25) बोनस शेअर्स

Originally published on August 16, 1992

Written by Dr Dileep Javadekar

बोनस शेअर आणि राईट इश्यू हे शेअर बाजारातले परवलीचे शब्द आहेत. अगदी स्वत:जवळ एकही कंपनीचे शेअर न बाळगणारा, परंतु वर्तमानपत्र वाचणारा माणूसदेखील ‘कोलगेटनं दर तीन वर्षाला बोनस दिला आहे’ किंवा ‘बजाज ऑटोचा बोनस येणार आहे’ वगैरे माहिती सांगायला सरसावून तयार असतो. याला कारण म्हणजे या बोनसचा अगदी नेहमीच्या वर्तमानपत्रांतूनही खूप प्रसिद्धी दिली जाते. ‘अर्निंग पर शेअर’ ‘पी.इ.रेशो’, कंपनीचा निव्वळ नफा वगैरे गोष्टींना तेवढी प्रसिद्धी मिळत नाही. वर्तमानपत्रांतून हे आकडे आले तरी न कळल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु ‘आमच्या एका मित्राने दहा वर्षांपूर्वी दोनशे कोलगेटचे शेअर घेतले होते. इतक्या वेळा बोनस मिळाला की आज ती संख्या दोन हजाराच्याही वर गेली आहे. हे सांगणे, लक्षात ठेवणे आणि त्याचा अचंबा करणे हे जास्त सोपे असते.

हे बोनस म्हणजे असते तरी काय गौडबंगाल? साधारणत: बोनस म्हणजे फुकट मिळणारे शेअर हे सगळ्यांना ठाऊक असते. पण मग सगळ्याच कंपन्या भागधारकांना खुश करण्यासाठी असे फुकट शेअर सारखे का वाटत नाहीत? नुसतीच शेअर सर्टिफिकेटस् छापून वाटायची, पैसे द्यायचे नाहीत, घ्यायचे नाहीत, मग त्यात अशक्य काय आहे? अशा बोनस शेअर देण्यानं भागधारक खुश होतात. परंतु कंपनीच्या कामकाजावर त्याचा काय परिणाम होतो?

एक लक्षात घेतले पाहिजे, की बोनस वाटल्याने कंपनीच्या गंगाजळीमध्ये काहीच भर पडणार नसते. त्यामुळे कंपनीच्या कामकाजावर त्याचा काही परिणाम होणार नसतो. फक्त एका शेअरहोल्डरकडे शंभर शेअर असतील आणि कंपनीने ‘एकास एक’ या प्रमाणात बोनस दिला, तर ते दोनशे होतात. (त्याच्याजवळचे) सर्टिफिकेट त्याच्याकडेच राहते आणि कंपनी आणखी शंभर नवीन शेअरचं सर्टिफिकेट त्याला पाठवते) परंतु त्यामुळे कंपनीच्या मालकीमध्ये त्याचा टक्केवारीने हिस्सा तेवढाच राहिलेला असतो. कारण आधीच्या सर्वच शेअरहोल्डर्सचे शेअर दुप्पट झालेले असतात. थोडक्यात तुमच्या खिशातली शंभर रुपयांची नोट काढून घेऊन कंपनी त्याबद्दल तुम्हाला पन्नास रुपयांच्या दोन नोटा देते. (किंवा तुमच्या शंभरच्या नोटेला आजपासून पन्नास रुपयांची किंमत बाजारात राहते असे म्हणता येईल).

प्रत्यक्ष शेअर बाजारात त्या शेअरच्या किमतीवरही असाच परिणाम होतो का? याचे उत्तर साहजिकच ‘होय’ असे आहे. एखादा शेअर-कम-बोनस (CB) साठ रुपयानं विकल जात असेल, तर तोच एक्स बोनस (XB) तीस रुपयानं बोलला जाईल. ज्या प्रमाणात बोनस दिले असतील (एकास एक, पाचास तीन वगैरे) त्या प्रमाणातच ही किंमत कमी होईल.

ही किंमत अशी कमी का होते? ते गणिताच्या दृष्टीने दुसऱ्या प्रकारेही समजावून घेता येईल.

एखाद्या कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू दहा रुपये आहे आणि त्या शेअरवर कंपनीकडे रिझर्व्ह ३० रुपये आहे. अशा वेळी त्या शेअरची बुकव्हॅल्यू दहा अधिक तीस म्हणजे चाळीस रुपये होईल. आता या कंपनीने जर एकास एक शेअर बोनस दिला, तर रिझर्व्ह पुस्तकामधील दहा रुपये इक्विटी कॅपिटल (भागभांडवल) पुस्तकात टाकले जातील. साहजिकच दहा रुपये फेसव्हॅल्यूचे दोन शेअर आणि त्यामागे वीस रुपये रिझर्व्ह अगर गंगाजळी अशी परिस्थिती राहील. म्हणजेच त्या शेअरची बुकव्हॅल्यू दहा अधिक दहा म्हणजेच वीस रुपये राहील. शेअरची संख्या दुप्पट झाल्याने ‘अर्निंग पर शेअर’ ही निम्म्यावर येईल. या सगळ्याचा परिणाम म्हणून बाजारभावही निम्म्यावर येईल. या रिझर्व्ह पुस्तकातून कॅपिटल पुस्तकात नुसती रकमेची देवाणघेवाण होऊन ते बोनस शेअर दिले जातात. म्हणून यांना ‘कॅपिटलायझेशन शेअर्स’ असेही म्हणतात.

आता हा सगळा असा नुसता आकड्यांचा खेळ आहे, तर मग बोनस दिल्यानं सगळेजण असे हुरळून का जातात? वारंवार बोनस देणाऱ्या कंपन्या लोकप्रिय का असतात? या प्रश्नाचे उत्तर गणितापेक्षा माणसाच्या मानसिक घडामोडीत हुडकायला लागेल. आपल्याकडेच शेअर दुप्पट, तिप्पट होत असलेले पाहून साहजिकच आनंद होतो. मोठ्या कंपन्यांचे एवढे एवढे शेअर माझ्याकडे आहेत हे सांगताना छातीवर मूठभर मांस चढल्यासारखं वाटतं. आपल्याकडील शेअरची संख्या वाढल्यावर त्यातले थोडे विकायला विशेष विचार करावा लागत नाही. कित्येक लोक बोनस मिळाल्यावर पहिले शेअर विकून पैसे मिळवतात. त्यामुळे एकूण शेअर होल्डर्सची संख्या वाढत जाते. परंतु पाच लाख लोकांकडे एखाद्या विवक्षित कंपनीचे शेअर असल्यास बोनस नंतरच्या वर सांगितलेल्या विक्रीमुळे शेअर होल्डर्सची संख्या सात-आठ लाख होते. साहजिकच जास्त जास्त लोकांच्या भावभावना त्या शेअरमध्ये गुंततात. त्या शेअरमधील बाजारातील रोजची उलाढाल वाढते. त्यामुळे किंमतही हळूहळू पुन्हा वाढू लागते.

एखादी कंपनी बोनस देते तेव्हा कंपनीचा एक आत्मविश्वास त्यातून प्रतिबिंबित होतो. पूर्वीपेक्षा जास्त शेअरची संख्या झाली, तरी आपण तेवढ्या शेअरना डिव्हिडंड वाटू शकू. तेवढ्या जास्त शेअरहोल्डर्सना आपण पुढे येणाऱ्या वर्षांमध्येही समाधानी ठेवू शकू असा व्यवस्थापनाचा एक प्रकारचा गाढा विश्वास त्यातून दिसून येतो. त्यामुळेही शेअरची किंमत पुन्हा हळूहळू वाढू लागते.

Ashay Javadekar

Previous
Previous

24) लाभांशाचा धनादेश कसा मिळतो?

Next
Next

26) बोनसची किमया