3) दर महिन्याला पंधरा हजार

Originally published on March 15, 1992

Written by Dr Dileep Javadekar

साधारणपणे वयाच्या पंचावन्नाव्या वर्षानंतर आपणाला बचतीतून पुरेसे पैसे मिळत राहतील आणि नोकरी-धंद्यातील कमाई थांबली तरी बिघडणार नाही अशारीतीने प्रत्येकाने बचतीचा आराखडा आखणे आवश्यक मानले पाहिजे. याचा अर्थ असा नाही, की पंचावन्न वर्षानंतर प्रत्येकाने आपला व्यवसाय-धंदा बंद करावा. उलट जितके दिवस जमेल तितके दिवस आपण स्वत:ला कामात अडकवून घ्यावे असेच मला वाटते. फक्त पंचावन्न वर्षानंतर त्या कामावर मिळकतीचे साधन यादृष्टीने आपण अवलंबून राहू नये, एवढेच मला म्हणायचे आहे.

दरमहा पाचशे रुपये जर आपण पस्तीसाव्या वर्षांपासून बाजूला ठेवू शकलो तर हे कसे शक्य होईल याचा विचार करू. अर्थात या आधी हे लक्षात घेतले पाहिजे, की हे पाचशे रुपये घरखर्च, मुलांची शिक्षणं , इतर कर्जे असल्यास त्यांची देणी वगैरे भागवून आपण शिल्लक टाकले आहेत. दरम्यान, १५ टक्के व्याज येणाऱ्या अनेक योजना आज उपलब्ध आहेत. हिशेबासाठी आपण इंदिरा विकासपत्र घेऊ.

पस्तीसाव्या वर्षांपासून दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण पोस्टात जाऊन पाचशे रुपयांचे इंदिरा विकासपत्र खरेदी केले. वयाच्या चाळीसाव्या वर्षांपासून याचे आपल्या हातात एक हजार रुपये येतील, शिवाय आपण फक्त पाचशे रुपये घेऊन गेलो आहेच. त्यामुळे त्यावेळी आपण १५०० रुपयांची पत्रे खरेदी करत राहू. पुन्हा पाच वर्षांनी, ४५ व्या वर्षांनंतर तीन हजार रुपये हातात येतील.

याप्रमाणे वय ३५ ते ४० दरमहा गुंतवणूक ५०० रुपये वय ४० ते ४५ (१००० + ५००) दरमहा गुंतवणूक १५०० रुपये याप्रमाणे वय ४५ ते ५० (३००० + ५००) दरमहा गुंतवणूक ३५०० रुपये, वय ५० ते ५५ (७००० + ५००) दरमहा गुंतवणूक ७५०० रुपये ५५ वर्षांनंतर दरमहा पंधरा हजार रुपये हातात येतील. म्हणजे वयाच्या पंचावन्नाव्या वर्षांपासून आपल्या हातात दर महिन्याला पहिल्या तारखेला पंधरा हजार रुपये मिळतील. हे सर्वच्या सर्व आपण घरी आणून खर्च करत राहिलो, तर एक्सष्ठाव्या वर्षांनंतर काहीच पैसे उरणार नाहीत. मात्र समजा यातले ७५०० रुपये घरखर्चासाठी वापरले आणि ७५०० रुपये पुन्हा इंदिरा विकास पत्रात गुंतवले तर हे चक्र तहहयात कितीही वर्षे चालू शकेल. म्हणजे महिना ७५०० रुपयांचे पेन्शन आणि आपल्यानंतर वारसांना नऊ लाख मिळतील.

वरील विवेचन वाचून आश्चर्य वाटले तरी हे सर्व आकडे बरोबर आणि हिशेबाला धरून आहेत. कुणी यावर असा आक्षेप घेईल, की आणखी वीस वर्षांनंतर साडेसात हजार रुपयांची किंमत काय असेल? त्यात आपले खर्च भागतील का? प्रश्न अगदी बरोबर आहे. महागाई किती होणार आहे, हे आपल्या हातात नाही. आपल्या हातात फक्त आज उद्यासाठी बचत करणे एवढेच आहे. तेव्हा तो विचार आज करणे सगळेच व्यर्थ आहे, असा पवित्रा घेऊन चालणार नाही. अगदीच काही नाही तरी एवढ्या पैशात त्यावेळी म्हातारा-म्हातारीसाठी मीठ-भाकर तरी मिळेल याची अपेक्षा ठेवायला हरकत नाही. कारण मुले त्यावेळी मिळवती झाली असतील. ती त्यांच्यासाठी कमावतीलच.

अशाप्रकारे दरमहा बचत करण्यात दुसरा एक फायदा आहे. तो डोळ्याआड येणार नाही, या वीस वर्षांत जशी महागाई वाढणार आहे, तसेच पगार, धंद्यातील कमाईही वाढणार आहे. व्याजाचे दरही वाढणार आहेत. आज दरमहा पाचशे रुपये बाजूला ठेवणे जेवढे जड जाईल, तेवढे दहा वर्षांनंतर जाणार नाही. हुशारीनं त्यावेळी पाचशेच्या ऐवजी हजार-बाराशे रुपये बाजूला टाकले तर नंतरची रक्कम कितीतरी पटीनं वाढेल. तसेच आज पाच वर्षांत दुप्पट या योजनेवर हा हिशेब केला असला तरी उद्या व्याजदर वाढल्यावर कदाचित चार वर्षांत, साडेतीन वर्षांत पैसे दुप्पट होतील. तसेच या योजनेचा काळ २० वर्षे जरी असला तरी पाच वर्षांनंतर दरमहा पैसे हाती येत राहणार आहेत. ते आपण जास्त व्याजाच्या (किंवा जास्त मिळकत देणाऱ्या) इतर योजनांमध्ये घालू शकू. वीस वर्षे याच कोष्टकाप्रमाणे जायला हवे, असे मुळीच नाही. आपला पैसा वीस वर्षे कुलुपात अजिबात अडकलेला नाही, फक्त दरमहा पाचशे रुपये बाजूला टाकायचे आणि ते वीस वर्षे वापरायचे नाहीत एवढेच बंधन आपण स्वत:वर लादून घेतलेले आहे.

आता काही जणांना सुरुवातीला पाचशे रुपये ही रक्कम जास्त वाटेल. त्यांनी कमी रकमेपासून सुरुवात करायलाही हरकत नाही. काही वाचक वयानं जास्त असतील. त्यांनी आतापर्यंत काही बचत केलीही असेल. त्यांची सुरुवात आधीच झालेली असेल-नसेल. तर ती आता करायला काय हरकत आहे! अजिबातच त्या वाटेला न जाण्यापेक्षा उशिरा केलेली सुरुवातही वाईट नाही.

हवे तर प्रथम दोन-तीन महिने आपण रोज करत असलेला खर्च, शक्यतो पैशापर्यंत एका वहीत लिहायचा प्रयत्न करायला हवा आणि नंतर ती वही वाचावी. आपल्या लक्षात येईल, की यातल्या बऱ्याच खर्चाला आपण चाट देऊ शकतो. आपल्या आजच्या राहणीमानात काहीही बदल होऊ न देता आपण काही पैसे वाचवू शकतो. पैसे वाचवणे म्हणजे पैसे मिळवणेच आहे. पुढे काही तरी उद्देश ठेवून बचत करण्यातही मजा येते. आपली वाढणारी बचत एक मोठी सुरक्षिततेची भावना देऊन जाते.

Ashay Javadekar

Previous
Previous

2) दरमहा शंभर रुपये बचत: वीस वर्षांत दीड लाख

Next
Next

4) व्याजाइतकीच सुरक्षितता महत्त्वाची