40) तेजी-मंदीचा फेरा सर्वच शेअरना

Originally published on November 29, 1992

Written by Dr Dileep Javadekar

विविध कंपन्यांचे शेअर घेतल्यामुळे आपल्या पोर्टफोलिओची जोखीम कमी होते हे खरे परंतु या जोखमीमध्येही दोन मुख्य प्रकार आहेत :

बाजाराची जोखीम : (Systematic risk) हा पहिला प्रकार. जेव्हा भरपूर तेजी आलेली असते, तेव्हा सरसकट सगळ्याच शेअरचे भाव गगनाला भिडलेले असतात. चांगल्या फायद्यातल्या ब्ल्यू चीप कंपन्या तर तेव्हा तेजी दाखवतातच परंतु तोट्यातल्या कंपन्यांही त्यांच्या योग्य किमतीच्या किती तरी वर दिल्या घेतल्या जातात. जेव्हा संपूर्ण बाजार मंदीच्या ढगांनी झाकोळला जातो, तेव्हा सर्वच भाव पडतात. ब्ल्यू चिप कंपन्यांचे शेअर अशावेळी खूप स्वस्त होतात, तर तोटा दाखवणाऱ्या कंपन्यांचे शेअर त्यांच्या फेस व्हॅल्यूच्याही खाली जातात. कित्येक वेळा असे शेअर विकणेही कठीण होऊन जाते. कारण ते उचलायला कुणी खरेदीदारच पुढे येत नाही. अशा या बाजाराच्या तेजी-मंदीच्या फेऱ्यामधून कुठलाही शेअर सुटू शकत नाही. मग ती कंपनी कितीही चांगली असो. त्यामुळे ही जोखीम आपण कितीही वेळ डायव्हर्सीफाईड पोर्टफोलिओ बाळगला तरी कमी होत नाही.

सध्या अगदी हीच स्थिती बऱ्याच गुंतवणूकदारांची झालेली आहे. ज्यांनी अगदी व्यवस्थित विचार करून विविध कंपन्यांचे शेअर घेऊन आपला पोर्टफोलिओ तयार केलेला आहे, त्यांनाही त्याची किंमत आज घसरलेलीच पाहायला मिळत आहे. कारण बाजाराची मन:स्थितीच इतकी खराब आहे, की चांगले शेअरसुद्धा पडेल भावात विकले जात आहेत.

जोखमीचा दुसरा प्रकार म्हणजे अनसिस्टिमॅटिक रिस्क. यात पुन्हा त्या त्या उद्योगधंद्याचे तेजी-मंदीचे चक्र आणि त्या कंपनीची स्वतंत्र जोखीम, असे दोन प्रकार येतील. सध्या टायर कंपन्यांंना दिवस चांगले नाहीत, पॉवर जनरेशनला येत्या काही वर्षांत खूप मागणी येणार आहे आदी विचार अनसिस्टिमॅटिक रिस्कमधल्या विशिष्ट उद्योगधंद्यांच्या सद्य:स्थितिबद्दल विचार मांडतात, तर अमुक एका कंपनीत कामगारांचा संप चालू आहे, सहा महिने टाळेबंदीमुळे उत्पादन बरे आहे आदी गोष्टी त्या कंपनीची जोखीम किती आहे, हे दाखवतात. त्या उद्योगाला दिवस चांगले असले, तरी ती कंपनी घाट्यात असू शकते ती या कारणांमुळेच!

आपल्या डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओमुळे अनसिस्टिमॅटिक रिस्कपासून आपल्या गुंतवणुकीचा बराच बचाव होऊ शकतो. परंतु सिस्टिमॅटिक रिस्कपासून बचाव कसा करायचा? उद्या हे सरकार पडणार आहे का, उद्या भारत-पाकिस्तान युद्ध होणार की नाही, नवीन आर्थिक धोरणाचा फायदा उद्योगधंद्यांना केव्हा आणि किती होणार आहे, परदेशी भांडवल भारतात केव्हा मोठ्या प्रमाणात येऊ शकेल, रुपया परिवर्तनीय झाला त्याचा फायदा भारतीय कंपन्यांना केव्हा मिळणार आहे; या आणि अशा प्रश्नांवर आपल्याकडे उत्तरे असणे शक्य नाही. कितीही विविध कंपन्यांचे शेअर घेऊन ठवले तरी या प्रश्नांची उत्तरे काळच देणार आहे आणि त्यामुळे त्यानुसार बाजारात उत्साह किंवा निरुत्साह राहील तशी आपल्या शेअरची किंमत कमी-जास्त होणारच आहे.

या जोखमीपासून आपले संरक्षण करणे जरी अशक्य असले, तरी या उत्साह-निरुत्साहाच्या लाटेत स्वत:ला अडकवून न घेणारे (किंवा कमी अडकवून घेणारे) शेअर बाजारात असतात. शेअरचा हा स्वभाव मोजण्याच्या परिमाणाला ‘बीटा’ (Beta) म्हणतात. जर बाजार दहा टक्क्यांनी घसरला आणि एखादा शेअर बाजाराबरोबर दहा टक्क्यांनीच घसरला तर त्या शेअरचा ‘बीटा’ एक आहे असे मानतात. काही शेअर मात्र जास्त घसरतील, अशा शेअरचा बीटा साहजिकच दोन आहे, असे म्हणावे लागेल. काही शेअर तेवढे घसरणार नाहीत. बाजारपेक्षा निम्म्याने घसरणाऱ्या शेअरचा ‘बीटा’ ०.५ किंवा अर्धा असेल. मात्र एक लक्षात ठेवायला हवे, की हा ‘बीटा’ काढताना एक-दोन दिवसांचे भाव पाहून न काढता कमीत कमी पाच वर्षांचे रेकॉर्ड अभ्यासून काढला पाहिजे. तसेच ज्यांचा ‘बीटा’ अर्धा किंवा पाव आहे ते शेअर मंदीमध्ये इतरांच्या तुलनेत तेवढे खाली आले नाहीत तरी तेजीमध्येही ते तेवढे चढणार नाहीत. त्यामुळे अशा शेअरमध्ये सिस्टिमॅटिक रिस्क कमी असली तरी फायद्याची शक्यताही कमीच राहील.

काही शेअरचे ‘बीटा’ असे आहेत :

हिंदुस्थान लिव्हर ०.४८

सेंच्युरी ०.६८

ग्रासिम १.०३

मास्टर शेअर १.१८

रिलायन्स १.७८

टाटा स्टील १.४५

Ashay Javadekar

Previous
Previous

39) शेअर निवडीला अनेक निकष लावावेत

Next
Next

41) शेअर्सची निवड महत्त्वाची