42) वर्धिष्णू कंपन्या ओळखायच्या कशा?
Originally published on December 13, 1992
Written by Dr Dileep Javadekar
घेण्यासारखे, ठेवण्यासारखे आणि विकण्यासारखे असे शेअर्सचे जरी तीन प्रकार पाडले तरी यासाठी वर्धिष्णू कंपन्या ओळखायच्या कशा?
साधारणपणे सर्व वर्धिष्णू कंपन्या कमी-जास्त प्रमाणात सारखेच गुणधर्म दाखवतात. तेव्हा हे गुण पाहायची एकदा सवय लागली तर अशा कंपन्या हुडकणे कठीण जाणार नाही. हे गुण पुढे एकत्रित करायचा प्रयत्न केला आहे.
१) वाढती विक्री, वाढता नफा
२) वाढता भागधारक निधी
३) चांगले ‘कव्हर’ आणि चांगला ‘प्लगबॅक’ तसेच ‘कव्हर’ आणि ‘प्लगबॅक’मध्ये होत गेलेली वाढ.
४) ‘अर्निंग’ आणि ‘इक्विटी’ यांचे उच्च गुणोत्तर आणि वापरात असलेल्या मुद्दलावर चांगला परतावा.
५) वारंवार आणि मुबलक ‘बोनस इश्यूज’
वरील गुणधर्म जरा विस्ताराने पाहू.
वाढती विक्री : कोणत्याही कंपनीचे वार्षिक किंवा सहामाही वित्तीय निष्कर्ष अलीकडे बऱ्याच वर्तमानपत्रांमधून वाचायला मिळतात. त्यात विक्रीचा आकडा सर्वप्रथम असतो. कोणत्याही वर्षीचा अहवाल देताना मागील वर्षाचे आकडेही त्यापुढेच तुलनेसाठी देण्याची पद्धत आहे. त्यामुळे मागील वर्षापेक्षा यावर्षी विक्री किती प्रमाणात वाढली अगर कमी झाली हे पहायला मिळेल. वाढ ही नेहमी तुलनेने पाहायची गोष्ट अस्लयामुळे आपण जितक्या जास्त वर्षांची तुलना करू शकू तितकी ती माहिती जास्त उपयोगी ठरू शकेल. दोन वर्षांची माहिती तर कुठल्याही आर्थिक अहवालात मिळेलच. त्याहून पूर्वीची माहिती मिळविण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागतील. परंतु रेट्रोस्पेक्टिव्ह स्टडी आणि प्रॉस्पेक्टिव्ह स्टडी असे दोन्ही प्रकारचे अभ्यास आपण करू शकतो. तेव्हा आपल्याला ज्या कंपन्यांमध्ये रस आहे, अशा कंपन्यांचे वर्तमानपत्रांतून आलेले वित्तीय निष्कर्ष कापून फाईलला लावून ठेवले तर आणखी एक वर्षातच आपल्याकडे आपोआप मागील तीन वर्षांची माहिती (Data) तयार होईल. आपल्या आवडीच्या पंचवीस-तीस कंपन्यांचे अहवाल फाईल करून ठेवणे हे तसे काही फार कष्टाचे काम नाही. विक्रीत वर्षावर्षात होत गेलेली वाढ ही त्या कंपनीच्या उत्पादनाला असलेली आणि वाढत गेलेली मागणी दर्शविते. मागणीत होणारी वाढ हा एकच रेटा कंपनीच्या वाढीसाठी पुरेसा असतो. एखाद्या उत्पादनाची उत्पादनक्षमता तशी यंत्रसामग्री एखाद्या कंपनीकडे भरपूर असली तरी बाजारात ज्या उत्पादनाला मागणीच नसेल तर त्या प्रचंड उत्पादन क्षमतेचा काही उपयोग होणार नसतो. वाढती मागणी, त्यामुळे मालाला आलेला जोरदार उठाव यातूनच कंपनी विस्तार कार्यक्रम आखू शकते.
वाढता नफा : नुसतीच विक्री वाढली तरी नफा वाढत जाईलच असे नाही. पहिली काही वर्षे कंपन्यांना करांमध्ये काही सूट असते. त्यामुळे विक्रीतील बराच भाग नफा या स्वरूपात प्रथम शिल्लक राहू शकतो. परंतु नंतर मात्र जेव्हा कर देण्याची वेळ येते. तेव्हा ते कर वजा जाता उरणारा नफा कदाचित कमी होऊ शकतो. प्रत्यक्ष विक्री भरपूर असली तरी नफ्याचे यामुळे कमी-जास्त होऊ शकते. त्यामुळे नफ्याचे करपूर्व नफा आणि करोत्तर नफा असे दोन प्रकार वित्तीय निष्कर्षांमध्ये छापून येतात.
नफ्यावर परिणाम करणारी दुसरी गोष्ट म्हणजे घसारा किंवा झीज. प्रत्यक्ष मिळालेल्या नफ्यातून काही रक्कम घसारा म्हणून बाजूला ठेवावी लागते. तेव्हा ती वजा जाता नफा किती उरतो हेही पाहायला हवे. हा घसारा म्हणजे काय? प्रत्येक यंत्राला स्वत:चे असे काही आयुष्य आहे. आपण असे गृहित धरू की आपल्या कंपनीत नवी कोरी यंत्रसामग्री बसवलेली आहे. ती पाच वर्षे उत्तम काम देईल. परंतु नंतर त्यात मोडतोड तक्रारी सुरू होतील. बरे पाच वर्षांत आपल्या कंपनीचा जम उत्तम बसलेला असल्यामुळे त्यावेळी यंत्रे दुरुस्तीसाठी वारवार बंद ठेवणे आपल्याला परवडणार नाही. परंतु आहे त्या पातळीवर आपला नफा ठेवण्यासाठीसुद्धा पुन्हा आपल्याला सर्व जुनी यंत्रे बदलून नवीन बसवावी लागतील. ही पाच वर्षांनी येणारी वेळ आधीच लक्षात घेऊन नफ्यातला काही भाग दर वर्षी आपल्याला बाजूला ठेवावा लागेल. तरच पाच वर्षांनंतर हे आपल्याला शक्य होईल. या बाजूला काढून ठेवण्याच्या रकमेला घसारा म्हणतात. तेव्हा ग्राॅस प्रॉफिटमधून हा घसारा बाजूला ठेवल्यानंतरच नफ्याची खरी पातळी लक्षात येईल. ग्राॅस प्रॉफिटमध्ये तर चांगल्या कंपन्या दर वर्षी वाढ दाखवतीलच. परंतु झीज आणि कर वजा करून उरणाऱ्या नेट प्रॉफिटमध्येही चांगली प्रगती दाखवतील.