18) विक्रीच्या किमतीबाबत उघड स्पर्धा हवी
Originally published on June 28, 1992
Written by Dr Dileep Javadekar
सांगली-कोल्हापूरमधील गुंतवणूकदारांच्या सभांमध्ये शेअर्स खरेदी-विक्रीचे व्यवहार कसे होतात, हे आपण मागील लेखात पाहीले. परंतु या पद्धतीच्या सौद्यांमध्ये नीट विचार केल्यानंतर काही कमतरता आढळून येतील.
हे सौदे लिलाव पद्धतीनेच होतात हे जरी खरे असले तरी हा फक्त एकतर्फीच लिलाव आहे. म्हणजे मी माझे १०० एस्सार शिपिंग विकायला उभा आहे आणि सभागृहातील चार इच्छुक खरेदीदार सभासद भावाबाबत एकमेकांशी स्पर्धा करत आहेत हे खरेच आहे. परंतु हजर सभासदांपैकी आणखी एक-दोघांना एस्सार शिपिंग विकायचे नाहीत कशावरून? आणि मी माझी अपेक्षित किंमत १२० रुपये धरली आहे. परंतु तो दुसरा विक्रेता १०५-११० रुपयांना त्याच कंपनीचे शेअर्स विकायला तयार होणार नाही कशावरून?
याचाच अर्थ या सभांमध्ये एका वेळी एकच गुंतवणूकदार आपले शेअर्स विकत असतो. त्यामुळे खरेदीदार जरी अनेक असले तरी ते आपापसांत खरेदीच्या दराबद्दल कमी-जास्त बोली बोलून स्पर्धा करतात. मात्र त्यांना एका वेळी एकच विक्रेता व्यावहारिक दृष्टीने भेटतो. खरे पाहता तोच शेअर विकू इच्छिणाऱ्या अनेक विक्रेत्यांनीही विक्रीच्या किमतीबाबत उघडपणे स्पर्धा करायला हवी.
दुसरा तोटा असा, की या सभांमध्ये पुढे येऊन एकेकाने आपली यादी वाचायची, यात फार वेळ जातो. आपल्या वरील उदाहरणात मी माझे शेअर्स विकू इच्छितो आणि त्या कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदीची इच्छा असणारे चार जण आहेत. या पाच जणांच्या व्यवहारासाठी सभागृहातील बाकी १९५ सभासदांचा निष्कारण वेळ जातो. त्यामुळे बराच वेळ जाऊन सौदे तर कमी होतातच, शिवाय सभागृहात अकारण गोंधळ-गडबड वाढते.
वरील दोन्ही कमतरतावर तोडगा काढण्यासाठी प्रत्यक्ष अधिकृत शेअरबाजारात हे शेअर्स खरेदी-विक्रीचे व्यवहार थोड्या वेगळ्या पद्धतीने होतात. ते कसे ते आता पाहू.
प्रत्यक्ष ज्या जागेत शेअर्सचे सौदे होतात, त्या जागेला ‘रिंग’ असे म्हणतात. या रिंगमध्ये आपल्या-सारख्या सर्वसामान्य माणसांना जायला परवानगी नसते. फक्त त्या स्टॉक एक्स्चेंजचे अधिकृत शेअर ब्रोकर किंवा त्यांचा प्रतिनिधीच त्या रिंगमध्ये जाऊ शकतो. या रिंगमध्ये एक स्टेज, सगळे जण सभेला बसल्यासारखे व्यासपीठाकडे तोंड करून बसलेले असे स्वरूप नसते. तर या रिंगवर ठराविक जागी ठराविक शेअर्सचे सौदे होतात. या कंपन्यांची नावे त्या त्या ठिकाणी भिंतीवर किंवा खांबांवर रंगविलेली असतात. वरील उदाहरणात मला एस्सार शिपिंग विकायचे आहेत आणि समजा मी अधिकृत ब्रोकर आहे, तर मी एस्सार शिपिंगच्या खांबाशी जातो. माझ्यासारखेच आणखी कुणी एस्सार शिपिंग विकू इच्छिणारे ब्रोकरही तिथे आलेले असतात. हा शेअर खरेदी करायची मनिषा असलेले ब्रोकरही त्याच खांबाशी येतात. त्यामुळे फक्त त्या कंपनीत स्वारस्य असलेल्या लोकांचाच एक गट तिथे तयार होतो. आता तिथे लिलाव दोन्ही बाजूंनी सुरू होतो. विकत घेणारेही एकमेकांशी स्पर्धा करून दर बोलतात आणि विकणारेही विकायचा दर बोलतात. मागणी आणि पुरवठ्याच्या तत्वानुसार विक्रेते जास्त आहेत की खरेदीदार जास्त आहेत, यावर भाव वर-खाली होतात.
अशा रीतीने अनेक खांबांशी, अनेक जागांवर कोपऱ्या-कोपऱ्यात निरनिराळ्या शेअर्सचे सौदे एकाच वेळी होत असतात. हे ब्रोकर्स एकीकडून दुसरीकडे फिरतही असतात. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडालेला लांबून दिसतो. परंतु प्रत्यक्षात या यंत्रणेमुळे फक्त एकाच कंपनीत खरेदी-विक्रीची इच्छा असलेले एकत्र येत असल्याने बाकीच्यांचा वेळ जात नाही आणि सौदेही भराभर होतात.
ही यंत्रणा आणखी सुलभ होते ती ‘जॉबर्स’ मुळे. ‘जॉबर’ किंवा ‘तरावणीवाला’ असा ब्रोकर्सचा एक प्रकार आहे. जॉबर म्हणजे ब्रोकरांचा ब्रोकर. आपण आपली खरेदी-विक्रीची ऑर्डर रिंगमधल्या एखाद्या ब्रोकरला देतो. हा ब्रोकर ती ऑर्डर जॉबरकडे पुरी करतो. हे जॉबर म्हणजे शेअरचे घाऊक व्यापारी असतात. त्यांना त्या कंपनीचे अर्निंग, तिचा पी-ई रेशो, तिचा निव्वळ नफा वगैरेंशी काही देणे-घेणे नसते. हे जॉबर रिंगमध्ये उभे राहून शेअर घाऊक स्तरावर घेत राहतात आणि विकत राहतात. समजा एस्सार शिपिंगचा जॉबर त्या खांबापाशी उभा आहे. आपला ब्रोकर जाऊन त्याला भाव विचारेल. तो जॉबर म्हणेल ‘११८-१२०.’ म्हणजे विकायचा असल्यास ११८ रुपये आणि घ्यायचा असल्यास १२० रुपये. आपल्याला हा भाव पसंत असल्यास आपण आपले १०० शेअर्स त्याला ११८ रुपयांनी देऊन टाकू. हेच शेअर्स पुढच्या क्षणाला तो जॉबर दुसऱ्या कुणा ब्रोकरला १२० रुपयांनी विकूनही टाकेल. हा मधला दोन रुपये जॉबरचा फायदा. असे दोन तासांत हा जॉबर दोन-पाच हजार शेअर्स घेईल आणि देईल. खरेदी-विक्रीचा दबाव पाहून तोच किंमतही कमी-जास्त बोलेल. परंतु जॉबरचे एकच तत्त्व असेल, तो रिंगमध्ये येतानाही मोकळ्या हाताने येईल आणि जातानाही आपली पोतडी रिकामी करूनच जाईल. फक्त फरकाची रक्कम हाच त्याचा फायदा!