30) वायदेबाजार म्हणजे काय?

Originally published on September 20, 1992

Written by Dr Dileep Javadekar

शेअरबाजारातील गुंतवणुकीबद्दल एवढी माहिती घेतल्यावर आणि त्यातले फायदे उदाहरणासह पाहिल्यावर या बाजारात एवढी भीती कशाची असते, हा प्रश्न उरतो. कंपनीच्या गेल्या काही वर्षाच्या अहवालांचा, नफ्याचा अभ्यास करून शेअर्स घेतले आणि दोनचार वर्ष थांबलं तर इतर गुंतवणुकीपेक्षा नक्कीच जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. असं असतांना एका दिवसात धुळीला मिळालेले श्रीमंत लोक, घरदार, गाडी शेती सर्व विकून शेअरव्यवहारातील देणी द्यावी लागल्याच्या थरकाप उडविणाऱ्या गोष्टी शेअरबाजारात कशा घडतात?

एक लक्षात ठेवले पाहिजे की एका रात्रीत करोडोंचा फायदा मिळवणे आणि दोन तासात कंगाल होणे या गोष्टी शेअरबाजारात घडतात. परंतु त्यासाठी आपण ज्या पद्धतीने गुंतवणूक शिकलो तशी गुंतवणूक करणारे लोक सहसा त्यात अडकत नाहीत. त्यात अडकतात ते बेछूट सट्टेबाज. या लोकांनी किंवा त्यांच्या मित्रांनी कधीतरी खरोखरच एका दिवसात कोट्यावधी रुपये मिळवलेले असतात. तसेच त्या मोहापायी हे कधीतरी जमिनदोस्त होत असतात. अति मोहापायी जुगारी वृत्तीमुळे काय होतं हे महाभारतापासून अनेक उदाहरणावरून जरी माहिती असले तरीही मोहात अडकणारी माणसे पुन्हा जन्माला येतच असतात.

हा सट्टा म्हणजे खरोखरच काय असते? शेअर मार्केटमध्ये तो कसा खेळला जातो?

या सट्ट्यावरून मार्केटमध्ये गुंतवणूकदार (Investor) आणि सट्टेबाज (Speculator किंवा Trader) असे लोकांचे दोन भाग पडतात. यातला फरक लक्षात येण्यासाठी प्रथम Forward Market किंवा वायदेबाजार म्हणजे काय याची थोडी ओळख करून घ्यावी लागेल.

जिथे प्रत्यक्ष कच्च्या मालाची (Commodity) देवाणघेवाण न होता फक्त विवक्षित दराने तो माल पुढे काही काळाने देण्याचा किंवा घेण्याचा वायदा केला जातो त्या बाजाराला वायदेबाजार म्हणता येईल. सांगलीत असा हळदीचा वायदेबाजार चालतो. आणखी काही ठिकाणी एरंड, काळी मिरी, वगैरे कच्च्या मालाचा वायदेबाजार भरतो. तिथे कशाप्रकारचे सौदे होतात याची माहिती मोठी मनोरंजक आहे.

आज समजा एका शेतकऱ्याने आपल्या शेतात हळदीचे पीक लावले आहे. हे पीक पिकून हातात विकण्याजोगी हळद यायला मे महिना उजाडणार असतो. त्या छोट्या शेतकऱ्याला मे महिन्यात बाजाराची परिस्थिती काय असेल, बाजारात किती हळद येईल, आपल्या हळदीला त्यावेळी काय भाव मिळेल याची काळजी असते. या काळजीतुन मुक्त होण्यासाठी तो आपली हळद आजच एखाद्या व्यापाऱ्याला काही भाव ठरवून (समजा एक हजार रुपये क्विंटल) विकून टाकतो. तशी पावती दोघेही करून ठेवतात. म्हणजे एक हजार रुपये क्विंटल दराने समजा पन्नास क्विंटल हळद त्या शेतकऱ्याने एका व्यापऱ्यास विकली मात्र अजून ही हळद शेतात पिकायची असल्यामुळे प्रत्यक्ष हळद मात्र तो मे महिन्यात पीक आल्यावर देईल आणि तेव्हा पन्नास हजार रुपये घेईल.

आता मे महिन्यापर्यंत हळदीच्या भावात काहीही चढउतार होवोत त्याची भीती शेतकऱ्याला राहात नाही. कारण त्याचा व्यवहार एक हजार रुपये दराने ठरलेला असतो. समजा मे महिन्यात हळदीचे भाव चढतील असा रागरंग दिसू लागला तरी त्या शेतकऱ्याला तेवढेच पैसे मिळतील आणि भाव खाली आले तरी तेवढेच पैसे मिळतील. याचाच अर्थ शेतकऱ्याच्या हळदीची वायद्यात खरेदी करून शेतकऱ्याला दराच्या अनिश्चिततेतून मुक्त केले गेले आणि ती जोखीम त्या व्यापाऱ्याने डोक्यावर घेतली. आता या व्यापाऱ्याने तरी ही जोखीम का घेतली? एक तर तो मुळात श्रीमंत आहे. या व्यवहारात थोडा तोटा झाला तरी तो स्वीकारायची आर्थिक ताकद त्याच्यामध्ये आहे. आणि मे महिन्यापर्यंत हळदीचे भाव खूप चढतील असे त्याला वाटते. या व्यापाऱ्यांना तरी मे महिन्यापर्यंत थांबायला हवे का? समजा पुढच्या पंधरा दिवसात दूसरा एखादा व्यापारी आपल्या शेतकऱ्याकडे आला आणि ११०० रुपये क्विंटल दराने हळदीचा वायदे व्यवहार करायला तयार झाला तर शेतकरी काय सांगेल? तो म्हणेल की माझी हळद मी आधीच त्या अमक्या व्यापाऱ्याला विकली आहे. तुम्ही हवी तर त्याच्याकडून ती घ्या. मग या दोन व्यापाऱ्यांमध्ये व्यवहार सुरू होईल. दुसरा व्यापारी पहिल्या व्यापाऱ्याकडून ती न पिकलेली पन्नास क्विंटल हळद विकत घेईल आणि शेतकऱ्याचा वायदेव्यवहार एका व्यापाऱ्याकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित होत राहील. अशी रितीने प्रत्यक्ष न उगवलेल्या हळदीचा व्यवहार मे महिन्यापर्यंत अनेक लोकांच्या हातून हस्तांतरित होत राहील. शेवटी मे महिन्यात जेव्हा हळद येईल तेव्हा तो शेतकरी त्या हळदीची ‘डिलिव्हरी’ देईल आणि त्याचे ठरल्याप्रमाणे पन्नास हजार रुपये घेईल.

Ashay Javadekar

Previous
Previous

29) ऑडलॉट शेअरसाठीचा सल्ला

Next
Next

31) शेतात हळद आणि सांगलीत गोंधळ