35) ‘किंमत’ व ‘दर’ यांमध्ये गोंधळ नको

Originally published on October 25, 1992

Written by Dr Dileep Javadekar

प्रत्यक्ष खिशात पैसे नसूनही लाखो रुपयांची उलाढाल कशी करता येते आणि त्यामधून प्रचंड नफा किंवा तोटा कसा होऊ शकतो हे आपण पाहीले. परंतु ते वर्णन कितीही जरी आकर्षक वाटले, तरी त्यातील धोके ओळखून त्या बाजूला न जाणे चांगले! शेअरमध्ये करोडोपती झालेल्यांच्या गप्पा मारणाऱ्या लोकांनी आयुष्यात अनेक वेळी असे पैसे घालविलेलेसुद्धा असतात आणि ज्या उत्साहाने, अभिमानाने ते आपला विजय सांगत फिरतात त्याच शिताफीने, त्याच लबाडीने त्यांनी आपली फसगत लपवून ठेवलेली असते हे कायम लक्षात ठेवले पाहिजे.

मग अशा परिस्थितीत करायचे काय? शेअर बाजारातील फायदा हा एक बुडबुडाच आहे. असे लक्षात घेऊन त्या बाजूला फिरकयचेच नाही, असे करणेच बरोबर ठरेल काय? यावेळी एक लक्षात घ्यायला हवे, की निरनिराळ्या पद्धतीने आणि विचाराने खरेदी-विक्री करणारे लोक शेअर बाजारात येत असतात. तेव्हा ज्या माणसाला एका दिवसात लखपती होण्याची हाव नाही, त्याला शेअर-बाजारात इतरही अनेक मार्ग आहेत.

शेअर बाजारात शेकडो शेअरचा भाव किंवा दर तोंडपाठ असलेली कित्येक मंडळी आहेत. परंतु विकसित कंपनीच्या शेअरची खरी किंमत करणारे किती लोक आहेत? याचे उत्तर दुर्दैवाने फार थोडे असे आहे. एखाद्या शेअरची ‘किंमत’ एकदा आपण मनाशी केली, की मग बाजारातल्या तत्कालिक तेजी-मंदीचा त्या शेअरच्या ‘भावा’ वर काही परिणाम झाला तरी भीतीचे कारण राहत नाही. एखाद्या शेअरच्या किमतीपेक्षा त्याचा भाव काही काळ खूप वर किंवा खूप खाली जाऊ शकतो, परंतु आपला खरेदीचा निर्णय त्या किमतीवर आधारलेला असल्यामुळे दराच्या चढ-उताराचे सोयरसुतक आपल्याला राहत नाही. एखाद्या शेअरचा दर किंवा भाव पाहणे सोपे असते, रोजचा पेपर उघडला की तो सापडू शकतो. परंतु एखाद्या कंपनीची किंमत करणे हे तेवढे सोपे नाही. शिवाय ही किंमत माणसा माणसाच्या विचारभिन्नतेमुळे बदलूही शकेल.

भावाचे मात्र तसे नाही. त्यामुळे वस्तुनिष्ठ विचार करणारा, शांत डोक्याचा गुंतवणूकदार कधी ‘किंमत’ आणि ‘दर’ यांमध्ये गोंधळ घालत नाही. जर त्याने ठरविलेल्या किमतीपेक्षा एखादा शेअर स्वस्त दराने मिळत असेल, तर तो खरेदी करत राहतो. बाजारात नेहमी अशी वेळ येते, की एखाद्या विवक्षित शेअरच्या मागे किंवा एखाद्या ठराविक उद्योगाच्या मागे लोक धावू लागतात, अशा वेळी त्या शेअरना मागणी वाढल्यामुळे त्यांचा दर झपाझप वाढत जातो. अशा वेळी गर्दी सर्व नेम-नियम विसरते. वेड्यासारखा त्या शेअरचा पाठलाग चालू होतो. बाजारात विक्रीस आलेले शेअर हे मागणीपेक्षा खूपच कमी पडतात. गर्दी ही शेअरची किंमत कधी करत नाही हे आपण पाहिलेच. अशा वेळी तर ती सगळेच विसरून जाते. मात्र याच वेळी वस्तुनिष्ठ गुंतवणूकदार सावध असतो. त्या शेअरची खरी किंमत काय आहे याचे भान त्याने कधीही सोडलेले नसते. तो या किमतीपेक्षा बाजारभाव खूप उंच चालला आहे म्हटल्यावर गप्प बसत नाही. पटकन आपले शेअर विकून मोकळा होतो. कारण त्याला ठाऊक असते, की एकदा ही गर्दी ओसरली, की शेअरचा भाव हा त्याच्या खऱ्या किमतीच्या आसपास येणार असतो. तो त्या किमतीपाशीच येऊन थांबतो असेही नाही, तर हळूहळू तो शेअर गर्दीकडून दुर्लक्षित होऊ लागतो. असा दुर्लक्षित शेअर मग त्याच्या किमतीच्याही खाली दिला-घेतला जातो. किमतीवर आधारित गुंतवणूक निर्णय घेणारा अशा वेळी तो दुर्लक्षित शेअर हळूहळू खरेदी करत राहतो. तेव्हा मग आपण खरेदी केल्यानंतर त्याचा भाव थोडाफार घसरला, तरी तो गुंतवणूकदार मनाची चलबिचल होऊ देत नाही. उलट अशा वेळी तो आणखी खरेदी करीत राहतो.

वरील वर्णनावरून एक गंमत लक्षात येईल, की किमतीच्या गणितावर खरेदी करणारा गुंतवणूकदार ज्या शेअरकडे गर्दीचे दुर्लक्ष असते अशा वेळी खरेदी करत असतो. मात्र ज्यावेळी तमाम गर्दी त्या शेअरच्या मागे धावू लागते तेव्हा तो शेअर विकत असतो. अशा रितीने बाजार भावावर आधारित निर्णय घेऊन खरेदी-विक्री करणाऱ्या बहुसंख्य लोकांच्या बरोबर विरुद्ध कृती या गुंतवणूकदाराकडून होत असते. अर्थात, लोकांनी दुर्लक्षित केलेला शेअर घ्यायचा म्हणून तो कोणताही शेअर उचलत नसतो, तर कोणत्या शेअरची किंमत काय आहे, याचे गणित मनाशी पक्के करून कोणते शेअर घ्यायचे हे त्याने ठरवून ठेवलेले असते. फक्त खरेदी-विक्रीच्या अचूक वेळेसाठी तो गर्दीच्या कृतीकडे नजर लावून शांतपणे उभा असतो. गर्दीमध्ये स्वत:ला तो अडकू देत नाही. कारण गर्दीची मानसिकता बऱ्याच वेळा चुकीचे निर्णय घेत असते हे त्याला पक्के ठाऊक असते.

Ashay Javadekar

Previous
Previous

34) भावांच्या चढउताराचे गणित काय?

Next
Next

36) चांगल्या कंपन्यांतील गुंतवणूक फायद्याची