31) शेतात हळद आणि सांगलीत गोंधळ

Originally published on September 27, 1992

Written by Dr Dileep Javadekar

प्रत्यक्ष माल न देता-घेता फक्त पुढे कधीतरी आपण तो देऊ किंवा घेऊ असे वायद्याचे व्यवहार कसे होऊ शकतात हे आपण मागील लेखात पाहिले. आता असे व्यवहार करण्यासाठी उदाहरणादाखल आपला व्यापारी क्रमांक एक शेतकऱ्याकडे गेला, तर व्यापारी क्रमांक दोन शेतकऱ्याकडून चौकशी करत करत पहिल्या व्यापाऱ्यापर्यंत पोहोचला. परंतु अशी धावाधाव न करता या व्यवहारांमध्ये इच्छुक लोकांना एकत्र आणण्याचे काम करण्यासाठी वायदेबाजार भरवीला जातो. प्रत्यक्ष हळद आंध्र प्रदेश, तमिळनाडू आधी ठिकाणी पिकायची असते, परंतु त्याचे सौदे मात्र तिसरीच कुणी माणसे सांगलीत करत असतात. ‘बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी’ सारखेच शेतात (जमिनीत) हळद आणि सांगलीत गोंधळ, असां हा प्रकार असतो. त्यामुळे त्या शेतकऱ्याकडून घेतलेल्या हळदीची पावती (किंवा करारपत्र) बऱ्याच लोकांच्या हातून कमी-जास्त दराने चार महिन्यांत फिरत राहते. त्यावर खूप लोक पैसे मिळवतात आणि गमावतातही. त्यावर पुष्कळ सट्टेबाजीही होते. पुष्कळ वेळा जुगारी पद्धतीने खेळीही खेळल्या जातात.

हे जर असे होत असेल, तर असे बाजार भराव्याची गरजच काय? लोकांच्या मनातील जुगारी प्रवृतीला एकप्रकारे हे खतपाणीच घालणं नाही काय? सरकारने जशी मटक्यावर किंवा जुगारावर बंदी घातली आहे, तशीच ती या वायदे व्यवहारांवरही का नाही?

या प्रकारचे उत्तर शोधताना आपल्याला समाजातील भिन्न आर्थिक कुवतींचा थोडा मागोवा घ्यावा लागेल. आपल्यामध्ये कमी-जास्त श्रीमंती असलेले अनेक प्रकारचे लोक राहतात, हे तर सर्वमान्य आहे. मी आज माझी सायकल हरवली तर जितका हळहळेन, तितका एखादा गर्भश्रीमंत माणूस मोटार चोरीला गेली तरी काळजीत पडणार नाही. मला आज एखादी वस्तू २५ पैसे स्वस्त मिळाली, तर जेवढा आनंद होईल तेवढाच एखादा उधळ्या माणूस वीस-पंचवीसशे रुपये विनाकारण खर्चालाही मागेपुढे पाहणार नाही. हा नुसताच गरीबी-श्रीमंतीचाही प्रश्न राहत नाही. प्रत्येकाची मनोवृत्तीही निराळी असते. खिशात पाच रुपये असले तरी शीळ वाजवत मजेत फिरणारी माणसेही आपल्यात आहेत आणि दररोज पाच-दहा हजार रुपये मिळवूनही रक्तदाब, निद्रानाश असे विकार जडवून घेणारे महाभागही आपण पाहतो. तेव्हा आपल्यामध्ये भिन्न आर्थिक आणि मानसिक कुवत असणारे लोक जर असले तर त्यांच्या त्या त्या मनोवृत्तीचा उपयोग एखाद्या चांगल्या कामासाठी का करून घेऊ नये?

आपला शेतकरी शेतात राबायला मागेपुढे पाहणार नाही. तो पीकही चांगले पीकवील मात्र त्याला दर काय मिळेल ही चिंता तो पेलू शकत नाही. याउलट शेतातली माती कधी हातात घेऊनसुद्धा न पाहिलेली माणसं आहेत. परंतु ती दरांच्या चढ-उताराची जोखीम सहज पत्करायला तयार आहेत. या भिन्न मनोवृत्तीच्या लोकांची एका व्यासपीठावर भेट घडवून आणली तर दोघांचेही काम होईल. शेतकऱ्याला हमी दर मिळेल आणि त्यांपेक्षा जास्त दरात आपण तो माल (किंवा करार) नंतर दुसऱ्याला विकू अशी दुसऱ्याची थोडी-फार जुगारी उर्मीही शमवली जाईल.

या कारणासाठीच हे वायदेबाजार भरवले जातात. अर्थात मूळ हेतू हा तत्वत: पटण्यासारखा असला तरी बऱ्याच वेळा तिथ बेछूट सट्टेबाजी होते. खोट्या अफवा उडवल्या जातात. सरकारला अमुक दरापेक्षा जास्त दरात सौदे करण्याचे नाहीत अशी मर्यादा घालून हस्तक्षेप करावा लागतो. बाजार बंद ठेवावा लागतो. हे सगळे जरी होत असलं तरी मूळ हेतूच चुकीचा आहे. असं म्हणता येणार नाही.

प्रत्यक्ष मालाची देवाण-घेवाण नसल्यामुळे आपल्याकडे नसलेला मालही वायदेबाजारात विकता येतो. आज माझ्याकडे शेत नाही. मी हळद पिकवत नाही, मी कुणाकडून या पद्धतीने हळद घेतलेलीही नाही. तरीही मी आज शंभर क्विंटल हळद वायदेबाजारात विकून येऊ शकतो. मे महिन्यात हिशेब पुरे करायच्या आत मी पुन्हा शंभर क्विंटल हळद खरेदी केली म्हणजे मग मी काही देणे-घेणे लागत नाही. त्या संपूर्ण कालखंडामध्ये मी किती क्विंटल हळद घेतली आणि किती विकली याचा हिशेब अधिक उणे करूनच शेवटी मी किती हळद आणि किती रुपये देणे अथवा घेणे आहे ते ठरणार असते. त्यामुळे आज विकण्यासाठी माझ्याकडे प्रत्यक्ष माल नसला तरीही चालतो. अधिक-उणे केल्यानंतर तोटा आला तर तेवढे पैसे मी भरायला तयार असलो, की झाले. फक्त माझी ही आर्थिक तयारी सिद्ध करण्यासाठी प्रत्यक्ष वायदेबाजारात सौदे करणाऱ्या दलालाला मला ती पटवून द्यावी लागेल किंवा थोडेफार मार्जिन किंवा अनामत रक्कम ठेवावी लागेल. कारण शेअर मार्केटप्रमाणेच इथेही प्रत्यक्ष सौदे करायला आपल्याला प्रवेश नसतो.

Ashay Javadekar

Previous
Previous

30) वायदेबाजार म्हणजे काय?

Next
Next

32) नित्य व्यवहारातही अनेक वायदे