6) शेअरना पर्याय नाही
Originally published on April 5, 1992
Written by Dr Dileep Javadekar
शेअर म्हणजे काय हे बऱ्याच महाराष्ट्रियन माणसांना ठाऊक नसते. वर्तमानपत्रात शेअरचे भाव ज्या पानावर येतात ते पान बहुसंख्य लोक पटकन उलटून पुढे जातात. कधीतरी सहकारी बँकांमधून कर्ज काढताना ‘लिकिंग’ साठी बँकेचे शेअर घ्यावे लागले एवढाच सामान्य माणसाचा शेअरशी संबंध येतो. त्यासाठी उद्योग-धंद्याच्या कंपन्या कशा उभारल्या जातात हे पाहायला हवे.
एखाद्या माणसाने एकट्याने एखादा उद्योगधंदा सुरू केला तर त्याला ‘प्रोप्रायटरी फर्म’ असे म्हणतात. उदाहरणार्थ डॉक्टरचा दवाखाना, एखाद्याचे किराणा मालाचे दुकान किंवा छोटासा कारखाना वगैरे. अशा फर्मचा मालक एकच असतो. तोच सगळी व्यवस्था पाहतो आणि मिळविलेला नफा अगर तोटा तोच उपभोगतो.
असेच दोघे-तिघे मिळून जेव्हा धंदा सुरू करतात तेव्हा त्याला ‘पार्टनरशिप फर्म’ म्हणतात. यातून मिळवलेला नफा भांडवळच्या प्रमाणात पार्टनर किंवा भागीदार वाटून घेतात.
याहून मोठी कंपनी उभी करताना ती ‘प्रायव्हेट लिमिटेड’ करतात. इथे शेअरची सुरुवात होते. काही लोक कंपनी उभी करतात आणि इतर काही खासगी मित्र लोकांकडून भांडवल गोळा करतात. त्यासाठी त्यांना कंपनीचे शेअर दिले जातात. मात्र त्या शेअरहोल्डर्सना कंपनीच्या संचालनामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेता येत नाही. हे काम निवडलेले संचालन मंडळ करते. पण संचालनात सहभाग नसला तरी कंपनीच्या दिवाळखोरीच्या वेळी अगर कुठल्या कोर्टकचेरीच्या जप्तीत या शेअर-होल्डर्सच्या मालमत्तेवर जप्ती येऊ शकत नाही. यासाठीच ‘लिमिटेड’ असे म्हटले जाते. भागधारकांची ‘लिमिटेड लायबिलिटी’ राहते हा एक मोठा फायदा शेअरधारकांना मिळतो.
याहून मोठी कंपनी असेल तर ती ‘पब्लिक लिमिटेड’ म्हणून ओळखली जाते. अशा कंपनीचे शेअर अर्ज मागवून सामान्य जनतेला दिले जातात. हे शेअर शेअरमार्केटमध्ये ‘लिस्ट’ केले जातात. म्हणजे यांची खरेदी-विक्री बाजारात होऊ शकते. अर्थात ‘लिमिटेड लायबिलिटी’ चा फायदा या शेअरहोल्डरनाही असतो. त्यामुळे भागधारकांना कंपनीच्या फायद्यात वाटेकरी होता येते. परंतु कायदेशीर बाबींमध्ये जबाबदार धरले जात नाही.
या ‘पब्लिक लिमिटेड’ कंपन्यांना बऱ्याच सरकारी नियमांप्रमाणे काम करावे लागते. उदाहरणार्थ दरवर्षी नफा-तोटा, बॅलन्स-शीट, ऑडिट करून घेणे, तो शेअर होल्डर्सना पाठवणे वगैरे. तसेच अधिकृत स्टॉक मार्केटमध्ये या शेअरचे जे सौदे होतात त्यावरही सरकारी नियंत्रण असते. तेव्हा अशा शेअरमध्ये आपण केलेली गुंतवणूक ही जुगारी पद्धतीची न राहता ‘हिशेबी जोखीम’ (Calculated risk) या प्रकारची राहते.
भारतात अशा प्रकारची २० शेअर मार्केट अस्तित्वात आहेत. त्यातील बराच मोठा व्यवहार (जवळजवळ सत्तर टक्के) मुंबई स्टॉक मार्केटमध्ये होतो. सगळ्या भारतातील शेअर मार्केटमधील लोकांची नजर मुंबई स्टॉक मार्केटवरील भावावर असते. मात्र आपण महाराष्ट्रात असूनही भीतीपोटी किंवा अज्ञानापोटी तिकडे पाहायलाही तयार नसतो. नुसते भीती किंवा अज्ञानच नव्हे तर शेअरमध्ये पैसे गुंतवणे म्हणजे एक प्रकारचा जुगार आहे. पैसे घालवण्याचा तो एक खात्रीशीर मार्ग आहे. अशा प्रकारचे अनेक गैरसमजही आपल्या लोकांमध्ये आहेत. तो एक पैसेवाल्या, अतिसधन लोकांचा अड्डा आहे. आपल्याला आपल्या पैशाची काळजी आहे, काळजी नसलेले लोकच तिथे जातात, असाही एक चुकीचा प्रवाद आहे. एका दिवसात कोण सट्टेबाज कसं कंगाल झाला याच्या रसभरीत कहाण्या सगळ्यांजवळ असतात. याहूनही पुढे जाऊन ‘शेअरमधले आपल्याला काही समजत नाही बुवा’ अस मोठ्या अभिमानानं कित्येक उच्च-मध्यमवर्गीय सांगताना मी ऐकलेलं आहे असं सांगण्यात त्यांना काय अभिमान वाटतो हेच न कळण्यासारख आहे.
आपण पूर्वीच पाहिल्याप्रमाणे आज महागाई निर्देशांक १३ ते १५ टक्क्यांपर्यंत आला आहे. जो मनुष्य आयकर भरत नाही त्याची बचतही आज निर्धारित व्याज देणाऱ्या बँकेतील किंवा अन्य ठेवींमध्ये एवढेच व्याज मिळवेल. म्हणजे त्याचा पैसा कसाबसा आज शक्य आहे तेवढ्याच वस्तू नंतर खरेदी करू शकेल. जो माणूस कमी आयकर भरतो त्यालाही आज साधारण कमाईच्या २५ ते ३० टक्के आयकरासाठी व अन्य करांसाठी बाजूला ठेवावे लागतात. जास्त आयकर भरणाऱ्या लोकांना तर शंभर रुपयांतले जवळजवळ साठ रुपये करापोटी बाजूला काढावे लागतात. हे जमेत धरल्यास आपल्या बचतीवर कमी करस्तरातील लोकांनी २० ते २५ टक्के आणि जास्त कर भरणाऱ्यांनी ४० ते ५० टक्के व्याज अगर वाढ मिळविली नाही तर त्यांच्या बचतीचा हेतूच साध्य होणार नाही, हे स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत जरी आजपर्यंत ‘शेअरमधील आम्हाला काही समजत नाही’ हे चालून गेले तरी यापुढे ते चालणार नाही. कारण अशी वाढ फक्त मूल्यवृद्धी योजना (Capital Appreciation)च देऊ शकतात. शेअरला इतर पर्याय कोणते? सोने-दागिने घेणे हा एक आपला जुना आवडता गुंतवणुकीचा प्रकार आहे. पण त्यासाठी त्याचा कस, तूट वगैरे माहिती सामान्य माणसाला असत नाही. सोनार सांगेल त्यावरच अवलंबून राहावे लागते. प्लॉट, बंगला, फ्लॅट गुंतवणूक म्हणून घेणे आजकाल सामान्य माणसाच्या आवाक्या-बाहेर गेले आहे. शिवाय त्याचा मेंटेनन्सही दिवसेंदिवस महाग होत चाललाय. नंतर तो सहजगत्या विकला जाईल अशीही परिस्थिती नाही. जुन्यापूराण्या वस्तू (Antiques) घेणे-विकणे वगैरे सामान्य माणसाला जमण्यासारखे नसते. तेव्हा सामान्य माणसाला आपला साठवलेला पैसा वाढवायचा असेल तर आज शेअरना पर्याय नाही.