हरी आल्यानंतर आपण काय करायचे? आपला ब्रोकर वर सांगितल्याप्रमाणे आपल्याला शेअर सर्टिफिकेट आणि आधीच्या मालकाची विक्रेता म्हणून सही असलेला ट्रान्स्फर फॉर्म एकत्र जोडून डिलिव्हरी म्हणून देईल आणि त्याच्या वहीत डिलिव्हरी मिळाली, अशी आपली सही घेईल. (काही पैसे आपण देणे असलो, तर तो चेकही मागून घेईल.) अशा रीतीने आपला तो व्यवहार तिथे पूर्ण होईल.

आता आपल्या हातात जी डिलिव्हरी आहे तिला ‘बेअरर डिलिव्हरी’ असे म्हणतात. ‘बेअरर चेक’ जसा कुणीही वटवून बँकेतून पैसे काढू शकतो तशीच ही बेअरर डिलिव्हरी कुणीही आपल्या नावावर करून घेऊ शकेल. यासाठी ही नीट जपून ठेवायला हवी. अशी बेअरर डिलिव्हरी आपल्या हातून हरवली तर मग तक्रारीला जागा राहणार नाही.

मग प्रत्यक्ष हे शेअर आपल्या नावावर केव्हा होतील? हे काम कोण करेल?

इथे हे लक्षात घेतले पाहिजे, शेअर प्रत्यक्ष नावावर करण्याचे (याला शेअर नावावर चढवणे असे बाजारातल्या परिभाषेत म्हणतात.) काम ब्रोकर स्टॉक एक्स्चेंज किंवा अर्थखाते करीत नसते. हे काम कंपन्या स्वत: शेअरहोल्डर्ससाठी करतात. काही कंपन्यांनी या कामासाठी कोणी ट्रान्सफर एजंट किंवा रजिस्ट्रार नेमलेले असतात.

आता याची मदत घेऊन आपण हे शेअर्स आपल्या नावावर कधी आणि कसे चढवायचे?

कधी चढवायचे याला ‘डिलिव्हरी मिळाल्यावर लवकरात लवकर’ हे साधे, सरळ, सोपे उत्तर आहे. परंतु एकदा हे शेअर्स कंपनीकडे ट्रान्स्फरसाठी पाठविले की कमीत कमी दोन-तीन महिने (काही काही वेळा सहा सहा महिने) परत येत नाहीत. या दरम्यान बाजारभाव वाढला तरी ते शेअर्स आपण विकू शकत नाही. कारण द्यायला आपल्याकडे डिलिव्हरी नसते. त्यामुळे काही काळ तशीच बेअरर डिलिव्हरी ठेवायची आणि ती तशीच वेळ साधून विकायची असे बरेच गुंतवणूकदार करतात. परंतु अशी डिलिव्हरी तरी किती काळ ठेवता येईल?

कंपन्या साधारण वर्षातून एकदा किंवा दोनदा लाभांश वाटप करतात. कधी तरी बोनस किंवा राईट शेअर्स आधीच्या शेअर-होल्डर्सना देतात. हे कुणाला द्यायचे यासाठी कंपन्या ‘बुक क्लोजर’ची तारीख महिनाभर आधी जाहीर करतात. ही तारीख अर्थविषयक नियतकालिकांमध्ये आणि स्टॉक एक्स्चेंजचे एक अधिकृत मुखपत्र निघते. त्यातून वाचायला मिळेल. या तारखेला ते ते शेअर्स ज्याच्या नावावर कंपनीच्या पुस्तकात असतील, त्यांना तो बोनस, राईट किंवा लाभांश पाठवला जातो. तेव्हा आपण खरेदी केलेले शेअर या ‘बुक क्लोजर’ डेटच्या आत कंपनीकडे पाठवणे हे आपले कर्तव्य आहे. अन्यथा वरील फायदा आधीच्या मालकाला जाईल.

ट्रान्स्फर फॉर्मवर वरच्या बाजूस एक स्टॉक एक्स्चेंज अधिकाऱ्यांचा लाल शिक्का असतो. या शिक्क्यामध्ये तारीख असते. या तारखेपासून फक्त एक वर्ष हा ट्रान्सफर फॉर्म ग्राह्य धरला जातो. तेव्हा शिक्क्यातील तारखेपासून फक्त एक वर्ष किंवा कंपनीने जाहीर केलेली ‘रेकॉर्ड डेट’ यातील जी तारीख आधी येईल त्या आधी आपले शेअर्स नावावर चढवून घेणे आवश्यक आहे.

नवीन गुंतवणूकदाराने हे एवढे लक्ष ठेवणे शक्य नसल्यास ‘बेअरर डिलिव्हरी’ फार काळ न बाळगता लगेच ट्रान्सफरसाठी पाठविणे हा केव्हाही सोयीचा मार्ग म्हणता येईल.

Ashay Javadekar

Previous
Previous

20) खरेदी ऑर्डरचा पाठपुरावा कसा करायचा?

Next
Next

22) ट्रान्स्फर अर्ज भरण्याची पद्धती