24) लाभांशाचा धनादेश कसा मिळतो?
Originally published on August 9, 1992
Written by Dr Dileep Javadekar
आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेतल्यानंतर प्रत्यक्ष ती डिलिव्हरी हातात येईपर्यंत मध्यंतरीच्या काळात कंपनीचे काही लाभांश, बोनस अथवा राईट दिला नाही ना याकडे लक्ष ठेवावे, असे मागील लेखात लिहिले आहे.
ज्या दिवशी आपण शेअर्स विकत घेतो ती तारीख कॉन्ट्रॅक्ट नोटवर लिहिली जाते. त्या दिवसांपासून आपण त्या शेअर्सचे कायदेशीर मालक असतो, हे मागे पाहिलेच आहे. आता या तारखेनंतर लगेचच कंपनीने काही डिव्हिडंड दिला तर आपल्या हातात डिलिव्हरी नसल्यामुळे तो पहिल्या मालकाकडे जाणे साहजिकच आहे. यावरूनच शेअर्सचे ‘कम-डिव्हिडंड’ आणि ‘एक्स डिव्हिडंड’ (CD आणि XD) असे प्रकार पडतात. कंपनी जेव्हा काही लाभांश जाहीर करते तेव्हा ती एक ‘रेकॉर्ड डेट’ किंवा ‘बुक क्लोजर डेट’ जाहीर करते. या तारखेला कंपनीच्या पुस्तकात ज्या नावावर हे शेअर्स असतील त्यांना हा लाभांशाचा धनादेश कंपनी पाठवते. साधारणत: या रेकॉर्ड डेटच्या दोन-चार आठवडे आधी तो शेअर बाजारात ‘एक्स डिव्हिडंड’ होतो. समजा एखाद्या कंपनीने शेअरवर दोन रुपये लाभांश द्यायचे जाहीर केले आणि एक ऑक्टोबर ही रेकॉर्ड डेट ठरवली तर शेअर मार्केट त्याआधीची (समजा १ सप्टेंबर) तारीख XD म्हणून जाहीर करते. म्हणजे ३१ ऑगस्टपर्यंत ज्यांनी हे शेअर्स घेतले असतील त्यांनी CD आणि १ सप्टेंबरपासून घेणाऱ्याने ते CD घेतले असे मानले जाते.
आता समजा आपण त्या कंपनीचे शंभर शेअर्स ३१ ऑगस्टला घेतले तर नंतर अशा XD झालेल्या शेअर्सची व्यवहारपूर्ती अग्रहक्काने केली जाऊन ती डिलिव्हरी आपल्याला लवकरात लवकर मिळेल, अशी व्यवस्था केली जाते. ती डिलिव्हरी आल्यानंतर आपण लगेच ट्रान्सफर फॉर्म भरून नावावर चढविण्यासाठी कंपनीकडे पाठवली तर ती कंपनीला एक ऑक्टोबरपूर्वी मिळते आणि शेअर्स आपल्या नावावर झाल्यामुळे डिव्हिडंडचा २०० रुपयांचा चेक आपल्या पत्त्यावर येतो. ज्यांनी १ सप्टेंबरपासून हे शेअर्स घेतले असतील त्यांनी ते XD घेतले असल्यामुळे त्यांची डिलिव्हरी त्यांना यथावकाश मिळते. ती कंपनीकडे पाठवायची घाई त्यांना नसते.
आता वरील यंत्रणा व्यवस्थित कार्यवाहित आली नाही आणि आपल्याला ती डिलिव्हरी सप्टेंबर महिन्यात न मिळता ऑक्टोबर महिन्यात मिळाली, तर काय करायचे? घेताना तर आपण तो शेअर्स CD खरेदी केलेले असतात. अशा वेळी मग काय करायचे याचे उत्तर सोपे आहे. आपल्या ब्रोकरला पैसे देताना आपण लाभांशाचे दोनशे रुपये कमी द्यायचे किंवा पैसे आधीच दिले असल्यास दोनशे रुपये मागून घ्यायचे, किंवा वारंवार खरेदी-विक्री करत असल्यामुळे ब्रोकरच्या वहीत आपले खाते असल्यास त्यावर दोनशे रुपये जमा लिहून ठेवायला सांगायचे. ही जबाबदारी ब्रोकर लोक पाळतात. कारण ज्या माणसाने हे शेअर्स विकलेले असतात त्याला ब्रोकर तसेच दोनशे रुपये कमी देतो (कारण हे दोनशे) रुपये त्याला कंपनीच्या डिव्हिडंड चेकने मिळणार असतात).
वर जसे डिव्हिडंडबाबत CD, XD सांगितले आहे. तसेच बोनस शेअर्सबाबतही होते. कंपनी आपल्या मिळवलेल्या नफ्यातून जसा शेअरहोल्डर्सना डिव्हिडंड वाटते, तसेच कधी कधी बोनस शेअर्सही वाटते. याचीही एक रेकॉर्ड डेट कंपनी जाहीर करते. शेअर्स मार्केटमध्ये हे शेअर्सही ‘एक्स बोनस (CB) केव्हा होतात ती तारीख ठरवली जाते. समजा कंपनीने ५ वर २ शेअर्स बोनस दिले तर आपण ‘कम बोनस’ (CB) पाचशे शेअर्स घेतल्यावर ती डिलिव्हरी वेळेत मिळाली तर कंपनीकडे नावावर चढवायला पाठवल्यानंतर कंपनी आपल्याला ते पाचशे शेअर्स नावावर चढवून देईल आणि दोनशे नवीन शेअर्स बोनसचे म्हणून पाठवून देईल. समजा असे CB शेअर्स घेऊनही डिलिव्हरी येण्यात दिरंगाई झाली तर आपल्या ब्रोकरकडून एकंदर सातशे शेअर्स डिलिव्हरी मागून घेण्याचा हक्क आपल्याला मिळतो. विकणाऱ्याला मिळालेले बोनस शेअर्स खरे पाहता त्याचे नसल्यामुळे आता त्याचा ब्रोकर ते मिळवून आपल्या ब्रोकरकडे पाठवेल.
कंपनी काही वेळ ‘राईट शेअर्स’ काढते. हे ‘राईट शेअर्स’ बोनसप्रमाणे मोफत नसतात, तर यासाठी आधीच्या शेअरहोल्डर्सना कंपनीकडून काही प्रमाणात ‘ऑफर’ येते. तो अर्ज भरून पैसे पाठवल्यास हे नवे राईट शेअर्स मिळतात. हे पैसे त्या शेअर्सच्या बाजारभावापेक्षा स्वाभाविकपणेच खूप कमी असतात. राईटचीदेखील कंपनीची रेकॉर्ड डेट आणि शेअर मार्केटमध्ये कम राइट (CR) आणि एक्स राइट (XR) तारीख असते. आपण CR खरेदी केल्यास आणि कंपनी रेकॉर्ड डेटच्या आधी डिलिव्हरी न आल्यास शेअर्सच्या डिलिव्हरीबरोबरच राईट इश्यूचा अर्जही ब्रोकरकडून मागून घ्यावा, कारण तो आधीच्या विकणाऱ्या शेअरहोल्डरला गेला असणार. या XD, XB, XR तारखा अर्थविषयक नियतकालिकांचे आणि स्टॉक एक्सचेंजच्या अधिकृत मुखपत्रात पाहायला मिळतात.