17) अपेक्षा-इच्छांचा तोल साधल्यावर व्यवहार

Originally published on June 21, 1992

Written by Dr Dileep Javadekar

प्रत्यक्ष शेअर्सचे सौदे शेअर मार्केटमध्ये कसे होतात, हे समजून घेण्यासाठी आपण सांगली-कोल्हापूरच्या इन्व्हेस्टर्स असोसिएशनच्या सभा कशा चालतात, हे प्रथम पाहणार आहोत. असे करण्याचे कारण एवढेच, की छोट्या प्रमाणावर हे लक्षात आले तर मोठी यंत्रणा काशी काम करते, हे कळणे सोपे जाईल. तसेच या सभांना आपण कुणा सभासद मित्राबरोबर हजर राहू शकलो, तर इथे दिलेली ही माहिती प्रत्यक्षात निरीक्षण करून समजून घेणे शक्य होईल.

या सभा आठवड्यातून एकदा (साधारणपणे रविवारी) भरतात. मला समजा माझ्याकडील विविक्षित चार कंपन्यांचे प्रत्येकी शंभर शेअर विकायचे आहेत, तर मी ती यादी घेऊन या सभेला जाईन. तिथे व्यासपीठावर येऊन आपली विक्री करायला प्रत्येक सभासदाला संधी दिली जाते. माझा नंबर येईल तेव्हा मी पुढे जाऊन ध्वंनिक्षेपकावरून माझ्या यादीतील एक एक शेअरचे नाव वाचेन. समजा, मी म्हटले की ‘एस्सार शिपिंग- १०० शेअर्स’ असे समजू, की सभागृहात हजर असलेल्या दीड-दोनशे सभासदां-मधील काही चार-सहा सभासद ‘एस्सार शिपिंग’ चे शेअर घेण्यास उत्सुक आहेत. त्यातला एक जण उठून त्याचा भाव बोलेल. समजा तो म्हणाला, ‘एकशे पंधरा’, दुसरा म्हणेल ‘एकशे सतरा’ तिसरा ‘एकशे साडेसतरा’ चौथा ‘अठरा’ पुन्हा पहिला ‘एकशे वीस’. त्यानंतर समजा कुणी बोली बोललीच नाही तर माझ्या शेअरना जास्तीत जास्त मागणी ‘एकशे वीस रुपयांना एक’ अशी आली. मला ही किंमत पसंत असल्यास मी त्याला पुढे बोलावेन आणि अधिकृत पावती फाडेन. या पावतीवर शेअर विकणाऱ्याचे (म्हणजे माझे) नाव, घेणाऱ्याचे नाव, दोघांच्या सह्या आणि १२० रुपये दराने ‘एस्सार शिपिंग’चे १०० शेअर एवढी नोंद केली जाईल. या पावतीची एक प्रत मला आणि एक प्रत त्या व्यक्तीला दिली जाईल.

समजा, १२० रुपये ही किंमत मला नापसंत असेल तर मी खाली बसेन. म्हणजे त्या दिवशी माझे शेअर विकले जाणार नाहीत.

आता ही एकशे पंधरा रुपयांपासून इच्छुक सभासदांनी बोली बोलायला सुरुवात केली. ही किंमत तरी कुठून आली? तर दोन दिवस आधी म्हणजे शुक्रवारी मुंबई-पुणे शेअरबाजारात चालू होती. त्यावेळी तिथे झालेल्या सौद्यांचे भाव वर्तमानपत्रात वाचायला मिळालेले असतात. साधारण ते भाव आधारभूत मानून खरेदीदार बोली बोलतील आणि मीही ते भाव मनात धरूनच माझी अपेक्षा ठरवून तिथे जाईन. अर्थात शेअरबाजाराचा ‘मूड’ उत्साही असेल तर मला त्यापेक्षा ‘दोन-चार’ रुपये जास्तही भाव मिळेल आणि एकंदर ‘सेंटिमेंट’ खराब असेल तर खरेदीदार भाव पाडून पाच-दहा रुपये स्वस्तातही मागेल. शेवटी माझी विकण्याची गरज, काय दर यावा ती अपेक्षा आणि घेणाऱ्याची इच्छा यांचा तोल साधला तरच हा व्यवहार होईल.

आता हा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला. परंतु प्रत्यक्ष शेअर मी खरेदीदाराला कुठे दिले? आणि त्याने तरी प्रत्यक्ष बारा हजार रुपये मला कुठे दिले? अशी प्रत्यक्ष देवाण-घेवाण त्याच ठिकाणी झाली तर त्याला ‘स्पॉट डिलिव्हरी’ (जागच्या जागी व्यवहार) म्हणतात. परंतु असे व्यवहार करणे प्रत्येक वेळी शक्य नसते. एक तर मी जे चार कंपन्यांचे शेअर्स विकायचे मनात ठरवून गेलेलो असतो ते सगळे विकले जातीलच, अशी खात्री नसते. तेव्हा ती सगळी सर्टिफिकेटस् उगीचच वागवायला मला नको असते. तसेच जे सभासद काही खरेदी करतात तेसुद्धा त्यांना हवे ते शेअर आज मिळतीलच असे खात्रीलायकरीत्या सांगू शकत नाहीत. तेव्हा उगीचच हजारो रुपये रोख (किंवा चेकबुक) घेऊन फिरणे व्यवहार्य नसते.

यासाठीच वर दिलेल्या पावतीच्या दोन प्रती खरेदीदार आणि विक्रेता यांना दिल्या जातात. ते हा व्यवहार पुढच्या रविवारी सभेला आल्यावर पुरा करतात. या व्यवहारपूर्तीला ‘सेटलमेंट’ किंवा ‘पटावत’ असे म्हणतात. मधल्या आठवड्यात ‘एस्सार शिपिंग’चा भाव मुंबई शेअरबाजारात कितीही वाढला तरी आमचा व्यवहार हा त्या पावतीवर लिहिलेल्या भावानेच होतो. कारण तो व्यवहार जेव्हा दोघांनी सही केली तेव्हाच झालेला असतो. फक्त व्यावहारिक कारणांसाठी एक आठवड्याचा ‘सेटलमेंट पिरियड’ दोघांना देण्यात आलेला असतो.

अशारीतीने लिलाव पद्धतीने शेअरची खरेदी-विक्री होत असल्याने आपोआपच तिथे थोडी आरडाओरड, दुसऱ्यापेक्षा जास्त भाव बोलायची घाई, आपला आवाज विक्रेत्यापर्यंत पोहोचण्या-साठी उठून उभे राहणे वगैरे गोष्टी कळत-नकळत होत जातात. एका शेअरसाठी जास्त स्पर्धक उत्सुक असल्यास साहजिकच हा ‘दंगा’ वाढत जातो.

प्रत्यक्ष या सभांना हजर राहून ही यंत्रणा जरूर पाहण्यासारखी आहे.

Ashay Javadekar

Previous
Previous

16) शेअर्सचे व्यवहार कसे चालतात

Next
Next

18) विक्रीच्या किमतीबाबत उघड स्पर्धा हवी