4) व्याजाइतकीच सुरक्षितता महत्त्वाची
Originally published on March 22, 1992
Written by Dr Dileep Javadekar
मागील लेखात आपण ५५ व्या वर्षानंतर तहहयात मिळणाऱ्या मिळकतीसाठी एक योजना पाहिली. अशाप्रकारची गणिते करूनच बँका ‘निरंतर पेन्शन योजना’, ‘समृद्धी योजना’, ‘सदाफुली योजना’ वगैरे नावे देऊन नवनवीन योजना लोकांपुढे सादर करत असतात. एक लक्षात ठेवले पाहिजे... योजनेचा प्रकार वरवर कितीही नावीन्यपूर्ण असला तरी शेवटी व्याजाचा दर हा ठराविकच असतो. आज बँकांनी किती व्याजदर द्यावा याला सरकारी बंधने आहेत आणि त्या चौकटीत राहूनच नवीन योजना काढल्या जातात. तेव्हा शेवटी व्याजाचा दर काय हा प्रश्न गुंतवणूकदाराने विचारात घ्यायला हवा.
बँकांची किंवा कोणत्याही वित्तसंस्थांची दुसरी एक गंमत असते. आपण ठेवलेल्या ठेवीवर जो व्याजदर सुरुवातीला ठरलेला असतो तो जरी इतर नवीन ठेवींसाठी व्याजदर बदलले तरी बदलत नाही. त्यासाठी ती ठेव आपल्याला नुकसान करून मोडावी लागते. दिलेल्या कर्जाबाबत मात्र उलट नियम आहे. कर्जावरील व्याजाचा दर वाढला की लगेच दुसऱ्या दिवसापासून तो सगळ्या आधीच्या कर्जानांही लागू करतात. तेव्हा बँकांत किंवा कुठेही ठेव ठेवताना फार लांब पल्ल्याची, पाच वर्षे, दहा वर्षे अशी योजना स्वीकारू नये.
आपण श्रम करून, घाम गाळूंन मिळवलेला पैसा गुंतवताना मनुष्याला त्याच्या सुरक्षिततेविषयी काळजी वाटणं स्वाभाविक आहे. पण सुरक्षिततेबरोबरच आणखी काही प्रश्नांची उत्तरेही शोधायला हवीत :
ही गुंतवणूक सुरक्षित आहे का? माझे मुद्दल नाहीसे तर होणार नाही?
यातून मला काही नियमित उत्पन्न मिळेल का? किती?
जरूरी भासल्यास मला माझे पैसे मोकळे करून मिळतील का? त्यासाठी किती वेळ लागेल?
काही काळानंतर माझ्या गुंतवणुकीत वाढ होईल का?
यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर किती कर भरावा लागेल? शेवटी माझ्या हातात काय पडेल?
जगातील प्रत्येक गुंतवणुकीबाबत या प्रश्नांच्या उत्तरात रस्सीखेच चालू असते. अतिसुरक्षितता पाहिली तर वाढ होत नाही. नियमित उत्पन्न जास्त आणि खात्रीशीर हवे असेल, तर मुद्दल वाढू शकत नाही. गरजेच्या वेळी पैसे लगेच हवे असल्यास नियमित उत्पन्नावर पाणी सोडावे लागते. कर कमीत कमी बसावा असे पाहिले, तर गुंतवणुकीत वाढीची अपेक्षा करता येत नाही.
प्रत्येकाचा पैसा हा त्यानं स्वत: मिळवलेला, वाचवलेला असतो. तेव्हा त्याचा विनियोग कसा करावा हे तोच ठरवतो. कुणाला नियमित उत्पन्न महत्त्वाचे वाटेल, कुणाला पाच-सहा वर्षांनंतर होणारी वाढ आवडेल, कुणाला कराची भीती जास्त असेल, तर कुणाला अडीअडचणीत पैसे हातात येणे जास्त महत्त्वाचे असेल.
गुंतवणुकीची सुरक्षितता पाहायची झाली तर बँकांतील ठेवी हा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग म्हणावा लागेल. आजकाल प्रत्येक गावात अनेक बॅंका आहेत. आपण राहतो त्या गल्लीच्या कोपऱ्यावर नक्कीच एखादी बॅंक सापडते. बँकांवर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण असल्यामुळे पूर्वीसारख्या त्या आता बुडत नाहीत. बारा ते चौदा टक्के व्याज मिळते. परंतु मुदलात वाढ होणे शक्य नसते. दुसरे असे, की गेली एक-दोन वर्षे महागाई निर्देशांक दहा ते तेरा टक्के आहे. म्हणजे मागच्या वर्षी शंभर रुपयांना मिळणारी वस्तू आज एकशे तेरा रुपयांना मिळते. अशावेळी बॅंकेतून मिळणारे व्याजही ती वस्तू खरेदी करण्यात खर्च होणार. म्हणजे एक वर्षापूर्वी एखादी गोष्ट पुढच्या वर्षी घेऊ म्हणून आपण पैसे बॅंकेत ठेवले असल्यास पुन्हा आज ती वस्तू खरेदी करताना मिळालेले सगळे उत्पन्न खरेदीतच संपणार. उद्या हा महागाई निर्देशांक आणखी वाढला तर बँकेतल्या आजच्या ठेवी तोट्यात जातील, प्रत्येक वेळी ठेव व्याजासकट परत घेतल्यावर त्या पैशाची खरेदी करण्याची शक्ती कमी झाल्याचे आपल्याला दिसून येईल. सुरक्षित सुरक्षित म्हणत आपण एका मोठ्या असुरक्षित योजनेत तर पैसे गुंतवले नाहीत ना असे म्हणण्याची पाळी आपल्यावर येईल.
काही वर्षांपूर्वी महागाई निर्देशांक सात-आठ टक्क्यांवर स्थिर होता, तेव्हाइतके बॅंकेत पैसे ठेवणे आज आशादायक राहिलेले नाही हे कुणालाही पटेल. परंतु म्हणून सर्व पुढच्या खरेदी आपण एकाच वेळी तर करू शकत नाही. वर्षभराचे तांदूळ-गहू आपण खरेदी करू शकू. पण वर्षभराची भाजी-फळे तर विकत घेऊ शकत नाही. तेव्हा पैसा हा तर गुंतवायला हवा आणि शक्यतो त्याची खरेदी करायची शक्तीही कमी होऊ देता कामा नये.
नियमित मिळणारे व्याज आणि मुदलातली वाढ हे दोन्ही साधारणपणे एकाच गुंतवणुकीतून मिळत नाही. सोने घेऊन ठेवले तर त्याची किंमत वाढेल. पण दरवर्षी त्यातून काही पैसे सुटणार नाहीत. प्लॉटमध्ये पैसे गुंतवले तर काही वर्षांनी जास्त पैसे मिळतील पण तोपर्यंत जमिनीकडे नुसतेच पाहत बसावे लागेल. अलीकडे युनिट ट्रस्ट व म्युच्युअल फंडाच्या निरनिराळ्या योजना येतात. नियमित बारा-चौदा टक्के उत्पन्न देणाऱ्या योजना गुंतवणुकीत फार मूल्यवृद्धी देऊ शकत नाहीत, देत नाहीत. नियमित उत्पन्नाची खात्री न देणाऱ्या योजना जास्त जोखीम घेऊन भरघोस मूल्यवाढ देतात.
करनियोजन हा एक वेगळाच विषय आहे. थोडाकाळ तो बाजूलाच ठेवावा लागेल. कारण त्यासाठी आधी बरीच माहिती घ्यावी लागेल.