45) गुंतवणूकदारांचे शत्रू कोण?
Originally published on January 3, 1993
Written by Dr Dileep Javadekar
निरनिराळ्या पद्धतीने शेअर बाजाराचा आणि कंपन्यांचा अभ्यास केला, तरी प्रत्यक्ष जेव्हा शेअर खरेदी-विक्रीची वेळ येते तेव्हा गुंतवणूकदाराला त्रास देणारे प्रमुख शत्रू कोण? या शत्रूंचा मनाशी शोध घेणे आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करणे हे प्रत्यक्ष शेअरच्या किंमती समजून घेण्याइतकेच... किंबहुना त्यापेक्षा काकणभर जास्त महत्त्वाचे ठरते.
शेअर बाजारातील गर्दीमध्ये प्रामुख्याने तीन शत्रू कायम फिरत असतात. गेली अनेक दशके भारतातील आणि भारताबाहेरील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना-देखील हे शत्रू नामोहरम करू पाहतात. यांना ओळखूनदेखील बाजारातून यांना हुसकून लावण्यात अजूनपर्यंत कुणीही यशस्वी झालेले नाही आणि आता इतकी वर्षे बाजारात पाय घट्ट रोवल्यानंतर ते बाजारातून जातील, अशी अपेक्षा करणे तर्कसुसंगत ठरणार नाही. कायम कुणा ना कुणाच्या मानगुटीवर ही भुते बसतच राहणार. तेव्हा त्यांना समजून घेऊन किमान आपल्या मानगुटीवर त्यांना बसू न देणे एवढे प्रयत्न तरी आपण करू शकतो.
या तीन महाभयंकर शत्रूंची नावे आहेत : भीती, लोभ आणि आशा. जगातल्या कोणत्याही शेअर मार्केटमध्ये कमी-जास्त प्रमाणात या तीन शत्रूंनी अनेक वेळा बाजारावर आपली हुकूमत चालवली आहे. या तीन शत्रूंना समजून घ्यायचा प्रयत्न आता करू या. परंतु इथे हेही लक्षात ठेवायला हवं, की नुसती ही लेखमाला वाचून हे शत्रू आपण जाणून घेऊ आशा भ्रमात वाचकांनी राहू नये. कारण निरनिराळ्या वेळी निरनिराळी मोहक अगर भयानक रुपे घेऊन हेच शत्रू पुन: बाजारात येत राहणार आहेत. त्या त्या वेळी त्यांना त्या त्या रुपामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणे हा एक कायमचा आयुष्यभर पुरणारा अभ्यास आहे आणि इतर कोणत्याही शत्रूप्रमाणे आपण त्यांना ओळखले आहे असे समजले, की ते आपल्याकडे फिरकणार नाहीत. मग ते दुसरा कुणीतरी कच्च्या दिलाचा गुंतवणूकदार शोधायच्या मागे लागतील! तेव्हा या शत्रूंची चार हात करायचे, लढाई करायची असा हा प्रकार नसून फक्त त्यांना ओळखायचे एवढेच आपले काम आहे. एकदा ही सवय लावून घेतली, की हे शत्रू आपल्या मानगुटीवर बसणार नाहीत. बसलेच तरी त्यांना तिथे करमणार नाही. ते लगेच आपली पाठ सोडून देतील.
तेव्हा या शत्रूंशी मुकाबला करणे म्हणजेच त्यांना पूर्ण ओळखायचा प्रयत्न करणे! यासाठी वस्तुनिष्ठ विचार करायची एक सवय आपण आधी जडवून घ्यायला हवी. जेव्हा आपले हात अडकलेले असतात, आपले पैसे एखाद्या शेअरमध्ये गुंतलेले असतात तेव्हा ही वस्तुनिष्ठ विचार करण्याची ताकद आपल्या नकळत अर्ध्यावर येते. अशा वेळी वरील शत्रूंचं फावतं. त्यामुळे आपली प्रत्यक्ष गुंतवणूक नाही अशा शेअर्स भाव पाहून त्यातील चढ-उतारांवर त्यात कृत्रिमरीत्या कशी तेजी अगर मंदी आणली जाते यावर विचार करावा. जेव्हा आपले पैसे गुंतले नसतील, तेव्हा असा विचार करणे सोपे जाते. आपण बाजूला उभे राहून बाजारातील या खेळाकडे स्वच्छ नजरेने पाहू शकतो. अशा वेळी वरील तीन शत्रूंपैकी कोण वरचढ झाला आहे, तो बाजारातील गर्दीतल्या बहुतेक लोकांच्या मानगुटीवर कसा बसला आहे हे पाहणे मोठे मजेचे असते. अशी बाजूला उभे राहून पाहण्याची सवय लावून घेतली की हळूहळू आपल्या स्वत:च्या गुंतवणुकीबद्दलही असा विचार सुरू करावा.