9) शेअरबाजारातील चढ-उतार
Originally published on April 26, 1992
Written by Dr Dileep Javadekar
मागणी आणि पुरवठ्याला अनुसरून शेअरच्या किमती रोज घटके घटकेला कमी जास्त कशा होतात हे आपण मागील लेखात पाहिलं. परंतु ही मागणी आणि पुरवठा तरी अशी सारखी का बदलते? याला माणसाच्या मनातील आशा आणि भीती कारणीभूत आहे. कंपनीची परिस्थिती चांगली आहे. शेअरचा भाव फार चढला आहे. तेव्हा आता तो गडगडेल ही भीती या दोन्ही भावना बाजारात असलेल्या लोकांच्या मनावर सतत कार्य करत असतात. त्यामुळे अशा सर्व लोकांची मिळून एक मोठी भावना तयार होते. ती आशादायक असेल तेव्हा मार्केट चढते आणि भीतीदायक असेल तेव्हा गडगडते.
हे झाले एकंदर मार्केटबद्दल. परंतु प्रत्येक कंपनीला स्वत:च असं एक व्यक्तिमत्वही असतं. बाजार पडत असतानाही काही शेअर चढतात आणि बाजार उंच असतानाही काही शेअर पडून असतात.
प्रत्येक व्यक्तीला जसा भूतकाळ, वर्तमानकाळ, आणि भविष्यकाळ असतो तसाच प्रत्येक कंपनीला आणि पर्यायाने त्या शेअरलाही भूत, वर्तमान आणि भविष्यकाळ असतो. हे विचारांती कुणीही मान्य करेल आणि त्यामुळेच पूर्वी चांगली असलेली एखादी व्यक्ती जशी पुढच्या आयुष्यात वाया जाऊ शकते आणि खालच्या वर्गात जन्मलेली, बालपण गरिबीत गेलेली एखादी व्यक्ती जशी पुढील आयुष्यात चमकू शकते, पुढे जाऊ शकते तसेच शेअर्सचेही होते. किंबहुना बदल हा जसा मानवी आयुष्याचा स्थायी भाव आहे तसाच तो शेअर्सचाही आहे. यामुळेच इतर नाशवंत मालासारखेच शेअरशी नाशवंत आहेत असे मानतात.
मागील लेखांमध्ये आपण शेअर्सची बुकव्हॅल्यू कशी वाढत जाते हे विस्ताराने पाहीले आहे. पण विचार केल्यावर बुकव्हॅल्यू तरी शेअरबद्दल काय माहिती देते? ती शेअरचा इतिहास आपल्याला सांगते. अमुक एका कंपनीनं भूतकाळात कशी प्रगती केली आणि असा नफा मिळविला आणि त्यामुळं कंपनीची मालमत्ता कशी वाढत गेली हे बुकव्हॅल्यूवरुन समजते. परंतु हा झाला भूतकाळ! आपण जर आज तो शेअर खरेदी करणार असलो तर कालचक्र तर आपण उलट फिरवू शकत नाही! त्यामुळं त्या कंपनीचा वर्तमानकाळ आणि थोडाबहुत भविष्यकाळ जर आपल्याला कळू शकला तर तो आपल्या खरेदीच्या निर्णयाला जास्त उपयोगी ठरू शकतो.
आपल्या घरातील एखाद्या मुलीच्या लग्नासाठी स्थळ पाहताना आपण नवऱ्या मुलाबद्दल काय चौकशी करतो? त्या मुलाचे घराणे, वाडवडिलार्जीत मालमत्ता, बंगला, गाडी या गोष्टी तर पाहूच परंतु गर्भश्रीमंत घरातील आळशी, कामचुकार, व्यसनी मुलाला आपण लग्नासाठी पसंत करू का? नाही. कारण असा मुलगा आहे ती श्रीमंती केव्हाच घालवून बसतो. हे आपल्याला उदाहरणावरून माहीत आहे. तेच मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला परंतु उच्चशिक्षित, हुशार, सुस्वभावी, कर्तबगार मुलगा लगेच पसंत केला जाईल, कारण अशा मुलाकडे वडीलोपार्जित संपत्ती फारशी नसली तरी पुढील आयुष्यात स्वत:च्या कर्तबगारीवर आणि मेहनतीवर तो लक्ष्मीला खेचून आणेल असं भविष्य त्याच्या कपाळावर लिहिलेले आपल्याला दिसत असते.
आता कंपन्यांचेही तसेच आहे. १० रुपये फेसव्हॅल्यूच्या शेअरची ६०-७० रुपये बुकव्हॅल्यू असणं हे पूर्वीचा इतिहास चांगला असल्याचं लक्षण आहे. परंतु त्या पैशावर जगण्याचा मोह न धरता कंपनी त्या पैशाचा आपल्या विकासासाठी उपयोग करून घेऊन वर्तमानकाळातही तशीच वाढती उत्पादनक्षमता ठेवू शकली तर कंपनीचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे आणि शेअर होल्डर्सना भरपूर फायदा होणार आहे असं मानायला हरकत नाही.
आता कंपनीचा हा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ पाहायचा कुठल्या आरशात? आर्थिक विषयाला वाहिलेल्या नियतकालिकात जी कोष्टकं सापडतात, त्यात बुकव्हॅल्यूबरोबरच ‘अर्निंग पर शेअर’ किंवा ‘इ.पी.एस.’ असा एक स्तंभ असतो. एखाद्या कंपनीने मिळवलेल्या गतवर्षीच्या नफ्याला शेअर्सच्या संख्येने भागल्यास ‘इ.पी.एस.’ मिळते. म्हणजेच कंपनीच्या एका १० रूपयाच्या शेअरचे मागच्या वर्षात किती रुपये नफा मिळवला तो आकडा ‘इ.पी.एस.’ दाखवतो. साधारण चांगल्या कंपन्या ५ रूपयाच्या पुढे ‘इ.पी.एस.’ मिळवतात. आता हा ‘इ. पी.एस.’ मागील वर्षीच्या कमाईवरून काढलेला असतो. त्याही पुढे जाऊन काही नियतकालिके ‘एच.एच.इ.पी.एस.’ म्हणजे गेल्या सहा महिन्यांचा प्रत्येक शेअरने मिळवलेला नफा देतात. हे दोन अंक कंपनीच्या वर्तमानकाळाबद्दल आपल्याला माहिती देतात. परंतु याहीपुढे जाऊन कंपनीने पुढे कोणती कॉंट्रॅक्टस् मिळवलेली आहेत, पुढच्या विस्तारयोजना काय आहेत, बदलत्या सरकारी धोरणांचा कोणत्या कंपन्यांना फायदा होणार आहे अशी भविष्यकाळाचे पुसट चित्र ठळक करू पाहणारी माहिती बऱ्याच ठिकाणी छापून येत असते. डोळे उघडे ठेवून ती माहिती वाचत राहणारा माणूस चार-सहा महिन्यात अशा माहितीचा उपयोग करून घेण्यात तरबेज होतो.