Marathi Fine Dining

Originally published in Marathi Newspaper Lokmat in Spring 2017

Written with Gautam Pangu

अमेरिकेमध्ये Shank’s नावाचं एक फाईन डायनिंग रेस्टॉरंट आहे. त्याचं वैशिष्ट्य असं की ते मराठी फाईन डायनिंग रेस्टॉरंट आहे. तिथे exlusively मराठी (vegetarian) पदार्थ बनवले जातात आणि कोर्स मील मध्ये वाढले जातात. या रेस्टॉरंटच बुकिंग महिनोनमध्ये आधी करावं लागतं. कित्येक अभारतीय लोक इथे खायला उत्सुक असतात. हे रेस्टॉरंट अत्यंत प्रसिद्ध आहे आणि त्या रेस्टॉरंट चा जो शेफ आहे, शशांक जोशी, तो अतिशय नावाजलेला आहे आणि त्याला ethnic food industry मध्ये आदराचं स्थान आहे. त्यानं बऱ्याच अडचणींवर मात करून हे रेस्टॉरंट उघडलं आहे. शशांक आणि Shank’s विषयी जाणून घ्यायची खूप लोकांना उत्सुकता आहे. हीच गोष्ट सांगणारी आमची फिल्म Shank’s लवकरच येते आहे. 

या फिल्म वर आम्ही एक दीड वर्षांपूर्वी काम चालू केलं. खूप दिवसांपासून मराठी फूड विषयी काहीतरी करावं असं डोक्यात होतं. वेगवेगळ्या कुझिन्सवर काही सिनेमे निघालेले आहेत, Julie and Julia, Big night वगैरे. पण ते सगळे सिनेमे हे French, Italian कुझिन्स वर आहेत. इंडियन क्युझिन वर काही मोजकेच सिनेमे आहेत आणि त्यात सुद्धा मराठी फूड वर तर जवळजवळ नाहीच. हे सगळं असताना मात्र आम्हा मराठी लोकांचं अमेरिकेतलं संपूर्ण सामाजिक जीवन हे खाण्याभोवती फिरतं. आपल्या मराठी खाद्य पदार्थांची असणारी प्रचंड परंपरा, ते भारताबाहेर आवर्जून करायची आणि खायची आमची इच्छा आणि त्याविषयी अभारतीय लोकांची अनभिज्ञता ही तफावत जाणवायला लागली आणि मग Shank’s चा जन्म झाला.

पण फाईन डायनिंग का? साधं सरळसोट फास्ट फूड किंवा थाळी रेस्टॉरंट का नाही? हा प्रश्न पडणं सहाजिक आहे. या थाळी किंवा फास्ट फूड प्रकारच्या भारतीय रेस्टॉरंट्सचा (मुख्यत्वे भारताबाहेरच्या अशा रेस्टॉरंट्सचा) एक मूलभूत गुणधर्म आहे की त्यांना अपेक्षित असलेला गिऱ्हाईक वर्ग हा अनिवासी भारतीय आहे. आणि असा वर्ग त्यांना पुष्कळ मिळत असल्याने अभारतीय लोकांमध्ये जागृती करायच्या फंदात वगैरे ते पडत नाहीत. ठीकच आहे ते, ते समीकरण चांगलं जमतं त्यांना. अडचण कुठे येते? जेव्हा भारतीय खाणं माहिती नसलेले लोक ते खायला जातात तेव्हा त्यांना त्याविषयी खूप माहिती नसते. मग कुठल्याही पदार्थाला curry असं एक नाव आणि spicy विशेषण लावून मोकळं केलं जातं. जर अभारतीय लोकांना पण आपलं खाणं आपल्यासारखं कळलं पाहिजे असा उद्देश असेल, तर ते फाईन डायनिंग च्या माध्यमातून करता येतील का?

फाईन डायनिंग म्हणजे नक्की काय? तर जेव्हा आम्ही या फिल्मविषयी संशोधन करत होतो तेव्हा जाणवलं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे फाईन डायनिंग म्हणजे सादर करणाऱ्या शेफची अभिव्यक्ती, त्याने गाठलेला संवाद. It is very personal. असा संवाद साधायचा असेल तर विचारांची, माहितीची देवाणघेवाण व्हायला हवी. एक साधं उदाहरण देतो. आम्ही आत्ताच काही दिवसांपूर्वी एका बऱ्याच नामांकित रेस्टॉरंट ला गेलो होतो न्यू यॉर्क मध्ये. तिथे एकाने लच्छा पराठा मागवला. इतरांनी काही ब्रेडस म्हणजे नान, रोटी वगैरे मागवले. वेटरने नेहमीप्रमाणे ब्रेड बास्केट आणून ठेवली ज्यामध्ये सगळं एकत्र होतं. तो लच्छा पराठा बहुतेक खाली दडला होता म्हणून आमच्या मित्राने वेटरला विचारलं यामध्ये लच्छा पराठा कुठे आहे, तर तिथल्या अमेरिकन वेटरने नुसतं ब्रेड बास्केट कडे कुठेतरी हवेत बोट दाखवलं. समजा एखाद्याला लच्छा पराठा कसा दिसतो हे माहिती नसतं तर त्याला कसं कळलं असतं त्याने मागवलेला पदार्थ त्याच्यासमोर आला आहे का नाही? हा संवाद साधण्यात ते रेस्टॉरंट पूर्णतया कमी पडलं. त्यामुळे आम्ही ही फिल्म करताना ठरवलं की जर आपल्याला मराठी पदार्थ अभारतीय लोकांपर्यंत पोचले हे दाखवायचं असेल तर त्या शेफची अभिव्यक्ती दाखवणं हा एक फार महत्वाची गोष्ट आहे. या अभिव्यक्तीचं रूपांतरच मग Shank’s च्या मेनू मधल्या कोर्स मिल मध्ये झालं. याबरोबरच खाणाऱ्या माणसाला प्रत्येक कोर्सची माहिती, पर्सनलाइझ्ड अटेन्शन दिलं गेलं. ज्या माध्यमातून संवाद साधायचा ते म्हणजे स्वयंपाकासाठी लागणारे पदार्थ यांच्याकडं काटेकोर लक्ष दिलं गेलं. कष्टाने बऱ्याचशा भाज्या पर्सनल फार्मवर पिकवल्या गेल्या.  त्यामुळं तिथं येणाऱ्या प्रत्येकाला एक अभूतपूर्व मराठी ‘Gourmet Experience’ मिळाला. 

ही अभिव्यक्ती एखाद्यामध्ये अशी रातोरात निर्माण होणार नाही. म्हणून मग त्या शेफचं आत्तापर्यंतचे आयुष्य, घडलेल्या घटना, त्याच्यावरचे प्रभाव, त्यातून तयार झालेली त्याची अभिरुची आणि त्यातून उत्पन्न झालेली त्याची अभिव्यक्ती असा प्रवास दाखवायचा फिल्ममध्ये आम्ही प्रयत्न केला आहे. शशांक हा महाराष्ट्रात एका मराठी मध्यमवर्गीय घरात जन्मलेला मुलगा. त्याच्या घरात कुणी व्यावसायिक शेफ होण्याचा करियर चॉईस करायचा विचार देखील करणं  हे अगदीच निषिद्ध मानलं गेलेलं.  पण लहानपणापासून अंगात भिनलेली स्वयंपाकाबद्दलची आवड, अफाट जिज्ञासा आणि अन्नाबद्दलचा आदर त्याला त्याच्या ध्येयाच्या मार्गावर खेचून घेऊन जातात. यामध्ये त्याचा बऱ्याच देशात प्रवास घडतो. बरेवाईट अनुभव मिळतात, अनेक चढउतारांचा, खाचखळग्यांचा सामना करावा लागतो. या वाटचालीत त्याला पॉलिन या फ्रेंच तरुणीची साथ मिळते. या सर्व गोष्टींचा त्याच्या एकूण विचारसरणीवर प्रभाव पडतो आणि त्यातून त्याची अभिव्यक्ती तयार होते. मग तो अमेरिकेत Shank’s हे मराठी फाईन डायनिंग रेस्टॉरंट सुरु करतो आणि ते यशस्वीही करून दाखवतो. हा शशांकचा वैयक्तिक प्रवास Shank’s चा गाभा आहे. 

अमेरिकेतले अनिवासी भारतीय म्हणून जे बरेच अनुभव मिळाले ते व्यक्त करण्याच्या गरजेतून आमच्या फिल्ममेकिंग ला सुरुवात झाली. William Anders या चंद्रापर्यंत गेलेल्या अंतराळवीराचं एक खूप छान वाक्य Houston मधल्या NASA सेंटर मध्ये आहे. “We came all this way to explore the Moon, and the most important thing is that we discovered the Earth.” Shank’s बनवताना सारखं हे जाणवतं. भारताबाहेर राहून मराठी शेफ आणि फूड विषयी फिल्म करताना आम्ही आमच्याच लहानपणामध्ये, आमच्या मराठी घरांमध्ये डोकावलो आणि तिथून आम्हालाच आमचे खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती कळत गेली. आम्ही Shank’s च्या मार्फत साधलेला हा संवाद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा हीच इच्छा. 

Watch SHANK’S on Prime Video

Previous
Previous

Mid-Day (Mumbai) Articles about SHANK’S

Next
Next

Introducing SHANK’S