10) शेअर: फायद्याचा व्यवहार
Originally published on May 3, 1992
Written by Dr Dileep Javadekar
मागील लेखात ‘अर्निंग पर शेअर’ म्हणजे काय आणि तो कुठे पाहायला मिळतो ते बघितलं. परंतु या अर्निंगवरून आज आपण तो शेअर किती रुपयांना खरेदी करावा हे कसे ठरवावे? या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण आपली इतर गुंतवणूक कशी करतो हे पहावं लागेल.
बँकेतील ठेव आपल्याला १२ टक्के वार्षिक व्याज देते असे धरू. म्हणजे वर्षाला बारा रुपये उत्पन्न देणारे सर्टिफिकेट आपण शंभर रुपयांना खरेदी करतो. किंवा ज्या अर्निंगच्या आठ-साडेआठपट रक्कम गुंतवायला आपण तयार असतो. या गुणोत्तरला ‘पईझ-अर्निंग रेशो’ म्हणतात. मात्र शेअर मार्केटमध्ये चांगल्या कंपन्यांच्याबाबतीत हा ‘पी.ई.रेशो’ नेहमीच दहाच्या वर असतो. किंबहुना ती कंपनी दहा-पंधरा वर्षे असेच उत्पन्न मिळवीत राहील. असा विश्वासच त्या किंमतीत प्रतिबिंबित होत असतो. उद्योगा उद्योगांवर हा ‘रेशो’ बदलतही जातो. ‘फेरा’ किंवा परकीय गुंतवणूकवाल्या कंपन्यांबाबत हा चाळीसच्याही पुढे असलो.
हळूहळू हे शेअर प्रकरण जास्त जास्त क्लिष्ट बनत चालले आहे. असे काही वाचकांना वाटेल परंतु यापेक्षाही जास्त आकडेमोड संख्याशास्त्राचे नियम लावून केलेले हिशेब, रोजच्या दरांचे काढलेले आलेख अशा अनेक मार्गाने लोक शेअर मार्केटचा अभ्यास करीत असतात. एवढे करूनही अभ्यास करणारच पैसे मिळवितो असे नाही, तर इतर उद्योगधंद्याप्रमाणेच अभ्यासूपणापेक्षाही धाडस, वस्तुनिष्ठ विचार करायची शक्ती, कायम सजगता अशा गुणांवर जास्त अभ्यास न करताही शेअर मार्केटमध्येही लक्ष्मी प्रसन्न करून घेता येते.
मुळात याला एक कारण आहे. तुम्ही जर काही वर्षे थांबायला तयार असलात तर शेअर्समधील तुमची गुंतवणूक वाढतच जाते. या रस्त्यावर खाच-खळगे असतील, चढ-उतार असतील. परंतु शेवटी हा रस्ता उंचावरच्याच कुठल्या तरी थंड हवेच्या ठिकाणी जातो. तेव्हा या रस्त्याने नेटाने तुम्ही तुमची गाडी हाकत राहीला तर तुम्ही काही वर्षांनी नक्की उंचावरच पोहोचलेले असता.
असे का? कारण शेवटी औद्योगिकरण, आर्थिक सुधारणा, या होतच असतात. आपण काही केले नाही तरी आपल्या कंपन्या सतत प्रगतीचा विचार करतच असतात. आपल्याकडची शेअर-सर्टिफिकेटस् हे नुसते कागद नसून ती हिंदुस्थान लिव्हर, कोलगेट, टाटा स्टील यासारख्या कंपन्यांची अंशत: मालकी असते. या कंपन्या राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला माल विकत असतात आणि फायदा मिळवत असतात.
दुसरे एक कारण आहे आपल्या ९० कोटी लोकसंख्येच्या देशात फक्त दीड कोटी लोक शेअरमध्ये पैसे गुंतवतात, बाकी लोक आपली बचत निर्धोक गुंतवणुकीच्या योजनांमध्ये करत असतात. त्यामुळे या दीड कोटी लोकांच्या पैशावरच उद्योगांची भरभराट, पर्यायानं देशाची प्रगती होत असते. अशी ही जी जोखीम हे दीड कोटी लोक घेतात, त्यामुळे होणाऱ्या प्रगतीचा फायदा मात्र सर्व ९० कोटी जनता घेत असते. याच कारणास्तव शेअरचे भाव नेहमी वाढत राहून जणू समाज या दीड कोटी लोकांचे ऋणच फेडत असतो.
शेअरमधील गुंतवणूक वाढते-वाढते म्हणजे तरी किती? यासाठी दोन-चार उदाहरणे देता येतील.
१) भारतातील मुंबई, अहमदाबाद, कलकत्ता, दिल्ली आणि मद्रासच्या स्टॉक एक्स्चेंजमधील १०० शेअरच्या रोजच्या भावांची सरासरी काढून एक निर्देशांक जाहीर केला जातो. हा राष्ट्रीय निर्देशांक १९८३-६४ मध्ये १०० होता. तो आज १८०० च्या आसपास आहे. म्हणजेच १९८३-८४ मध्ये गुंतवलेल्या १०,००० रु. चे आज आठ वर्षात एक लाख ८० हजार रुपये झाले.
२) या सर्व स्टॉक मार्केटमध्ये आपण पोचू शकत नाही. म्हणून मुंबई शेअर मार्केटमधील ३० शेअरच्या रोजच्या दरांची सरासरी काढून जो ‘बी.एस.ई.’ इंडेक्स काढतात. त्यातील वाढ पाहू. हा निर्देशांक १९७८-७९ मध्ये १०० होता. तो आज ४००० च्या आसपास आहे. म्हणजे १९७८-७९ मध्ये गुंतवलेल्या १०,००० रु. चे आज तेरा वर्षांत चार लाखाच्याही वर झाले. किंवा याच इंडेक्सची मागील पाच वर्षातील वध-घट पाहता येईल.
जानेवारी ८७ - ५२५
जानेवारी ८८ - ४४०
जानेवारी ८९ - ६६५
जानेवारी ९० - ७८०
जानेवारी ९१ - ११९०
जानेवारी ९२ - १९१०
मार्च ९२ - ३५००
एप्रिल ९२ - ४३००
३) युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाने डिसेंबर १९८६ मध्ये मास्टर शेअर नावाने एक फंड स्थापन केला हे बहुतेक वाचकांना माहिती असेल. या फंडातून जमलेले पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले आहेत. यामध्ये सर्वसामान्य गुंतवणूक-दाराने डिसेंबर १९८६ मध्ये १०,००० रुपये गुंतविले असल्यास १९८९ मध्ये एकदा हक्कभाग खरेदीसाठी पुन्हा ७२०० रुपये गुंतवावे लागले. यावर १९९१ साली दोनास एक बोनस मिळून आज त्याच्याकडे २४०० मास्टर शेअर झाले. आजच्या बाजारभावाने त्यांची किंमत १ लाख ८० हजार आहे. शिवाय वेळोवेळी मिळालेला डिव्हिडंड अंदाजे ९४०० रुपयांपर्यंत जातो. म्हणजे १७२०० रूपयाच्या गुंतवणुकीचे साडेपाच वर्षात १ लाख ९० हजार चारशे रुपये झाले.
४) सव्वा वर्षापूर्वी एस.बी.आय. म्युच्युअल फंडाने मॅग्नम ९० म्हणून योजनेत पैसे गोळा केले. त्यावेळी गुंतवलेल्या १०,००० रु. चा आजचा बाजारभाव एक लाख रुपयांच्या आसपास आहे.
वरील उदाहरणात मुद्दामच टिस्को, टाटा पॉवर, कोलगेट, आय.टी.सी. अशा शेअरची नावे घेऊन हिशेब केलेला नाही. कारण वरील विवेचनातील नावे योजना यायच्या वेळी प्रत्येकाने जाहिरातीत किंवा टीव्हीवर पहिली असतील. प्रत्यक्ष शेअरमध्ये पैसे गुंतविणाऱ्याने तर याहीपेक्षा जास्त नफा मिळविला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.