50) अफवांपासून दूर राहणे गरजेचे

Originally published on February 7, 1993

Written by Dr Dileep Javadekar

एखादी अफवा किती प्रचंड वेगाने पसरू शकते हे आपण मागील लेखात पाहिले. तेव्हा अशा अफवा पसरवणाऱ्या टिपस्टर्सपासून स्वत:ला वाचवायला हवे.

शेअरबाजारात अति आत्मविश्वास कामाला येत नाही. एखादा माणूस तुम्हाला छातीठोकपणे एखादा शेअर घ्यायला सांगत असेल तर मनात शंकेची पाल चुकचुकायला हवी. ‘अमुक शेअर बरा वाटतो, बाजाराची धारणा चढती राहील असं दिसतं’ ‘मागील वर्षाच्या रिझल्टवरुन हा शेअर अजून चढायला वाव आहे’ अशा प्रकारची वाक्ये बोलणारी माणसे जास्त बरोबर ठरतात परंतु ‘डोळे झाकून यात पैसे गुंतवा, एक महिन्यात दुप्पट होऊन जातील’ असे सांगणारा एक तर अविचारी तरी असतो किंवा असा सल्ला देण्यामागे त्याचा काही काळाबेरा अंतस्थ हेतू असू शकतो हे लक्षात ठेवा.

मुळात शेअरबाजारात एखादी ‘टिप’ कायम बरोबर असूच शकत नाही. एखादी बरोबर टिप जेव्हा बऱ्याच लोकांच्यात पसरू लागते, तेव्हा जो तो तो शेअर घ्यायला धावतो, त्या शेअरची किंमत वाढते आणि काही दिवसांतच ती टिप त्या किमतीत अयोग्य बनून जाते. तेव्हा अशा नुसत्या टिपवर गुंतवणूक करणे प्रत्येक वेळी फलदायी ठरतेच असे नाही.

एखाद्याच्या टिपवर कुणी कसे लाखो रुपये मिळवले असे छाती फुगवून सांगणारे लोकही तुम्हाला भेटतील. अशा रातोरात मिळणाऱ्या श्रीमंतीचा मोह कुणालाही पडणे स्वाभाविक आहे परंतु अशा माणसाच्या आयुष्यात या बेरजे-सारखीच वजाबाकीचीही अनेक उदाहरणे असतात. ती तो सांगू इच्छित नाही. लांबवर खरीखरी नोंद ठेवली तर फारसे सट्टेबाज आकर्षक हिशेब देऊ शकत नाहीत. दीड वर्षापूर्वी प्रचंड पैसा कमावला असे सांगत फिरणारे लोक आज बाजारात नाहीत हे ध्यानात घ्यायला हवे.

या उलट बाजाराचा कल पाहून लांब पल्ल्याची गुंतवणूक याच दृष्टीने शेअर बाजाराकडे पाहणारे कित्येक लोक गेली तीस-चाळीस वर्ष सातत्याने शेअर गुंतवणुकीमधून नफा मिळवत आहेत, असे दिसून येईल. दीड वर्षांपूर्वी शेअर सल्लागार, गुंतवणूक सल्लागार म्हणून कुत्र्याच्या छत्र्यांच्या प्रमाणे गावोगाव उगवलेले बरेच टिपस्टर्स आज दिसेनासे झालेले आहेत. हॉट टिप्स देणाऱ्या सल्लागारांचे व्यावसायिक आयुष्य शेअरबाजारात नेहमीच थोडे राहिलेले आहे.

शेअरबाजार हा एका मोठा रेस्टॉरंट सारखा असतो. तिथे अनेक प्रकारचे पदार्थ मिळू शकतात. आपल्या पोटाचा आणि आपल्या खिशाचा आवाका ज्याने त्याने ओळखायचा असतो. हॉटेल मालकाला ‘चांगला पदार्थ कोणता’ असे विचारल्यावर जसे तो सांगतो, की सगळेच चांगले आहेत. तसेच शेअरचे आहे. सगळ्याच गुंतवणूकदारांना रुचेल- पचेल अशी एकच एक गुंतवणूक शोधून काढणे अशक्य आहे.

एखाद्याची जोखीम घ्यायची ताकद किती आहे याचा मागोवा घेणे हे शेअरबाजारात शिरण्याआधी करायचे महत्त्वाचे काम आहे. नेमके हेच काम बाजूला टाकले जाते आणि मग त्याची अतिभयानक फळे भोगावी लागतात. सामान्य व्यक्तिगत नवीन गुंतवणूक-दारच अशी चूक करतो असे नाही, तर त्याला सल्ला देणारे तथाकथित गुंतवणूक सल्लागारही असेच वागतात परंतु अंतिम तोटा गुंतवणूकदाराचाच होत असतो.

प्रत्येक गुंतवणूकदाराने हा जोखमीचा हिशेब स्वत:शी मांडायला हवा. पंचवीस-तीस वर्षाचा तरुण गुंतवणूकदार आणि साठ-पासष्ट वर्षाचा निवृत गुंतवणूकदार या दोघांकडेही शेअरबाजारात गुंतवण्यासाठी सारखेच पैसे असले, तरी दोघांनी घ्यायच्या शेअरची यादी पूर्णत: भिन्न येत असते. कारण त्यातून दरवर्षी सहा महिन्याला काही मिळकत हातात येणे हे निवृत माणसाला जेवढे जरुरीचे असते तितके ते तरुण गुंतवणूकदाराला गरजेचे नसते. घरातील मिळवत्या माणसांची संख्या, आपल्यावरील इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या आदी गोष्टींचा साकल्याने विचार व्हायला हवा. त्या त्या वेळच्या जबाबदाऱ्या नुसत्या पुढे ढकलून शेअरमध्ये पैसे ओतले आणि नंतर हातात काहीच राहिले नाही, अशी पश्चातापाची वेळ नंतर येऊ नये.

Ashay Javadekar

Previous
Previous

49) खरेदीदाराने स्वत:च जागरूक राहावे