23) व्यवहारपूर्तीच्या खाचाखोचा समजणे महत्त्वाचे

Originally published on August 2, 1992

Written by Dr Dileep Javadekar

आतापर्यंत आपण ब्रोकरकडे ऑर्डर नोंदवून शेअर खरेदी केले. काही दिवसांनी त्यांची डिलिव्हरी घेतली, पैसे देऊन ब्रोकरशी व्यवहार पुरा केला. नंतर योग्य स्टॅम्प लावून आणि ट्रान्स्फर फॉर्म भरून हा शेअर नावावर चढविण्यासाठीही पाठवले. सगळ्या गोष्टी सुरळीतपणे पार पडल्या तर काय काय करायचे हे आपण पाहिले. परंतु आपल्याला माहीतच आहे, की आपल्या आयुष्यात सर्व गोष्टी प्रत्येक वेळी सुरळितपणे पार पडतातच असे नाही. प्रत्येक ठिकाणी आखून दिलेल्या ठराविक मार्गानेच सगळी माणसे जातात असे नाही. शेअर-बाजारात तर बऱ्याच वेळा लोक नियम मोडतात, दिरंगाई करतात, व्यवहार पूर्ण करण्यात चालढकल करतात. हे फक्त ब्रोकर लोकच करतात असे नाही, तर आपल्या-सारखे गुंतवणूकदार ग्राहकदेखील काही काही वेळा असे वागतात. या प्रकारची माहिती नसेल तर नवीन गुंतवणूकदार मनःस्ताप करून घेतो. तेव्हा या व्यवहारपूर्तीच्या खाचाखोचा नीट समजावून घेणे हे महत्त्वाचं काम आहे.

पहिल्यापासून प्रत्येक पायरीला काय अडचणी येतात ते क्रमाक्रमाने पाहू.

प्रथम ब्रोकरकडे ऑर्डर देताना घ्यावयाची काळजी पूर्वी सांगितलीच आहे. आपण दिलेली ऑर्डर बऱ्याच वेळा त्याच दिवशी अंमलात न येण्याची शक्यता आहे. याला अनेक कारणे संभवतात.

१. आपली ऑर्डर ही लिमिट ऑर्डर असेल तर त्यादिवशी तो भाव न मिळाल्यामुळे आपली ऑर्डर मागे राहिली असेल.

२. आपण घ्यायला सांगितलेले शेअर जास्त चल (Active) नसल्यास ते त्या दिवशी न मिळाल्याचीही शक्यता आहे.

३. आपल्या सबब्रोकरने आपली लिमिट ऑर्डर वर पाठवली असूनदेखील त्यादिवशी इतरांच्या ‘बेस्ट मार्केट ऑर्डर्स’ बऱ्याच असल्यामुळे आणि बाजारात गर्दी असल्यामुळे आपल्या ऑर्डरचा पाठपुरवठा करायला रिंगमधल्या ब्रोकरला वेळ मिळाला नसेल.

४. इतर मोठ्या ऑर्डर्ससमोर आपल्यासारख्यांची छोटी ऑर्डर ब्रोकरने ऐकून न ऐकल्यसारखी केली असेल.

५. एखाद्या वेळी चढत्या मार्केटमध्ये आपले शेअर घेऊनदेखील उद्याचा चढा भाव आपल्याला सांगून तेवढ्यातल्या तेवढ्यात थोडे जास्त पैसे मिळतील का पाहावे असा विचारही ब्रोकरने केला असेल.

आपल्या ऑर्डरची अंमल-बजावणी त्याच दिवशी लगेच का झाली नसेल याचा शांतपणे विचारही करावा. वरील कारणांमध्ये शेवटची दोन कारणे जरी दिली असली तरी प्रत्येक वेळी तसेच झाले आहे, असे मनात आणू नये.

ही खरेदी झाल्यावर ब्रोकर आपल्याला कॉन्ट्रॅक्ट नोट देईल. काही ब्रोकरच्या ऑफिसमध्ये कॉम्प्युटर असेल. हे ब्रोकर्स सर्व व्यवहार कॉम्प्युटरमध्ये ‘फीड’ करून ठेवतात आणि पंधरा दिवसांतून एकदाच कॉन्ट्रॅक्ट नोट छापतात. आपला ब्रोकर असा संगणकवाला असेल तर तो त्याच दिवशी कॉन्ट्रॅक्ट नोट देणार नाही. मात्र आपण आपल्याला ‘नेट’ भाव काय पडला हे विचारून आपल्या वहीत त्या तारखेला ती नोंद करून ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे नंतर तक्रारीला जागा राहणार नाही.

ही कॉन्ट्रॅक्ट नोट मिळाल्यावर पुढच्या सेटलमेंट-डेला आपले शेअर यायला हवेत. याचाच अर्थ जास्तीत जास्त १५-२० दिवसांत आपल्याला डिलिव्हरी मिळायला हवी. परंतु असे बहुधा होत नाही. डिलिव्हरी यायला दीड-दोन महिने (कधी-कधी त्याहून जास्त दिवस) लागतात. हे असे का होते याला अनेक कारणे आहेत. बऱ्याच वेळा आपली ऑर्डर सेटलमेंटच्या पंधरवड्याच्या शेवटी शेवटी अंमलात आली असल्यास ती व्यवहारपूर्ती पुढच्या वेळी केली जाते. कित्येक वेळा आपल्याला विकलेले शेअर मधल्या काळात भाव कमी आल्यामुळे विकणारा ‘कव्हर’ करतो. (म्हणजे परत कमी भावाने विकत घेतो) त्यामुळे तो डिलिव्हरी देतच नाही. ही डिलिव्हरी नंतर तिसऱ्याच ब्रोकरकडून येऊन आपल्याला मिळते. त्यामुळे मध्यंतरी वेळ जातो. काही काही वेळा डिलिव्हरीमध्ये काही दोष असल्यामुळे ती स्वीकारण्यास आपला ब्रोकर नकार देतो. (याला ‘डिलिव्हरी’ न उतरणे असे म्हणतात) अशा न उतरणाऱ्या डिलिव्हरीऐवजी मग विकणाऱ्या ब्रोकरला दुसरी डिलिव्हरी पैदा करून आपल्या ब्रोकरला द्यावी लागते. यातही वेळ जाऊ शकतो. काही काही वेळा आपल्यासारखा शेअर विकणारा दुसऱ्या टोकाचा ग्राहकच वेळ पाळत नाही. अशा अनेक गोष्टींमुळे डिलिव्हरी यायला वेळ लागतो. शिवाय गर्दीच्या वेळी मागील सौदापूर्ती कार्यक्रम बरेच रेंगाळतात. शिंप्याला शर्ट शिवायला एकच दिवस लागतो, परंतु मागील कामेच राहिली असल्यामुळे तो आपल्याला पंधरा दिवसांनंतरची तारीख देतो, तसेच काहीसे शेअरबाजारातही होते.

थोडक्यात म्हणजे डिलिव्हरी केव्हा येईल हे बऱ्याच वेळा आपल्याला आणि आपल्या सब-ब्रोकरला सांगता येत नाही. शक्यतो डिलिव्हरी येईपर्यंत आपण कॉन्ट्रॅक्ट नोट सांभाळून ठेवतो आणि ते शेअर विकू शकतो, तेव्हा जास्त काळजी करू नये. फक्त दरम्यानच्या काळात कंपनीने एखादा डिव्हिडंड, बोनस किंवा राईट दिला आहे का, याकडे लक्ष ठेवावे.

Ashay Javadekar

Previous
Previous

22) ट्रान्स्फर अर्ज भरण्याची पद्धती

Next
Next

24) लाभांशाचा धनादेश कसा मिळतो?