47) शेअर नफ्यात विकणे कठीण काम

Originally published on January 17, 1993

Written by Dr Dileep Javadekar

शेअर गुंतवणुकीमधला पहिला बागुलबुवा जो भीतीच्या रूपाने येतो, तो गुंतवणूकदाराला अनेक प्रकारे भेडसावतो. मागील लेखात एखादा शेअर खरेदी करण्याच्या आधीपासूनच भीती कशी काम करते हे आपण पाहिले. परंतु शेअर खरेदी झाल्यानंतरही भीती आपली पाठ सोडत नाही.

एखादा शेअर पूर्ण विचारांती आपण १४० रुपयांना खरेदी करतो आणि पुढच्या आठवड्यात काही तात्कालिक कारणांमुळे तो १२० रुपये होतो. इथे पुन्हा आपल्या मनात भीती सुरू होते. हा भाव असाच घसरत जाणार आणि आपण बुडणार, असे वाटू लागते. खरे तर आपण ज्या कसोट्या लावून त्या शेअरची निवड केली त्या सर्व मूलभूत विश्लेषणावर (फंडामेन्टल अनालिसीस) आधारलेल्या असतात. एक आठवड्यात फंडामेन्टल तर काही बदललेली नसतात. केवळ इतर काही कारणांमुळे विक्रीचा दबाव आल्यामुळे शेअरचे भाव खाली येत असतात. अशा वेळी भीतीच्या आहारी जाऊन गुंतवणूकदार आपले शेअर तोट्यात विंकू लागतात. अशा विक्रीला डिस्ट्रेस सेलिंग असे म्हणतात. तेव्हा आपण खरेदी केलेल्या शेअरचे भाव खाली येण्यामागचे कारण पाहायला हवे. कंपनीच्या कामकाजात जर काही फरक पडला नसेल, तर जो शेअर १४० रुपयांना घेण्यासारख्या होता तो १२० रुपयांना आणखीनच घेण्यासारखा असतो, विकण्यासारखा मुळीच नसतो.

दुसरा मोठा शत्रू म्हणजे लोभ. या जगत लोभ कुणाला चुकत नाही असे म्हणतात. शेअरबाजारासारख्या ठिकाणी तर लोभाची-मोहाची झाडे कोपऱ्या कोपऱ्यात उभी असतात. एखादा शेअर खरेदी करणे एक वेळ सोपे जाते, परंतु तो फायद्यात विकणे हे कठीण काम असते. जेव्हा आपले शेअर फायदा दाखवतात, तेव्हा ते आणखी खूप वर चढतील असे वाटू लागते. जेव्हा आपण २५ रुपयांना एखादा शेअर खरेदी करतो तेव्हा तो ३५-४० झाला की विकायचा असे आपण ठरवलेले असते. परंतु जेव्हा तो खरोखरच ४० रुपयांचा भाव दाखवतो तेव्हा तो ५०-६० रुपयां-पर्यंत लवकरच जाईल असे भासू लागते. चार लोकांत तुम्ही चर्चा केली तर सगळे असेच बोलत असतात.

याला एक कारण आहे; जेव्हा तुम्ही ती २५ रुपयांना खरेदी केलेला असतो तेव्हा लोकांचे त्याकडे लक्ष गेलेले नसते. त्यामुळेच तर तो २५ रुपयांच्या आसपास रेंगाळत राहतो. परंतु जेव्हा तो चढू लागतो तेव्हा दररोज जास्तीत जास्त नवीन गुंतवणूकदार त्याकडे आकर्षित होऊ लागतात. त्यांची खरेदी ३५-४० रपयांच्या दरम्यान झाल्यामुळे साहजिकच तो ५०-६० वर जाईल अशी चर्चा बाजारात होत असते. अशा वेळी आपण अगोदरच मनाशी ठरविलेल्या किमतीला विक्री करून फायदा खिशात टाकणे खरोखरच कठीण जाते. कित्येक वेळा अशीही उदाहरणे घडतात, की आपण आज तो शेअर विकायचाच म्हणून ब्रोकरकडे जातो. पण तिथली उत्साहवर्धक चर्चा ऐकून मोहात पडतो आणि विक्री न करता उलट चढ्या भावाने त्याच कंपनीचे आणखी शंभर-दोनशे शेअर खरेदी करून बसतो!

असे लोभाचे क्षण टाळायचे कसे? आपल्या लोभाला आपणच मर्यादा घालायला हवी. आपल्या अपेक्षेप्रमाणे फायदा मिळाल्यानंतर तो शेअर पुढे कितीही चढला तरी त्याचे दु:ख मानायचे कारण नाही. घेताना जशी सर्वात कमी किंमत मिळणे शक्य नसते तसेच विकतानाही सर्वांत जास्त दर आपल्यालाच मिळावा असा लोभ टाळावा. आपल्याकडून तो शेअर खरेदी करणाऱ्यालाही त्यानंतर दर वाढून थोडाफार फायदा झाला तर त्यातही आपण आनंदच मानायला हवा. कारण आपला व्यवहारही फायद्याचाच झालेला असतो. एखाद्या शेअरला अतिलोभामुळे नुसतेच घट्ट धरून बसल्यामुळे प्रत्यक्ष फायदा आपल्या हातात येतच नाही. नुसतीच किंमत वर जाते खाली येते हे आपण वृत्तपत्रांत वाचत राहतो.

चांगल्या कंपन्यांचे शेअर आपल्याकडे आहेत ही अभिमानाची गोष्ट आहेच, परंतु शेवटी हे साधन आपण आपली बचत, आपले पैसे वाढविण्यासाठीच निवडलेले असते. आपले कपाट नुसते शेअर सर्टिफिकेटस् नी भरून टाकणे हे कुणाचे साध्य होऊ शकत नाही.

Ashay Javadekar

Previous
Previous

46) अभ्यास व सराव शेअरसाठी पोषक

Next
Next

48) आशेचा बाजारावर पगडा