41) शेअर्सची निवड महत्त्वाची
Originally published on December 6, 1992
Written by Dr Dileep Javadekar
पोर्ट फोलिओ मॅनेजमेंटमध्ये विविध उद्योगधंद्यातले विविध कंपन्यांचे शेअर्स कसे गोळा करावेत, हे पाहिल्यानंतरही कोणते शेअर्स किंवा कोणत्या कंपन्या निवडाव्या, हा प्रश्न सतत गुंतवणूकदारास पडत राहतोच. शिवाय आजची वर्धिष्णू कंपनी काल दुर्लक्षित असते आणि आज लोकांच्या गळ्यातला ताईत असणारे शेअर्स उद्या अगदी कवडीमोल नाही तरी दुय्यम पातळीवर उतरणार असतात. तेव्हा शेअर्सची निवड करणे हा एक सततचा- कायमचा अभ्यास असतो.
या निवडीच्या परिमाणानुसार शेअर्सचे तीन गट पाडता येतील- घेण्यासारखे, ठेवण्यासारखे आणि विकण्यासारखे! ‘स्पेक्युलेशन’ किंवा सट्टेबाजांना मधला गट मान्य नसतो- ते एक तर घेतील किंवा विकतील. परंतु आपल्यासारख्या डिलिव्हरी घेऊन व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदाराच्या दृष्टिकोनातून ‘ठेवण्यासारखा’ हा गटही खूप महत्त्वाचा ठरतो. कित्येक शेअर्स आपण सहा महिने, वर्ष, दोन-पाच-दहा वर्षेदेखील ठेवतो.
अशा रीतीने शेअर्स घेऊन ठेवायचे असल्यामुळे आठ-पंधरा दिवस किंवा महिनाभर लोकप्रिय असलेला शेअर गुंतवणुकीच्या दृष्टीने चांगला ठरत नसून जास्त वर्षांपर्यंत त्या कंपनीची भरभराट होणे हे जास्त महत्त्वाचे असते. अशा पद्धतीच्या गुंतवणुकीमधूनच उत्तम ‘रिटर्न’ किंवा परतावा मिळतो. कंपनीच्या आकारामध्ये आणि तिच्या कार्यक्षमतेमध्ये वर्षामागून वर्षे जर वाढ होत गेली तर त्यातून कंपनी नक्कीच वाढत नफा मिळवते. यामुळेच बाजारातील त्या शेअरचा दरही वाढत राहतो.
वर्धिष्णू कंपनी हुडकण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तिचा इतिहास तपासणे. मागील काही वर्षांमधील कामाचा आढावा जरी पुढील येणाऱ्या वर्षांबद्दल खात्री देऊ शकत नसला तरी बऱ्याच आणि बहुतेक वेळा हे बरोबर ठरते. मोठ्या महाकाय कंपन्या आणखी मोठ्या होत राहतात आणि लहान उद्योग हे लहानच राहतात. लहान सुरुवात पुढे मोठेपणाकडे झुकणारच नाही असे नाही. परंतु ही किमया थोड्या वर्षांमध्ये करून दाखवणे कठीण असते आणि त्यामुळे अशी छोटी कंपनी मोठी होईपर्यंत कदाचित तीस-चाळीस-पन्नास वर्षेही जाऊ शकतात. आपले स्वत:चेच आयुष्य मर्यादित असल्यामुळे एवढ्या लांबचा विचार करून गुंतवणूक करणे श्रेयस्कर वाटत नाही.
मालमत्तेच्या किंवा नफ्याच्या तुलनेने उत्तम वीस कंपन्या किंवा अशी कोष्टके जेव्हा नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध होतात तेव्हा हे लक्षात येते, की तीन-चार वर्षांच्या काळामध्ये त्यातील दोंन-तीनच कंपन्या बदललेल्या असतात. उरलेल्या कंपन्यांची जागा थोडी मागे-पुढे होते. परंतु ‘उत्तम वीस’मधले त्यांचे स्थान अढळ असते. उत्तम ‘बिझनेस हाऊसेस’ ही वर्षानुवर्षे तीच असतात. टाटा, बिर्ला, किर्लोस्कर, बजाज वगैरेंच्या जोडीला जाऊन बसणे नवीन कंपनीला अशक्य नसले तरी खूप कठीण असते. त्यात खूप वर्षे जाऊ शकतात. बऱ्याच छोट्या प्रयत्नांना मध्येच माघारही घ्यावी लागते.
वाढीची शक्यता असलेल्या कंपन्या ओळखण्यासाठी दुसरा मार्ग म्हणजे वाढीची संधि कोणत्या क्षेत्राला आहे, हे ओळखणे. ज्या क्षेत्रात वाढीची संधी आहे, ज्या क्षेत्राला पुढील काही वर्षांमध्ये मागणी येणार आहे, हे दिसते आहे त्या क्षेत्रातील कंपन्यांचे भवितव्यही उज्ज्वलच असणार. बदलत्या आर्थिक धोरणांमुळे बरेच नवे उद्योग भारतात सुरू होतील. त्यासाठी औद्योगिक वसाहती बांधाव्या लागतील. यामुळे बांधकामाचे काम खूप वाढेल. रस्ते, धरणे बांधावी लागतील. यासाठी सिमेंट, स्टीलला येणाऱ्या वर्षात मागणी खूप येईल. सर्व उद्योगधंद्यांना ऊर्जेची सोय करणे आवश्यक होईल. त्यासाठी पॉवर सप्लायची व्यवस्था करणाऱ्या कंपन्यांचा नफा वाढेल. जे उत्पादन बाजारात येईल ते भारतात तर खपेलच. परंतु परदेशातही निर्यात होईल.
यासाठी उत्तम अशा वेष्टणाची गरज निर्माण होईल. त्यामुळे पॅकेजिंग इंडस्ट्रीलाही खूप काम मिळेल, असे पुढील काही वर्षांबद्दलचे अंदाज करून आज त्या कंपन्यांचे शेअर्स घेऊन ठेवले तर त्यात नंतर नक्कीच वाढ होईल. मात्र ही वाढ प्रत्यक्ष तशी मागणी येऊ लागल्यावर आणि तसा नफा कंपनीला मिळाल्यानंतर होईल. त्यासाठी थोडे थांबावे लागेल.
आपल्या पोर्टफोलिओमधील ‘ठेवण्यासारखे’ शेअर्स त्यामुळे या कंपन्यांचे असतील. दोन-चार महिन्यांत ते फायदा दाखवतीलच, असे नाही. पण दोन-चार वर्षांत नक्की पैसे देऊन जातील. Early bird catches the worm अशी इंग्रजीत म्हण आहे. जो गुंतवणूकदार इतरांपेक्षा लवकर जागा होईल तो जास्त नफा मिळवेल.